छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये ३ नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांसमोर आत्मसमर्पण केले आहे. आत्मसमर्पण केलेल्या दोन नक्षलवाद्यांवर प्रत्येकी १ लाख रुपयांचे बक्षीस होते. गुरुवारी (२७ फेब्रुवारी) पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लखू करम उर्फ गुंडा, सुखराम अवलम आणि नरसू बोड्डू उर्फ नेती यांनी सुरक्षा दलांसमोर आत्मसमर्पण केले आहे. अधिकाऱ्यांच्या मते, लखू करम हा दंडकारण्य आदिवासी मजदूर संघटनेचे अध्यक्ष आहे, तर सुखराम हा जनता सरकार या संघटनेचा अध्यक्ष आहे. यांच्या डोक्यावर प्रत्येकी १ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर होते. अधिकाऱ्यांनी पुढे सांगितले, नरसू बोड्डू उर्फ नेती हा नक्षलवाद्यांच्या मिलिशिया प्लाटून सी सेक्शनचा डेप्युटी कमांडर आहे.
माओवादी संघटनेच्या विचारसरणीमुळे हे नक्षलवादी निराश झाले होते आणि संघटनेतील वाढत्या अंतर्गत मतभेदांमुळे त्यांनी आत्मसमर्पण करण्याचा निर्णय घेतला. तिन्ही नक्षलवाद्यांवर रस्ते खोदून अडवणे आणि इतर नक्षली घटना घडवण्याचा आरोप आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. अधिकारी पुढे म्हणाले, आत्मसमर्पण केल्यावर, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारच्या आत्मसमर्पण आणि पुनर्वसन धोरणांतर्गत प्रत्येकी २५,००० रुपये देण्यात आले. या वर्षी आतापर्यंत सुरक्षा दलांनी विजापूरमध्ये झालेल्या चकमकीत ५६ माओवाद्यांना ठार मारले आहे आणि ४५ माओवाद्यांनी आत्मसमर्पण केल्याचे त्यांनी सांगितले.
हे ही वाचा :
सेबीच्या अध्यक्षपदी नियुक्त झालेले तुहिन कांत पांडे कोण आहेत?
पाणी पिण्यासाठी आला आणि… ७२ तासांनंतर दत्तात्रय गाडेच्या आवळल्या मुसस्क्या
वसंत मोरेंनी स्वारगेटमध्ये दाखवली पत्रकारितेची लक्तरे
त्याच वेळी, राज्यातील नक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यात सुरक्षा दलांनी ४ नक्षलवाद्यांना अटक केली. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, सुरक्षा दलांनी सुकमा जिल्ह्यातील चिंतालनार पोलिस स्टेशन परिसरातील रवगुडा गावातील जंगलात चार नक्षलवाद्यांना अटक केली. रवा हडमा, वेट्टी ऐता, बरसे भीमा आणि मडकम कोसा अशी अटक केलेल्या नक्षलवाद्यांची नावे आहेत. अटक केलेल्या नक्षलवाद्यांकडून स्फोटकेही जप्त करण्यात आली असल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. अटक केलेल्या नक्षलवाद्यांकडून १५ जिलेटिनच्या काड्या, २ इलेक्ट्रिक डेटोनेटर्स, ८ नॉन-इलेक्ट्रिक डेटोनेटर्स, १२ मीटर कॉर्डेक्स वायर, कमांड स्विच आणि माओवादी पत्रके जप्त करण्यात आली आहेत.