25 C
Mumbai
Wednesday, March 29, 2023
घरविशेषकोकणचा दौरा की फक्त शिमगाच!

कोकणचा दौरा की फक्त शिमगाच!

उद्धव ठाकरे महाराष्ट्र पिंजून काढणार?

Google News Follow

Related

नावात काय असतं असं शेक्सपिअर म्हणून गेले, पण नावात तर बरंच काही असतं हे आता सर्वसामान्यांनाही कळलं असेल. शिवसेना नाव आणि चिन्ह कोणाचं याचा वाद अनेक दिवस सुरू होता. अखेर हे चिन्ह आणि नाव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळालं. या सगळ्या घडामोडींनंतर उद्धव ठाकरे आता महाराष्ट्र पिंजून काढण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झाले आहेत. ते पुढील महिन्यात कोकण दौऱ्यावर जाणार आहेत असं त्यांनी पुन्हा जाहीर केलंय. याआधीही त्यांनी महाराष्ट्र पिंजून काढेन, अशा घोषणा शिंदे आणि ४० आमदार शिवसेनेपासून दूर गेल्यानंतर केल्या होत्या. पण त्या प्रत्यक्षात कधी आल्याच नाहीत. आता पुढील महिन्यात भर शिमग्यात उद्धव ठाकरे कोकण दौऱ्यावर जाणार आहेत.

खरेतर, अडीच वर्षे मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे कधीही घराबाहेर पडले नाहीत. ते मंत्रालयातही गेले नाहीत. पण आता पक्षबांधणीसाठी त्यांना फिरावे लागते आहे. पक्षबांधणीसाठी अशाप्रकारे महाराष्ट्र पिंजून काढण्याची वेळ त्यांच्यावर कधी आली नव्हती. निवडणुकांपुरते विविध ठिकाणी जाऊन भाषणे करणे, सभा घेणे हा नित्यक्रम होता. पण आज पक्ष फुटल्यानंतर अधिक फाटाफूट होऊ नये म्हणून त्यांना राज्याचा दौरा करणे भाग आहे. त्यात वावगेही काही नाही.

मात्र शिंदे ज्या कारणामुळे बाहेर पडले ते म्हणजे त्यांच्या प्रश्नांची, त्यांच्या समस्यांची दखलच पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे घेत नव्हते. त्यातून नाराजी वाढत गेली होती. उद्धव ठाकरे यांच्याभोवती बडव्यांचे कोंडाळे असल्यामुळे आपल्याला भेटता येत नव्हते अशी खंत शिंदे व त्यांच्या आमदारांनी वेळोवेळी बोलून दाखविली होती. त्यातूनच शिवसेनेला हे खिंडार पडले. म्हणूनच आता सगळे हातून निसटल्यानंतर त्यांना आपण माणसांना भेटलं पाहिजे, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजेत, चर्चा केली पाहिजे असं वाटतंय. उशीरा का होईना पण त्याची जाणीव त्यांना झाली आहे. खरे तर प्रत्येक राजकीय पक्षाचे नेते आपल्या पक्षवाढीसाठी, पक्षबळकटीसाठी, संघटन मजबूत ठेवण्यासाठी कार्यकर्ते, पदाधिकारी, जनता यांच्याशी संवाद साधत असतात. त्यांच्याशी आपण बोललो, त्यांच्यात मिसळलो तरच आपल्याला सहानुभूती मिळू शकेल हे त्यांनी बहुतेक जाणलं असावं.

हेही वाचा :

भारत ते गयाना लवकरच थेट विमानसेवा

“तिहेरी तलाक” कायद्याबद्दल मुस्लिम समुदायाकडून पहिल्यांदाच पंतप्रधानांचे कौतुक

जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांचा पुतळा जाळण्यास सांगितला

शिवसेना भवनातही उद्धव ठाकरे बैठका घेण्यासाठी कधी गेल्याचे आठवत नाही. पण आता ते तिथे बसायला लागले. घरात बसून राज्याचा कारभार हाकणारा मुख्यमंत्री अशी टीका त्यांच्यावर त्यावेळी झाली होती. पुन्हा महाराष्ट्रात फिरण्याची घोषणा त्यांनी केली आहे. त्यांच्या या कोकण दौऱ्याची सुरुवात खेडपासून करणार असल्याचे जाहीर केले आहे. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना त्यांनी याआधीही कोकण दौरा केला होता. हा दौरा त्यांनी आटोपशीर घेऊन गावांना धावती भेट दिली होती. त्यावेळी त्यांच्यावर हा कोकण दौरा नसून पर्यटन दौरा असल्याची टीका झाली होती. तौक्ते वादळाने कोकणात थैमान घातल्यानंतर उद्धव ठाकरे पाहणी करायला गेले होते. परंतु वादळ चार तास थांबलं. पण तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तीन तासही थांबले नाहीत, उद्धव ठाकरे जमीनाला पाय लावायला आले होते का, अशी टीका त्यावेळी झाली होती. कोकणात पुराने थैमान घातले तेव्हाही उद्धव ठाकरे तिथे गेले होते. मात्र स्थानिकांचा रोष त्यांना सहन करावा लागला होता.

पण आता या दौऱ्यातून उद्धव ठाकरे यांना काय साध्य करायचे आहे?  या दौऱ्यामागे त्यांचे नेमके उद्दिष्ट काय आहे? आपल्या पक्षाच्या संघटनेची बांधणी करायची आहे, की फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदार, खासदारांवर खोके, बोके, गद्दार अशी टिप्पणी करून बदनामी करायची आहे. जर उद्धव ठाकरे यांचा फक्त हा उद्देश असेल तर त्यात काय नावीन्य आहे. त्यांनी मग मातोश्रीवर बसून हे साध्य करावे. इकडे बसूनही हे कार्य करता येईल. पत्रकारांसमोर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत फक्त एकनाथ शिंदेंवर चिखलफेक करत आले आहेत.

संजय राऊत यांच्या नाशिक दौऱ्यावेळी शिंदे गटात तेथील पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला होता. त्यामुळे राऊत नाशिकमध्ये येण्यापूर्वीच शिंदे गटाने करेक्ट कार्यक्रम केल्याचे बोलले गेले. याआधी सुषमा अंधारे यांच्या नेतृत्वात महाप्रबोधन यात्रा काढल्या. या यात्रेतही पक्षावरील अंध:कार दूर न करता त्यातही एकनाथ शिंदे आणि गटावर हल्लाबोल एवढाच काय तो उद्देश ठेवून ही यात्रा पार पाडली. त्यात वेगळेपण काहीच नव्हते. आदित्य ठाकरेही शिवसंपर्क यात्रेच्या माध्यमातून विविध ठिकाणी गेले पण तिथेही त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका हेच उद्दीष्ट ठेवले. उद्धव ठाकरे यांनीही घराबाहेर पडावं, आदित्य ठाकरे यांनीही घराबाहेर पडावं. अशा वेगवेगळ्या यात्रा काढाव्या. या यात्रेत जनसामान्यांशी संपर्क साधावा, अडीअडचणी जाणून घ्याव्या. परंतु हे चित्र कुठेही दिसत नाही. प्रत्येक सभेत, पत्रकारांसमोर शिंदे गटाची बदनामी करायची हेच उद्दिष्ट दिसते. या दौऱ्यातही नवीन काही असेल असे वाटत नाही.

एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या आमदारांवर टीका करण्यातून त्यांचा पक्ष बळकट होईल अशी त्यांची अपेक्षा असावी. कोकणची जनता ही राजकारणाला वेगळ्या अर्थाने पाहते. त्यांना उद्धव ठाकरे वेगळे काही देणार की, पुन्हा तेच ते हे बघायचे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,876चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
65,600सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा