आज पासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली असून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये खडाजंगी होण्याची शक्यता आहे. पुण्यातील स्वारगेट बलात्कार प्रकरण, संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडला अटक, कृषीमंत्री असताना मुंडेंच्या कार्यकाळात झालेला भ्रष्टाचाराचा आरोप, कृषिमंत्री माणिकराव कोकाटेना दोन वर्षांची झालेली शिक्षा, पाच लाख लाडक्या बहिणींना अपात्र करणे यांसारख्या मुद्यांवरून विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याच्या तयारीत आहे. याच दरम्यान, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हातात बेड्या घालून अधिवेशनाला पोहोचले. विधान भवन परिसरात त्यांनी आंदोलन केले. ‘या बेड्या घालून स्वातंत्र्याला कैद्यात टाकले जातंय, त्याच्याविरुद्धचा हा निषेध आहे,’ असे यावेळी जितेंद्र आव्हाड म्हणाले.
प्रसार माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर जो घाला घातला जातोय. ज्या पद्धतीने व्यक्त होणाऱ्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करुन त्यांचे आवाज बंद केले जात आहेत, ती पद्धत चूकीची आहे. आमचा संवैधानिक अधिकार आहे. आम्हाला व्यक्त होता आलच पाहिजे. आमचे मूलभूत अधिकार शाबूत राहिले पाहिजेत म्हणून या बेडया आहेत, असे आव्हाड म्हणाले.
हे ही वाचा :
पंतप्रधान मोदींची गीर वन्यजीव अभयारण्यातील जंगल सफारी!
केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीच्या छेडछाड प्रकरणी तिघांना अटक!
विद्यार्थ्यांच्या स्मार्टफोन वापरासाठी मार्गदर्शक तत्त्वे
काँग्रेस कार्यकर्ता हिमानी नरवाल हत्या प्रकरणी एकाला अटक!
या बेड्या यासाठीपण आहेत, अमेरिकेमध्ये भारतीयांवर अन्याय होत आहे. व्हिसाच्या बाबतीत ट्रम्प सरकारने आखलेले धोरण अनेक भारतीयांचे घर-संसार उध्वस्त करणारे आहेत. भारतीयांना कोंबून विमानातून पाठवले, पायात साखळदंड, हातात हतकड्या, शौचालयास जागा नाही आणि उपाशी ठेवणे. भारतीयांचा हा अपमान करण्याचा प्रकार होता. अमेरिकेमध्ये जाऊन मोठे होण्याचे स्वप्न बघणाऱ्या मराठी माणसांची स्वप्ने आता उध्वस्त होताना दिसत आहेत.
बेड्यांविरुद्ध आपण बोलणारच नसू, अमेरिकेच्या अन्यायावर व्यक्त होत नसू तर अमेरिका आपल्याला गिळून टाकेल. अमेरिकेत आपले बांधव काय यातना भोगतायत त्यासाठी या बेड्या हातात घातल्या आहेत आणि अमेरीकेविरुद्ध आवाज उठवायला शिका, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.