28 C
Mumbai
Wednesday, March 29, 2023
घरविशेषकुसुमाग्रजांना कुसुमांजली

कुसुमाग्रजांना कुसुमांजली

मराठी भाषा गौरव दिवस

Google News Follow

Related

२७ फेब्रुवारी ही महाकवी कुसुमाग्रजांची जयंती. मराठी भाषा गौरव दिन म्हणून आपण ही जयंती साजरी करतो आणि त्यानिमित्ताने कुसुमाग्रजांच्या अफाट साहित्यविश्वाची सफर करतो. विष्णू वामन शिरवाडकर तथा कुसुमाग्रज म्हणजे महाराष्ट्राला मिळालेली महान देणगी.

काव्य, नाट्य, कथा असा कोणताही साहित्यप्रांत नाही, ज्यात कुसुमाग्रजांनी मुशाफिरी केली नाही. स्फूर्ती, प्रेरणा देणाऱ्या त्यांच्या कवितांनी तरुण पिढीला चेतविले, उद्युक्त केले. मुख्य म्हणजे त्यांचे हे साहित्य काळानुरूप बदलत गेले, त्यात तो लवचिकपणा, प्रवाहीपणा होता. त्यामुळे आजही हा साहित्यपिसारा आपल्याला मोहवतो, आकर्षित करतो आणि त्याच्या अभ्यासासाठी प्रवृत्त करतो.

मराठी रंगभूमीचा सुवर्णकाळ संपू नये या उद्देशाने कुसुमाग्रजांनी आपली लेखणी झिजविली. अ. ना. भालेराव यांना भेटल्यानंतर कुसुमाग्रजांमधील ती नाट्यभावना अधिक प्रखरतेने चमकू लागली. त्यातून नटसम्राट, ऑथेल्लो, आनंद, आमचं नाव बाबुराव, एक होती वाघीण, दुसरा पेशला, कौंतेय, दूरचे दिवे, बेकेट, वीज म्हणाली धरतीला अशा विविधरंगी, विविधढंगी नाटकांची मेजवानी नाट्यरसिकांना तृप्त करून गेली. आजही ती नाटके काळ बदलला तरी मनाचा ठाव घेतात, मनावर अधिराज्य करतात. नटसम्राटसारख्या नाटकाचे तर कित्येक प्रयोग झाले. असंख्य कलाकारांना या नाटकाने भरभरून दिले. चित्रपटक्षेत्रालाही या नाट्यकृतीने आकर्षित केले. भाषेचे अभिजात सौंदर्य, जिवंतपणा ही त्यांच्या नाटकांची खरी ओळख.

हे ही वाचा:

अजितदादांना असे आरोप शोभतात का?

आपत्तीग्रस्तांच्या मदत निधीत भरीव वाढ..जाणून घ्या किती

सरकारी योजनांच्या लाभार्थींची ठेवणार अनोखी ‘आठवण’

अजितदादा, ही पोटदुखी कशामुळे? शिंदे-फडणवीसांनी विचारला सवाल

क्रांती ही साहित्याची प्रेरणा आहे, या तत्त्वाने कुसुमाग्रजांनी लेखन केले. त्यामुळे त्यांच्या कवितांमध्ये क्रांतिची बिजे आपल्याला पाहायला मिळतात. तोच नाट्यानुभव आपण त्यांच्या नाटकांमधूनही घेतो. त्यांच्यातील ही क्रांतीची ज्योत त्यांना विविध आंदोलनात सहभागी होण्यास कारणीभूत ठरली. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही त्यांनी हिरीरीने पुढाकार घेतला.

कुसुमाग्रजांनी सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेतला. समाजाच्या कल्याणासाठी ते वचनबद्ध होते. आदिवासींच्या सुधारणेसाठी त्यांनी प्रयत्न केले. समाजातील प्रत्येकाला विकासाची समान संधी मिळायला हवी, असे त्यांचे मत होते. कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या माध्यमातून मुलांसाठी अनुकूल ग्रंथालये तयार करणे आणि आदिवासी लोकसंख्येला मदत करणे हे कार्य त्यांनी केले.

कुसुमाग्रजांची काही स्फूर्तीदायी काव्ये

क्रांतीचा जयजयकार

गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार
अन् वज्रांचे छातीवरती घ्या झेलून प्रहार!

खळखळू द्या या अदय शृंखला हातापायांत
पोलादाची काय तमा मरणाच्या दारात?
सर्पांनो उद्दाम आवळा, करकचूनिया पाश
पिचेल मनगट परि उरातील अभंग आवेश
तडिताघाते कोसळेल का तारांचा संभार
कधीही तारांचा संभार
गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार!

 

कणा

‘ओळखलत का सर मला?’ – पावसात आला कोणी,
कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी.
क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून :
‘गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहुन’.
माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली,
मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली.
भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले,
प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले.
कारभारणीला घेउन संगे सर आता लढतो आहे
पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे,
खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला
‘पैसे नकोत सर, जरा एकटेपणा वाटला.
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेउन, फक्‍त लढ म्हणा’!

 

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,876चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
65,600सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा