गेल्या आठवड्यात भारताविरुद्धच्या हल्ल्यादरम्यान पाकिस्तानला शस्त्रास्त्रांसह सर्वात मोठे लष्करी मालवाहू विमान पाठवल्याच्या वृत्तांवर चिनी लष्कराने सोमवारी (१२ मे) भाष्य केले. पीपल्स लिबरेशन आर्मी एअर फोर्सने ही अफवा असल्याचे म्हटले आहे आणि यामागील लोकांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला.
चीनच्या संरक्षण मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या एका निवेदनात, हवाई दलाने स्पष्ट केले की असे कोणतेही अभियान झाले नाही. ‘शियान वाय-२०’ लष्करी वाहतूक विमानाने पाकिस्तानला शस्त्रास्त्रे पुरविले गेले नाहीत. “इंटरनेट कायद्याच्या वर नाही”. जे लोक लष्कराशी संबंधित अफवा निर्माण करून पसरवण्याचे काम करत आहेत त्यांना कायदेशीररित्या जबाबदार धरले जाईल, असे अहवालात म्हटले आहे.
‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान भारताविरुद्ध चिनी लढाऊ विमानांचा वापर केल्याचा पाकिस्तानचा दावा बीजिंगने फेटाळल्यानंतर हे घडले. चीनने आपल्या दहशतवादविरोधी भूमिकेवर भर देत म्हटले होते की, “चीन सर्व प्रकारच्या दहशतवादाला विरोध करतो. आम्ही दोन्ही बाजूंना शांतता आणि स्थिरतेच्या व्यापक हितासाठी कृती करण्याचे, शांत राहण्याचे, संयम बाळगण्याचे आवाहन करतो.”
हे ही वाचा :
बोली का जवाब बोली, गोली का जवाब गोला, प्रधानमंत्र्यांचा हा ‘नवा भारत’
“भारत- पाक युद्धबंदीमध्ये अमेरिकेची भूमिका ही मध्यस्थाची नव्हे तर रचनात्मक”
सेनादलांचे स्पष्ट संकेत, दु:साहस केलेत तर तांडव होणार…
तुर्कस्तानचा निषेध: पुण्यातील व्यापाऱ्यांचा सफरचंदावर बहिष्कार!
दरम्यान, स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट (SIPRI) च्या एका नवीन अहवालानुसार, चीन पाकिस्तानला सर्वात मोठा शस्त्रास्त्र पुरवठादार म्हणून उदयास आला आहे. अहवालानुसार, २०२० ते २०२४ पर्यंत पाकिस्तानने केलेल्या शस्त्रास्त्र खरेदीपैकी ८१ टक्के शस्त्रास्त्रे चीनकडून खरेदी करण्यात आली. या खरेदीमध्ये अत्याधुनिक लढाऊ विमाने, रडार, नौदल जहाजे, पाणबुड्या आणि क्षेपणास्त्रांचा समावेश आहे.
