जागतिक वन्यजीव दिनानिमित्त सोमवारी (३ मार्च ) सकाळी गुजरातमधील जुनागड जिल्ह्यातील गीर वन्यजीव अभयारण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जंगल सफारीचा आनंद घेतला. सोमनाथहून परतल्यानंतर, पंतप्रधान मोदींनी सासनमधील वन अतिथीगृह ‘सिंह सदन’ येथे रात्र काढली. त्यानंतर रविवारी संध्याकाळी त्यांनी सोमनाथ मंदिरात भगवान शिवाची पूजा केली.
‘सिंह सदन’ येथून पंतप्रधान मोदी काही मंत्री आणि वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांच्यासोबत जंगल सफारीला गेले. गिर वन्यजीव अभयारण्याचे मुख्यालय असलेल्या सासन गिर येथे राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या (NBWL) सातव्या बैठकीचे अध्यक्षस्थान पंतप्रधान मोदी भूषवणार आहेत.
एनबीडब्ल्यूएलमध्ये ४७ सदस्य आहेत, ज्यात लष्करप्रमुख, विविध राज्यांचे सदस्य, क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, मुख्य वन्यजीव रक्षक आणि विविध राज्यांचे सचिव यांचा समावेश आहे. या बैठकीनंतर, पंतप्रधान मोदी सासनमधील काही महिला वन कर्मचाऱ्यांशीही संवाद साधणार आहेत.
पंतप्रधान मोदींनी गिर वन्यजीव अभयारण्यातील जंगल सफारी करताना अनेक छायाचित्रे काढली. सफारीचे फोटो त्यांनी सोशल मिडीयावर शेअर केले आहेत. यामध्ये विविध फोटोंसह सिंह आणि सिंहीणीसह बछड्यांचा फोटो त्यांनी शेअर केला आहे. तसेच त्यांनी आणखी एक ट्वीटकरत गेल्या दशकात, वाघ, बिबटे, गेंडे यांची संख्याही वाढली असल्याचे म्हटले. वाढलेल्या संख्येवरून आपण वन्यजीवांना किती प्रेम करतो आणि प्राण्यांसाठी शाश्वत अधिवास निर्माण करण्यासाठी काम करत आहोत हे दिसून येत असल्याचे त्यांनी म्हटले.
हे ही वाचा :
दरम्यान, केंद्र सरकारने आशियाई सिंहांच्या संवर्धनासाठी ‘प्रोजेक्ट लायन’ अंतर्गत २,९०० कोटी रुपयांहून अधिक निधी मंजूर केला आहे, असे एका सरकारी निवेदनात म्हटले आहे. या सिंहांचे एकमेव अधिवास गुजरात आहे. दरम्यान, रविवारी पंतप्रधान मोदींनी रिलायन्स जामनगर रिफायनरी कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या ‘वंतारा’ या प्राणी बचाव, संवर्धन आणि पुनर्वसन केंद्राला भेट दिली. हे बचाव केंद्र बंदिवान हत्ती आणि वन्यजीवांच्या कल्याणासाठी समर्पित आहे, जे गैरवर्तन आणि शोषणातून सुटका केलेल्या प्राण्यांना आश्रय, पुनर्वसन आणि वैद्यकीय सेवा प्रदान करते.