बिहारमधील दरभंगा येथील आंबेडकर वसतिगृहात परवानगीशिवाय कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्याविरुद्ध दोन एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष दिलीप जयस्वाल यांनी टीका केली आहे.
शुक्रवारी (१६ मे) पाटणा येथे वृत्तसंस्थेशी बोलताना दिलीप जयस्वाल म्हणाले, राहुल गांधी यांनी बिहारच्या भूमीवर येऊन कायदा मोडण्याचा प्रयत्न केला. ते सरकारी वसतिगृहात गेले आणि कोणत्याही परवानगीशिवाय राजकीय कार्यक्रम आयोजित केला. अशा परिस्थितीत एफआयआर नोंदवणे स्वाभाविक आहे. राहुल गांधी हे काही देव नाहीत की त्यांच्यावर कारवाई होऊ शकत नाही. त्यांना थेट तुरुंगात पाठवले पाहिजे.
दिलीप जयस्वाल यांनी राहुल गांधींवर आरोप करत म्हटले, ते कायद्याच्या विरोधात जाऊन सरकारी इमारतींमध्ये राजकीय उपक्रम राबवत आहेत आणि असे करून त्यांना जनतेची सहानुभूती मिळेल असा भ्रम आहे. जयस्वाल पुढे म्हणाले, राहुल गांधींना वाटते असेल की जर त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला तर त्यांना जनतेची सहानुभूती मिळेल. पण तो त्यांचा गैरसमज आहे.
ते पुढे म्हणाले, बिहार ही भगवान बुद्धांची भूमी आहे, महावीरांची भूमी आहे, चाणक्यांची भूमी आहे आणि ही ती भूमी आहे जिथे लोकनायक जयप्रकाश नारायण आणि बाबू कुंवर सिंह सारख्या महापुरुषांचा जन्म झाला. बिहारचे लोक इतके भोळे नाहीत की त्यांना कोणीही मूर्ख बनवू शकेल.
हे ही वाचा :
राऊतांचे पुस्तक म्हणजे चित्रपटाची स्क्रिप्ट!
मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेची धुरा सहपोलिस आयुक्तांच्या खांद्यावर
दिल्लीत १३ बांगलादेशी घुसखोरांना अटक!
भाजपा आमदार रवींद्र सिंह नेगी यांनी बेटिंग सेंटरवर चालवला बुलडोझर!
दरम्यान, यापूर्वी, जयस्वाल यांनी राहुल गांधींच्या बिहार दौऱ्यावर टिप्पणी केली होती. ते म्हणाले, म्हटले होते की, राहुल गांधी त्यांच्या पूर्वजांच्या चुकांचे प्रायश्चित्त करण्यासाठी आले आहेत. बिहारमध्येच मोक्ष मिळतो. ते पुढे म्हणाले, राहुल गांधी दलितांकडे जात आहेत आणि काँग्रेस ६५ वर्षे सत्तेत होती पण दलित बांधवांची स्थिती सुधारली नाही याबद्दल माफी मागत आहेत. काँग्रेसने कधीही दलितांच्या प्रगतीसाठी काम केले नाही.
