बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत इतिहासाच्या पुस्तकांमध्ये ‘दुरुस्ती’ करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. आपण अकबर किंवा औरंगजेबाबद्दल वाचतो, पण आपल्या देशातील नायकांबद्दल वाचत नाही. त्यांची माहिती देणे महत्वाचे असल्याचे अक्षय कुमारने म्हटले आहे. याच दरम्यान, अक्षय कुमारच्या वक्तव्यावर भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अकबर, औरंगजेब हे आपले नायक नाहीत, हा आवाज हिंदी सिनेमाच्या वर्तुळातून यावा ही बाब स्वागतार्ह असल्याचे अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे.
‘स्काय फोर्स’ या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान अक्षय कुमार म्हणाला, शाळेच्या पुस्तकातील बऱ्याच गोष्टी दुरुस्त करायला हव्या आहेत. आपण अकबर किंवा औरंगजेबाबद्दल वाचतो, पण आपल्या देशातील नायकांबद्दल वाचत नाही. त्यांची माहिती देणे महत्वाचे आहे. परमवीर चक्र किती लोकांना देण्यात आले आहे? भारतीय सैन्याबद्दल अनेक कथा आहेत. मला असे वाटते कि इतिहास दुरुस्त करणे आवश्यक आहे आणि अशा नायकांना पुढे आणून त्यांच्याबद्दल आपल्या पिढीला सांगायला हवे, असे अक्षय कुमार म्हणाला.
दरम्यान, अक्षय कुमारचा नवा ‘स्काय फोर्स’ चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे. या चित्रपटात १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धातील सत्य घटनेवर प्रकाश टाकण्यात आल आहे. चित्रपटामध्ये पाकिस्तानच्या सरगोधा एअरबेसवरील भारताच्या प्रतिहल्ल्याची कहाणी सांगण्यात आली आहे. या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार विंग कमांडर केओ अजुहा यांची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात अक्षयसोबत वीर पहाडिया, निम्रत कौर आणि सारा अली खान यांच्याही मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक अनिल कपूर आणि संदीप केवलानी यांनी केले आहे. हा चित्रपट २४ जानेवारीला प्रदर्शित होत आहे.