महाशिवरात्रीच्या मिरवणुकीत लव्ह जिहाद संबंधी चित्ररथ दाखवल्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. बिहारमधील मुंगेर येथे महाशिवरात्री निमित्त मिरवणूक काढण्यात आली होती. यात अनेक चित्ररथ बनवण्यात आले होते आणि संपूर्ण शहरात याची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी बजरंग दलाने महाशिवरात्रीच्या मिरवणुकीत ‘लव्ह जिहाद’ या थीमवर आधारित चित्ररथ तयार केला होता. यामुळे वाद निर्माण झाला आहे.
बिहारच्या मुंगेरमध्ये महाशिवरात्री निमित्त बुधवार, २६ फेब्रुवारी रोजी भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी मिरवणुकीत ५० हून अधिक चित्ररथ या भव्य मिरवणुकीमध्ये सामील झाले होते. संपूर्ण शहरातून या मिरवणुकीने प्रवास केला आणि नंतर माणकेश्वर नाथ महादेव मंदिरात मिरवणुकीचा समारोप करण्यात आला. यात एका चित्ररथात मुस्लिमांनी हिंदू मुलींवर केलेल्या कथित अत्याचारांचे चित्रण केले होते. तसेच रेफ्रिजरेटर ठेवून त्यात कापलेल्या महिलांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या बाहुल्या दाखवण्यात आल्या होत्या. शिवाय हिंदू महिलांवरील गुन्ह्यांच्या बातम्या असणाऱ्या वर्तमानपत्रातील कात्रणे देखील दाखवण्यात आली होती. जर तुम्ही तुमचा धर्म सोडला तर तुमचे तुकडे तुकडे होतील, असे लिहिलेले नारे देखील प्रदर्शित करण्यात आले होते.
या चित्ररथावर विरोधी पक्षांकडून टीका करण्यात आली. राजद नेते मृत्युंजय तिवारी यांनी सत्ताधारी जद(यू) जातीय सलोखा राखण्यात अपयशी ठरल्याचा आरोप केला. “वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. दंगली भडकवण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. महाशिवरात्रीला ‘लव्ह जिहाद’ थीम का दाखवण्यात आली?” असा सवाल त्यांनी केला.
हे ही वाचा :
महाकुंभ- एकतेचा महायज्ञ संपन्न झाला; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना
डॉ. सुनील देवधर यांच्या उपस्थितीत रिडीफायनिंग एम्प्लॉयमेंट २०२५ चे आयोजन
हमासकडून युद्धबंदी कराराअंतर्गत चार ओलिसांचे मृतदेह सुपूर्द
आंतरराष्ट्रीय मदतीवर अवलंबून असलेला देश म्हणत भारताने पाकला सुनावले
दुसरीकडे, हिंदुस्थानी अवाम मोर्चाचे नेते श्याम सुंदर शरण यांनी म्हटले की, अधिकारी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. बिहारमधील कायदा सतर्क असून सरकार प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवून आहे. आम्ही बिहारमधील सुसंवाद बिघडू देणार नाही. प्रत्येकाला आपल्या भावना व्यक्त करण्याचा अधिकार आहे, परंतु सुसंवाद बिघडू नये यासाठी सरकार सतर्क आहे,” असे ते म्हणाले.