भारताचा पासपोर्ट पुन्हा एकदा जागतिक क्रमवारीत घसरला आहे. जुलै २०२६ मधील हेनली पासपोर्ट इंडेक्सनुसार भारतीय पासपोर्ट आता ८१व्या क्रमांकावर पोहोचला असून भारतीय नागरिकांना ५५ देशांमध्ये व्हिसामुक्त, व्हिसा-ऑन-अरायव्हल किंवा ई-व्हिसाच्या सुविधेसह प्रवास करता येतो. जून २०२६ मध्ये भारत ८०व्या स्थानावर होता, तर फेब्रुवारीमध्ये तो ७५व्या स्थानावर पोहोचला होता. मात्र वर्षभरात पुन्हा घसरण झाल्याने भारताच्या जागतिक प्रवास स्वातंत्र्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
हेनली पासपोर्ट इंडेक्स हा जगातील सर्वाधिक विश्वासार्ह पासपोर्ट क्रमवारींपैकी एक मानला जातो. इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन (IATA) च्या डेटाच्या आधारे हा निर्देशांक तयार केला जातो. कोणत्याही देशाच्या नागरिकांना पूर्वपरवानगीशिवाय किती देशांमध्ये प्रवेश मिळू शकतो, यावरून त्या देशाच्या पासपोर्टची ताकद निश्चित केली जाते.
हे ही वाचा:
नाशिकमध्ये गोदावरीला मोसमातील सर्वात मोठा पूर
महिला आंदोलकाला थप्पड मारणे भोवले
कॉक्रोच जनता पार्टीचे २४ जुलै रोजी देशव्यापी आंदोलन
पन्नूसोबत चर्चेनंतर दिपकेला भरला ताप
अहवालानुसार गेल्या दोन दशकांत भारतीय पासपोर्टच्या ताकदीत चढ-उतार दिसून आले आहेत. २००६ मध्ये भारत ७१व्या स्थानावर होता. त्यानंतर क्रमवारीत सातत्याने घसरण होत २०२१ मध्ये भारत ९१व्या स्थानावर पोहोचला होता. अलीकडील काही वर्षांत सुधारणा झाली असली तरी यंदाच्या जुलै अद्ययावतनात भारत पुन्हा ८१व्या स्थानावर घसरला आहे.
दरम्यान, जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्टचा मान पुन्हा एकदा सिंगापूरने कायम राखला आहे. सिंगापूरच्या नागरिकांना १९२ देशांमध्ये व्हिसामुक्त प्रवेशाची सुविधा उपलब्ध आहे. त्यानंतर जपान, दक्षिण कोरिया आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) यांचा क्रमांक लागतो. दुसरीकडे अफगाणिस्तानचा पासपोर्ट सर्वात कमकुवत ठरला आहे.
तज्ज्ञांच्या मते, एखाद्या देशाच्या पासपोर्टची ताकद ही त्या देशाचे आंतरराष्ट्रीय संबंध, परराष्ट्र धोरण, द्विपक्षीय करार आणि जागतिक स्तरावरील विश्वासार्हता यांचे प्रतिबिंब असते. त्यामुळे भारताची क्रमवारी घसरली असली तरी भविष्यात अधिक देशांबरोबर व्हिसा सुलभता करार झाल्यास भारतीय पासपोर्टची ताकद पुन्हा वाढू शकते.







