भारताची महत्त्वाकांक्षी आणि पहिलीच सौर मोहीम आदित्य एल १ने पृथ्वीचा कायमचा निरोप घेतला आहे. पृथ्वीच्या कक्षेतून हे यान बाहेर पडले असून आता सूर्याजवळ जाण्याच्या १५ लाख किमीच्या प्रवासाला यानाने सुरुवात केली आहे. आता सूर्याचा अभ्यास करण्यासाठी अंतराळातील ठरवण्यात आलेल्या ठिकाणी पोहोचण्यासाठी या यानाला ११० दिवस लागणार आहेत.
भारताची पहिली अंतराळामधील सौर वेधशाळा, आदित्य-एल १ने आता सूर्य आणि पृथ्वीदरम्यानच्या एल १ बिंदूकडे प्रयाण केले आहे, अशी माहिती भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) ने दिली. अंतराळयानाने ट्रान्स-लॅग्रेंजन पॉइंट १ इन्सर्शन (टीएल१आय) यशस्वीपणे पार पाडली.
हे ही वाचा:
इंग्लंडमध्ये चेतेश्वर पुजारा एका सामन्यासाठी निलंबित !
अनंतनाग हल्ल्याचा मास्टरमाईंड उजैर खानचा खात्मा !
कॅनडाच्या राजनैतिक अधिकाऱ्याची हकालपट्टी !
तामिळ संगीतकार, अभिनेता विजय अँटनी यांच्या मुलीने केली आत्महत्या !
२ सप्टेंबर रोजी आदित्य एल १ हे अंतराळयान प्रक्षेपित करण्यात आले होते. सूर्याच्या भोवती असलेल्या क्रोमोस्फियर आणि करोना या बाह्यस्तराचा अभ्यास करणे, सूर्याची छायाचित्रे काढणे आदी या मोहिमेची उद्दिष्ट्ये आहेत. अवकाशातील हवामानाची गतीशीलता आणि कण आणि क्षेत्रांच्या प्रसाराचाही अभ्यास हे यान करेल. अंतराळ यानाने पृथ्वीच्या चार कक्षा यशस्वीरीत्या ओलांडून आता एल १ बिंदूच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे.
अंतराळातील एल १ बिंदूवरून सूर्याचे अखंड दृश्य दिसते, ज्यामुळे सूर्याच्या भोवती घडणाऱ्या घडामोडींचे निरीक्षण करण्यासाठी आणि अवकाशातील हवामानावर होणारा परिणाम पाहण्यासाठी हे एक आदर्श ठिकाण आहे. एकदा का आदित्य-एल १ या बिंदूवर पोहोचले की, ते प्रभामंडल कक्षेत प्रवेश करेल आणि तिथेच राहील. त्यामुळे त्याला सूर्याचे सतत निरीक्षण करता येईल.