गेल्या २० वर्षात मुंबई महापालिकेने नालेसफाई, मिठी नदी, पुर परिस्थिती नियंत्रण, नाले बांधकाम, ब्रिमस्टोवँड यासाठी सुमारे १ लाख कोटी खर्च केले तरीही मुंबईतील परिस्थिती का बदलली नाही? याचे उत्तर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी द्यावे. ही १ लाख कोटींची मुंबईकरांशी उबाठाने केलेली बेईमानी आहे, असा थेट आरोप मुंबई उपनगर पालकमंत्री आणि मुंबई भाजपा अध्यक्ष एँड आशिष शेलार यांनी आज येथे केला.
मुंबईत निर्माण आलेल्या पुर परिस्थितीबाबत आज एँड आशिष शेलार यांच्या नेतृत्वात भाजपाच्या शिष्टमंडळाने महापालिका मुख्यालयात जाऊन पालिका आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेऊन अनेक सूचना तर केल्याच सोबत ब्रिमस्टोवँडसह मागील २० वर्षांच्या काळात मुंबईत खर्च झालेल्या १ लाख कोटीच्या कामांची श्वेतपत्रिका काढा, अशी आग्रही मागणी केली.
महापालिकेचे २० वर्षांचे ८० लाख कोटींच्या बजेट मधील ४० टक्के विकास कामे धरली तर त्यापैकी केवळ १० टक्के नाले, मिठी नदी, ब्रिमस्टोवँड ला खर्च झाले पकडले तरी २० वर्षात मुंबईकरांचे १ लाख कोटी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी खर्च केले. त्याचा हिशेब त्यांनी मुंबईकरांना द्यावा, आणि मग मागच्या तीन वर्षांचा हिशेब आम्हाला विचारावा, असे मंत्री शेलार यांनी स्पष्ट केले.
मान्सूनपूर्व कामे सुरु असतानाच मंत्री शेलार यांनी नालेसफाई, रस्ते बांधणीच्या कामांची पाहणी दौरा करुन अनेक बाबी प्रशासनाच्या लक्षात आणून दिल्या होत्या. तर उपनगर पालकमंत्री म्हणून एँड आशिष शेलार यांनी प्रोटोकॉल बाजूला ठेवून माजी नगरसेवकांचे शिष्टमंडळ घेऊन थेट आयुक्तांची महापालिका मुख्यालयात भेट घेतली. या शिष्टमंडळात माजी गटनेते प्रभाकर शिंदे, विनोद मिश्रा, माजी विरोधी पक्षनेते रवी राजा, कमलेश यादव, रिटा मकवाना, प्रकाश गंगाधरे, आशा मराठे, हर्षिता नार्वेकर, रोहिदास लोखंडे आदींचा समावेश होता.
आज बैठकीत एँड आशिष शेलार आयुक्तांशी चर्चा करताना सांगितले की, ब्रिमस्टोवँडचा प्रकल्प आजपर्यंत का पुर्ण झाला नाही? त्यासाठी सन २०१७ पर्यंत किती निधी खर्च झाला? तसेच २५ ते ५० मि मि पाऊस झाला तर ही यंत्रणा उभारण्यात येणार होती तीही पुर्ण झाली नाही. यापेक्षा जास्त पाऊस झाला तर काय करणार? आता यापेक्षा जास्त पाऊस मुंबईत पडतोच त्यामुळे याबाबत काय करणार ? याचे उत्तर पालिका आयुक्तांनी द्यावे.
मिठी नदीचा गाळ किती काढला? तो कुठे टाकला? त्यासाठी किती निधी खर्च झाला? याची माहिती मुंबईकरांना द्या. कारण मिठी नदी ही भ्रष्टाचाराचे कुरण झाले असून मृत व्यक्तीच्या नावे करार केले गेले, ज्या जागेत गाळ टाकला असे सांगितले जाते आहे त्या ग्रामपंचायत असे काही घडलेच नाही सांगत आहेत. त्यामुळे याबाबत आर्थिक गुन्हे शाखेकडून जी चौकशी सुरु आहे त्यात हे सारे घोटाळे बाहेर येते आहे. मग पालिका काही मुंबईकरांना सांगणार आहे की नाही?
मुंबईतील पाथमुखे ही भरती रेषेच्या खाली आहेत. त्यापैकी किती पाथमुखांची उंची वाढवून गेल्या २० वर्षात ती वर आणण्यात आली याची माहिती द्यावी.
मुंबईत पावसाळ्यात झाडे पडून निष्पाप नागरिकांचे बळी जातात. यामध्ये अशी एक बाब समोर आली आहे की, खाजगी जागेवरील जी झाडे आहेत त्यांची छाटणी पालिका करीत नाही. ही झाडे खाजगी जागेवर जरी असली तरी त्याच्या फांद्या रस्त्यावर असतात व त्या कोसळून अपघात होतात. या झाडांची छाटणी करण्यासाठी पालिका सदर खाजगी जागा मालकाकडून शुल्क आकारते. ते जास्त आहे. जर खाजगी मालकाने अथवा संस्था, सोसायटीने शुल्क दिले नाही तर छाटणी होत नाही. त्यामुळे यापुढे पालिकेने पुढाकार घेऊन जी झाडे खाजगी जागेत जरी असली तरी ज्यांच्या फांद्या धोकादायक झाल्या आहेत अशा झाडांची छाटणी पालिकेने मोफत करावी, अशी मागणी मंत्री शेलार यांनी केली.
हे ही वाचा:
मिठी नदी सफाई घोटाळ्यात आदित्य ठाकरेंचा हात!
क्षारसूत्र आणि भगंदर विषयावर डॉ. दोशींनी अमेरिकेत केले मार्गदर्शन
इराणमध्ये ३ भारतीय नागरिक बेपत्ता!
तब्बल दोन वर्षांनी प्रेयसीला लक्षात आले! प्रियकर निघाला मुस्लिम
तसेच मुंबई उपनगरातील धोकादायक इमारती आणि दरड कोसळणाऱ्या ठिकाणांबाबत मंत्री शेलार यांनी नुकतीच म्हाडा, पालिका, एस आर ए, जिल्हाधिकारी यांची बैठक घेतली होती. या बैठकीत उपनगरातील ८२ जागांपैकी ४७ जागा या दरडप्रवक्ष क्षेत्र म्हणून धोकादायक आहेत. यापैकी ९ फुटापर्यंतच्या दरडींना म्हाडा तर्फे संरक्षक जाळ्या लावण्यात येतात. त्यापेक्षा जास्त उंचीच्या भिंतीना जाळी लावण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाचे आहे पण त्यांच्याकडे निधी नसल्याने ही कामे झालेली नाहीत. हा निधी पालिकेने उपलब्ध करून द्यावा व तातडीने या संरक्षक जाळ्या बसवाव्यात, अशा सूचना केल्या. झाडांच्या फांद्या आणि दरड हे दोन्ही विषय अत्यंत तातडीने करायचे असल्याने याबाबत आयुक्तांनी तात्काळ निर्णय घ्यावा अन्यथा या पावसाळ्यात दुदैवाने दुर्घटना घडली तर आम्ही थेट आयुक्तांना जबाबदार धरु, असेही मंत्री शेलार यांनी सांगितले.
दोन दिवस पाऊस पडला तेव्हा पाणी साचलेल्या ठिकाणी पंप उपलब्ध नव्हते ते उपलब्ध करून द्यावे. तसेच ब्रिटानिया पंपिंग स्टेशन जवळपास फेल गेले आहे. त्यामुळे दक्षिण मुंबईत पाणी तुंबले. या पंपिंग स्टेशनची निविदा ही आपल्या मर्जितील “ए ई डब्ल्यू “या कंत्राटदार कंपनीला मिळावी म्हणून त्यावेळी उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी अटींमध्ये कोणते बदल केले. त्याचा परिणाम कामावर कसा झाला? पाणी उपसा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असणारे निकष कंत्राटदार कंपनीसाठी कसे बदलले गेले याचे वास्तव मुंबईकरांसमोर आयुक्तांनी मांडावे, अशी मागणीही यावेळी मंत्री शेलार यांनी केली.
कोस्टल रोडचा जो भराव करण्यात आला त्यावेळी तत्कालीन मंत्री आदित्य ठाकरे यांनी आपल्या बगलबच्चांना काम देण्यासाठी निविदेतील निकष बाजूला ठेवून निकृष्ट दर्जाचे माती, दगड, खडी या भरावात वापरली जात आहे याकडे भाजपाने त्यावेळी लक्ष वेधले होते. याबाबतची सत्याता मुंबईकरांसमोर मांडावी, अशी मागणी केली.
तर रस्त्याची कामे अपूर्ण असून अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाचे रस्ते बांधण्यात आले आहेत. रस्त्यावरच्या वाहतूकीचा खोळंबा करुन टाकण्यात आला आहे. आता अपूर्ण रस्ते तातडीने डांबरीकरण करुन वाहतूक योग्य करा, अशी सूचना ही केली.
दरम्यान, याबाबत आयुक्तांकडे लेखी उत्तर मागण्यात आले असून शिष्टमंडळाशी बोलताना आयुक्त भूषण गगराणी यांनी सांगितले की, पाऊस पंधरा दिवस आधीच आला त्यामुळे नियोजन कोलमडले. नालेसफाईची कामे पुर्ण झालेली नाहीत. तसेच मिठी नदीतील गाळ काढण्याचे काम ही ५५ टक्के पेक्षा जास्त होऊ शकलेले नाही. त्याची विविध कारणे आहेत. पण यापुढे 8 दिवसात ही कामे पुर्ण करण्यात येतील. ज्या ठिकाणी पाणी तुंबते त्या ठिकाणी पंप बसवण्याचे काम २४ तासात पूर्ण करण्यात येतील. आवश्यकता वाटेल तिथे पंपांची संख्या वाढवण्यात येईल, असे आयुक्तांनी सांगितले.
तर या सगळ्या कामांवर पुढील आठ दिवसात भाजपा पदाधिकारी, माजी नगरसेवक लक्ष ठेवून राहतील असे मंत्री शेलार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
