विरोधकांनी चहापानावर बहिष्कार टाकला, पण त्यांना आता संधी होती. खरेतर, जेव्हा नवीन सरकार बनते त्यावेळी पहिल्या अधिवेशनाला एक सकारात्मक चर्चा आपण करु अशा प्रकारची संधी त्यांना होती. संवाद स्थापित करावा असे विरोधकांनी आपल्या पत्रकार परिषदेत म्हटले. मात्र, चहापानाचा कार्यक्रम हे संवादाचे मोठे माध्यम होते, ज्यावर त्यांनी बहिष्कार टाकला. विरोधकांनी दिलेले संपूर्ण ९ पानी पत्र वर्तमान पत्राच्या बातम्यांवर आधारित आहे, या बातम्यांसोबत सरकारने दिलेला खुलासा जरी वाचला असता तर ते पत्र अर्ध्या पानावर आले असते, असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकारांशी संवाद साधताना विरोधकांना लक्ष्य केले.
राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात होणार आहे. ३ मार्च ते २६ मार्च या कालावधीत अधिवेशन होणार आहे. राज्याचा अर्थसंकल्प १० मार्च रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र, विरोधकांनी नेहमीप्रमाणे चहापानावर बहिष्कार टाकला. यानंतर मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पत्रकार परिषद पार पडली.
रणजी ट्रॉफीमध्ये केरळच्या संघावर मात करून विजय प्राप्त करणाऱ्या विदर्भाच्या टीमचे अभिनंदन करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले. ते म्हणाले, नव्या सरकारचे पहिलेच अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. विरोधी पक्षाने ९ पानांचे पत्र दिले आहे, यामध्ये ९ नेत्यांची नावे मात्र, त्यामध्ये दोन नेत्यांनी सह्याच केलेल्या नाहीत. यावरून विरोधकांमध्ये ‘हम साथ साथ है’ असे दिसत नाही तर ‘हम आपके है कौन?’ अशी परिस्थिती दिसत आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, आमची प्रत्यके गोष्टीला उत्तर देण्याची तयारी आहे. समोर केवळ ५० आमदार आहेत आणि आमच्याकडे बहुमत आहे म्हणून बहुमताच्या जोरावर काम रेटायचे असे अजिबात नाही. अधिवेशन चार आठवड्याचे ठेवले आहे. आरोप-प्रत्यारोप होत असतात, आरोपात तथ्य असेल तर जरूर त्याची दाखल घेतली जाईल. मात्र, कारण नसताना विरोधाला-विरोध करायचा म्हणून आरोप केले तर त्याला किती महत्व द्यायचे हे पण ठरवले जाईल.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, महायुती सरकारचे हे दुसरे अधिवेशन आहे आणि त्यातला हा पहिला अर्थ संकल्प आहे. विरोधकांनी नेहमीप्रमाणे चहापानावर बहिष्कार टाकलेला असला तरी त्यांनी आमच्यासोबत राज्यातील महत्वाच्या प्रश्नांवर, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करावी. विरोधकांच्या प्रश्नाला योग्य उत्तर देण्यात येईल परंतू सूड भावनेतून उगाच टीका केली तर त्याच पद्धतीने उत्तर दिले जाईल असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
महायुतीचे सरकार चांगले काम करत आहे, मात्र, विरोधक काहीच बोलत तसे पण त्यांच्याकडून काहीच अपेक्षा नाहीत. गेल्या अधिवेशनात सभागृहात कमी आणि पायऱ्यांवर जास्त विरोधक दिसले, त्यांना त्यामध्येच जास्त आनंद असतो. मविआने बंद पडलेले सर्व प्रकल्प महायुती सरकारने चालू केले. अनेक योजना सुरु केल्या. राज्याला पुढे नेते सर्व सामन्यांच्या जीवनामध्ये आनंद आणण्याचा प्रयत्न केला.
विरोधकांनी तेच तेच रडगाणे गाण्यापेक्षा आमच्या सोबत यावे विकासाचे गाणे गावे, आम्ही त्यांचे स्वागत करू. विरोधक आणि सत्ताधारी अशी रथाचे दोन चाक आहेत. आमच्या सरकारमध्ये सर्व काही ठीक आहे, कसलं कोल्ड वॉर, सगळं कसं थंडा-थंडा कूल कूल आहे. महाविकास आघाडी महायुतीत हाच एक मोठा फरक आहे. आम्ही सत्तेसाठी एकत्र आलेलो नाही. जनतेच्यासाठी विकासासाठी आम्ही एकत्र आलो आहोत, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
हे ही वाचा :
मुंबई श्री शरीरसौष्ठव स्पर्धा ७ मार्चला रंगणार
नवी मुंबईत ‘छावा’ चित्रपटात मस्करी करणाऱ्यांना प्रेक्षकांनी गुडघ्यांवर बसवले!
महाराष्ट्राच्या शांभवी थिटेने जेएनयूमध्ये दिला डाव्यांना खणखणीत इशारा, व्हीडिओ व्हायरल
मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतलाय, उद्या राजीनामा देतील!
फडणवीस म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्यांना सरकार वाचवणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, छत्रपती शिवराय आमचे आराध्य दैवत आहेत. मला एक आश्चर्य वाटते कि बोलणारे कोण आहेत? तर औरंगजेबाचा महाल जुना झाला आहे त्याचे संवर्धन करा अशी मागणी करणारे, अफझल खानच कसा मोठा होता आणि त्याच्यामुळे शिवाजी महाराज कसे मोठे झाले, इशरत जहांच्या नावाने रुग्णवाहिका सुरु करणारे, असे लोक आहेत.
असे लोक छत्रपती शिवराय काय आहेत ते सांगण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांच्याकडून आम्हाला महाराज समजून घ्यायचे नाहीत. आम्हाला महाराज पुरेपूर माहिती आहेत, महाराजांनी दाखवलेल्या मार्गानेच काम करणारे आम्ही आहोत. आम्ही तिघेही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून काम करत आहोत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.