इराणमध्ये एकाच कुटुंबातील ३ भारतीय सदस्य बेपत्ता झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. तेहरानमधील भारतीय दूतावासाने बुधवारी (२८ मे) ही माहिती दिली. भारतीय दूतावासाने इराणमधील अधिकाऱ्यांना बेपत्ता भारतीय नागरिकांचा शोध घेण्याचे आणि त्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्याचे आवाहन केले आहे.
भारतीय दूतावासाने सांगितले की त्यांनी इराणमध्ये बेपत्ता झालेल्या तीन भारतीय नागरिकांचा मुद्दा तेथील अधिकाऱ्यांसमोर उपस्थित केला आहे. बेपत्ता झालेल्या तिघाजणांचा इराणच्या भेटीवर असताना अचानक त्यांचा संपर्क तुटला. तेव्हापासून त्यांच्याबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नाही. त्यांच्या तपासाबद्दल प्रत्येक अपडेट त्यांच्या कुटुंबियांना दिली जात असल्याचे भारतीय दूतावासाने सांगितले.
दरम्यान, पंजाबमधील एका तरुणाच्या आईने आरोप केला आहे की त्यांचे १ मे पासून तेथे अपहरण करण्यात आले आहे आणि अपहरणकर्त्यांनी त्यांना सोडण्यासाठी खंडणी मागितली आहे. हे तिघेही पंजाबमधील संगरूर, नवांशहर आणि होशियारपूर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यांनी दिल्लीहून विमान प्रवास केला आणि त्यांना वर्क परमिटवर ऑस्ट्रेलियाला पोहोचायचे होते. तथापि, एजंट त्यांना तात्पुरत्या वास्तव्याच्या बहाण्याने इराणला घेऊन गेले. नंतर त्यांचे अपहरण करण्यात आले.
संगरूर येथील रहिवासी हुस्नप्रीतच्या आईने आरोप केला की ट्रॅव्हल एजंटांनी त्यांच्याकडून पैसे घेतले आणि डंकी मार्गाने त्यांना इराणला पाठवले. त्यांनी असेही सांगितले, मुलांचे फोटो आणि व्हिडिओ त्यांच्यासोबत शेअर करण्यात आले आहेत, ज्यामध्ये त्यांचे हात दोरीने बांधलेले आणि त्यांच्या शरीरावर जखमा असल्याचे दिसून आले आहे.
हे ही वाचा :
मुंबई पोलिसाकडून ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश, रायगड जिल्ह्यात ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त
नोटांची बंडले सापडलेल्या न्या. वर्मांविरुद्ध महाभियोगाची शिफारस
मिठी नदी सफाई घोटाळ्यात आदित्य ठाकरेंचा हात!
क्षारसूत्र आणि भगंदर विषयावर डॉ. दोशींनी अमेरिकेत केले मार्गदर्शन
दरम्यान, तरुणांना इराणला पाठवणारा होशियारपूरचा एजंट फरार असल्याची माहिती मिळाली आहे. कुटुंबाने त्याच्याविरुद्ध पोलिसात तक्रारही दाखल केली आहे. बेपत्ता झालेल्यांपैकी एक असलेल्या होशियारपूरच्या अमृतपालच्या कुटुंबीयांनी पंजाबचे कॅबिनेट मंत्री कुलदीप सिंग धालीवाल आणि होशियारपूरचे खासदार डॉ. राजकुमार यांची भेट घेतली आहे आणि त्यांच्या मुलांना सुरक्षितपणे घरी परत आणण्यास मदत करण्याची विनंती केली.
