पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवार, १७ जानेवारी रोजी ‘भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो २०२५’ चे उद्घाटन केले. यावेळी नरेंद्र मोदींनी एक्स्पोमध्ये उपस्थितांना संबोधित केले. हे भारतातील सर्वात मोठे मोबिलिटी एक्स्पो असून यामध्ये १०० हून अधिक नवीन लॉन्च होण्याची अपेक्षा आहे.
भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो २०२५ ला संबोधित करताना, नरेंद्र मोदी म्हणाले की, येत्या पाच ते सहा दिवसात मोठ्या संख्येने लोक येथे येतील आणि अनेक नवीन वाहने देखील लॉन्च केली जातील. यावरून भारतातील ऑटोमोटिव्ह उद्योग भविष्याबाबत किती सकारात्मक आहे हे दिसून येते. तसेच यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रतन टाटा आणि ओसामू सुझुकी यांचे स्मरण करताना म्हटले की, “रतन टाटा आणि ओसामू सुझुकी यांची आठवण या मोठ्या कार्यक्रमात येत आहे. या दोन्ही महान व्यक्तींनी भारताच्या मध्यमवर्गाची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आणि भारताच्या ऑटो क्षेत्राच्या वाढीसाठी खूप मोठे योगदान दिले आहे. यापुढेही रतन टाटा आणि ओसामू सुझुकी यांचा वारसा भारताच्या संपूर्ण मोबिलिटी क्षेत्राला प्रेरणा देत राहील,” असा विश्वास नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.
नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, आजचा भारत आकांक्षा आणि तरुणांच्या ऊर्जेने भरलेला आहे आणि भारताच्या ऑटोमोटिव्ह उद्योगात या आकांक्षा स्पष्टपणे दिसत आहेत. गेल्या काही वर्षांत भारतातील वाहन उद्योग सुमारे १२ टक्क्यांनी वाढला आहे. ‘मेक इन इंडिया’ जगात असे अनेक देश आहेत ज्यांची एकूण लोकसंख्या भारतात दरवर्षी होणाऱ्या वाहनांच्या विक्रीपेक्षा कमी आहे. हे दर्शविते की भारतात मागणी किती वाढत आहे, म्हणूनच जेव्हा मोबिलिटीच्या भविष्याचा विचार केला जातो तेव्हा भारताकडे अशा मोठ्या आशेने पाहिले जाते.”
हे ही वाचा:
इस्कॉनचे दक्षिण आफ्रिकेतील पहिले संन्यासी महाकुंभ मेळ्यासाठी दाखल
पकडला… सैफ हल्लाप्रकरणी एक संशयित ताब्यात
खराब कामगिरीनंतर बीसीसीआयची खेळाडूंवर १० नियमांची वेसण
तैवानच्या हद्दीत दिसली १३ चीनी विमाने, सात चीन नौदलाची जहाजे!
“मेक इन इंडिया उपक्रमाने वाहन उद्योगाच्या विकासात मोठी भूमिका बजावली आहे. मेक इन इंडिया उपक्रमाला पीएलआय योजनेतून गती मिळाली आहे. पीएलआय योजनेमुळे २.२५ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त विक्री करण्यात मदत झाली आहे. या योजनेमुळे ऑटो सेक्टरमध्ये १.५ लाखांहून अधिक थेट नोकऱ्या मिळाल्या आहेत, असे ते म्हणाले. भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो २०२५ चे उद्दिष्ट हे शाश्वत आणि अत्याधुनिक तांत्रिक प्रगतीवर भर देऊन ऑटोमोटिव्ह आणि मोबिलिटी क्षेत्रात सहकार्य आणि नवकल्पना वाढवणे आहे. हा एक्स्पो १७ ते २२ जानेवारी दरम्यान तीन वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित केला जात आहे.