न्यूझीलंडचे माजी वेगवान गोलंदाज शेन बॉन्ड यांच्या मते, जर जसप्रीत बुमराहच्या पाठीत पुन्हा त्याच ठिकाणी दुखापत झाली, जिथे त्याची शस्त्रक्रिया झाली होती, तर ती त्याच्या कारकिर्दीसाठी अत्यंत धोकादायक ठरू शकते. बॉन्ड यांचे क्रिकेट करिअरही सातत्याने पाठदुखीच्या दुखापतींमुळे अपेक्षेपेक्षा लवकर संपुष्टात आले होते.
बुमराहने या वर्षाच्या सुरुवातीला सिडनीत झालेल्या न्यू इयर टेस्टनंतर कोणताही सामना खेळलेला नाही. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी तो स्कॅनसाठी मैदानाबाहेर गेला होता. सुरुवातीला ती केवळ स्नायूंच्या ताणाची समस्या असल्याचे सांगण्यात आले होते, परंतु नंतर ते स्ट्रेस फ्रॅक्चर असल्याचे स्पष्ट झाले. याच कारणामुळे बुमराह नुकत्याच संपलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर पडला. बुमराह सध्या बंगळुरूमधील बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये रिहॅब करत आहे, आणि तो आयपीएल २०२५ मध्ये मुंबई इंडियन्ससाठी खेळेल की नाही, याबाबत अद्याप निश्चितता नाही.
बॉन्ड यांनी अनेक वर्षे मुंबई इंडियन्ससाठी बुमराहच्या गोलंदाजी प्रशिक्षकाची भूमिका निभावली आहे. त्यांचे मत आहे की बुमराहच्या कार्यभाराचे योग्य प्रकारे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. जेणेकरून त्याच्या दुखापतीची पुनरावृत्ती होऊ नये. सध्या राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजी प्रशिक्षकाच्या भूमिकेत असलेले बॉन्ड म्हणाले की, जसा बुमराह सिडनी टेस्टच्या दुसऱ्या दिवशी केवळ पाच षटके टाकल्यानंतर स्कॅनसाठी बाहेर गेला, त्याचवेळी त्यांना अंदाज आला की ही दुखापत स्ट्रेस फ्रॅक्चरची असू शकते.
बॉन्ड हे या शतकात पाठदुखीमुळे शस्त्रक्रिया करवून घेणाऱ्या पहिल्या वेगवान गोलंदाजांपैकी एक होते. त्यांनी २९ व्या वर्षी ही शस्त्रक्रिया करवून घेतली होती. जी साधारणतः बुमराहच्या वयासारखीच होती. जेव्हा त्यानेही आपली शस्त्रक्रिया केली. बॉन्ड यांनी ३४ वर्षांपर्यंत दुखापतींशी झुंज देत क्रिकेट खेळले. पण अखेरीस त्यांनी प्रथम कसोटी आणि नंतर सहा महिन्यांच्या आत सर्व प्रकारांतून निवृत्ती घेतली. २०१० मध्ये द क्रिकेट मंथलीसोबतच्या संवादात बॉन्ड म्हणाले होते, “जेव्हा मी सलग काही सामने खेळायचो. तेव्हा माझे शरीर साथ देत नसे आणि सततच्या रिहॅबमुळे मी थकलो होतो.”
बॉन्ड यांनी स्पष्ट केले की, वेगवान गोलंदाजांसाठी सर्वात जास्त दुखापतींचा धोका तेव्हा असतो. जेव्हा ते टी२० क्रिकेटमधून थेट कसोटी क्रिकेटमध्ये झपाट्याने बदल करतात. हीच बाब त्यांना बुमराहबाबत चिंताजनक वाटते. कारण भारताला जून महिन्यात इंग्लंडमध्ये पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. जी आयपीएल संपल्यानंतर अवघ्या एका महिन्याच्या आत सुरू होईल.
बॉन्ड म्हणाले, “माझ्या मते बुमराह ठीक राहील. पण बुमराह पूर्णपणे त्यांच्या कार्यभार व्यवस्थापनावर अवलंबून असेल. कार्यक्रम आणि आगामी दौरे पाहता, त्याला कुठे विश्रांती द्यायची आणि कुठे त्याच्यासाठी जास्त धोका आहे, हे ठरवणे गरजेचे आहे. आयपीएलमधून थेट कसोटी क्रिकेटमध्ये जाणे मोठा धोका असू शकतो.”
हेही वाचा :
रोहित निवृत्त होणार नाही, २०२७ वनडे विश्वचषक खेळणार!
दिल्लीमधून २० हून अधिक बांगलादेशी नागरिकांना अटक
न्यूयॉर्कमध्ये फिलिस्तीन समर्थक आक्रमक
भारताचा इंग्लंड दौरा अत्यंत व्यस्त असेल, जिथे २८ जून ते ३ ऑगस्ट दरम्यान पाच कसोटी सामने खेळले जाणार आहेत. बॉन्ड म्हणाले की भारत आणि बुमराहने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासारखी परिस्थिती निर्माण करू नये, जिथे त्याने पाच कसोटी सामन्यांमध्ये एकूण १५१.२ षटके टाकली होती, ज्यापैकी ५२ षटके केवळ मेलबर्नच्या बॉक्सिंग डे कसोटीत केली होती. पुढील नियोजनाबाबत बोलताना, बॉन्ड म्हणाले की ते बुमराहला सलग दोनहून अधिक कसोटी सामने खेळताना पाहू इच्छित नाहीत.
“बुमराह आगामी विश्वचषक आणि अन्य मोठ्या स्पर्धांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे इंग्लंडमध्ये होणाऱ्या पाच कसोटी सामन्यांच्या पार्श्वभूमीवर मी त्याला सलग दोनहून अधिक सामने खेळायला लावणार नाही. आयपीएलनंतर थेट कसोटी क्रिकेटमध्ये प्रवेश करणे त्याच्यासाठी खूप मोठा धोका असेल. त्याचे व्यवस्थापन कसे करायचे, हाच खरा प्रश्न आहे.”
“जर आम्ही त्याला संपूर्ण इंग्लंड दौऱ्यात तंदुरुस्त ठेवू शकलो, तरच मला खात्री असेल की तो इतर फॉरमॅट्समध्येही फिट राहू शकेल. पण जर त्याला पुन्हा त्याच ठिकाणी दुखापत झाली, तर त्याच्या कारकिर्दीसाठी ते फार मोठे नुकसान ठरू शकते, कारण त्या ठिकाणी पुन्हा शस्त्रक्रिया करणे अत्यंत कठीण असेल.”