कठीण आणि गुंतागुंतीच्या शैक्षणिक संकल्पना विद्यार्थ्यांना सोप्या पद्धतीने समजावून सांगण्यासाठी शिक्षक विविध प्रयोग करत असतात. याचाच प्रत्यय आयआयएम अहमदाबादमध्ये आला असून एका प्राध्यापकांनी रणवीर सिंगच्या सुपरहिट ‘धुरंधर’ चित्रपटातील दृश्याचा वापर करून सांख्यिकी आणि संशोधन पद्धतीचे (cluster sampling and stratification) धडे शिकवले. या अनोख्या शिकवणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
आयआयएम अहमदाबादचा विद्यार्थी प्रखर सिंग याने हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये वर्गातील प्रोजेक्टरवर ‘धुरंधर’ चित्रपटातील एक दृश्य दाखवले जात असताना प्राध्यापक चित्रपटातील संवादांचा आधार घेत क्लस्टर सॅम्पलिंग आणि स्ट्रॅटिफिकेशन यांसारख्या सांख्यिकीय संकल्पना स्पष्ट करताना दिसतात.
प्रखर सिंगने पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, “फक्त आयआयएम अहमदाबादमध्येच ‘धुरंधर’मधील दृश्य सांख्यिकीच्या वर्गात धड्यात रूपांतरित होऊ शकते. ‘ल्यारी जिंका, पाकिस्तान जिंका’ म्हणजे क्लस्टर सॅम्पलिंग आणि ‘बलुच व पठाण टोळ्या या वेगवेगळ्या गटांमध्ये मोडतात’ म्हणजे स्ट्रॅटिफिकेशन.” त्याने पुढे सांगितले की, चित्रपटातील टोळ्यांमधील संघर्षावर चर्चा होण्याऐवजी वर्गात संशोधन पद्धती आणि सर्वेक्षण आराखड्यांवर सखोल चर्चा सुरू झाली.
वर्गात दाखवण्यात आलेल्या दृश्यात रणवीर सिंगने साकारलेले हमजा हे पात्र उझैर बलोचसोबत संवाद साधताना दिसते. या संवादादरम्यान पाकिस्तानातील गुन्हेगारी जगतातील सत्तासंघर्ष आणि प्रभावाची चर्चा होते. याच संवादाचा आधार घेत प्राध्यापकांनी क्लस्टर सॅम्पलिंगची संकल्पना स्पष्ट केली. “ल्यारी जिंका, पाकिस्तान जिंका” या संवादाचा संदर्भ देत त्यांनी सांगितले की, संशोधक एखाद्या मोठ्या लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विशिष्ट गटाचा अभ्यास करून संपूर्ण लोकसंख्येबाबत निष्कर्ष काढतात. तसेच बलुच आणि पठाण टोळ्यांमधील फरकाचा उपयोग स्ट्रॅटिफिकेशन समजावण्यासाठी करण्यात आला. या पद्धतीत संपूर्ण लोकसंख्येला विविध उपगटांमध्ये विभागून प्रत्येक गटाचे योग्य प्रतिनिधित्व सुनिश्चित केले जाते.
हे ही वाचा:
राजीव बलियान असल्याचे सांगितले…निघाला अशफाक, विधवेला ओढले जाळ्यात
आंतरराष्ट्रीय योग दिनापूर्वी प्रयागराजमध्ये ‘जल योग’
पॅरिसमधून मोदींचा डिजिटल मास्टरस्ट्रोक!
मान्सूनची वाटचाल ठप्प! एल निनोच नव्हे, ‘हे’ घटकही रोखतायत पावसाचा मार्ग
आयआयएम अहमदाबादच्या प्राध्यापकांची ही नाविन्यपूर्ण शिकवण्याची पद्धत सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे. अनेकांनी अवघड शैक्षणिक संकल्पना चित्रपटाच्या माध्यमातून सहज आणि मनोरंजक पद्धतीने समजावून सांगितल्याबद्दल त्यांचे कौतुक केले आहे. विद्यार्थ्यांनाही या पद्धतीमुळे विषय अधिक सहजपणे समजल्याची प्रतिक्रिया दिली आहे.







