भारतीय फलंदाज श्रेयस अय्यरला सिडनीतील रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. 25 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात कॅच घेताना तो जखमी झाला होता.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे,
“श्रेयसची प्रकृती आता स्थिर आहे आणि तो चांगल्या प्रकारे बरा होत आहे. बीसीसीआयची मेडिकल टीम तसेच सिडनी आणि भारतातील तज्ञ डॉक्टर त्याच्या प्रकृतीबद्दल समाधानी आहेत. त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.”
मैदानावर पडल्यामुळे अय्यरच्या प्लीहा (स्प्लीन) ला गंभीर दुखापत झाली होती, ज्यामुळे आंतररक्तस्राव (internal bleeding) झाला. तत्काळ उपचार सुरू करून त्याला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं होतं. किरकोळ शस्त्रक्रियेनंतर रक्तस्रावावर नियंत्रण मिळवलं गेलं.
बीसीसीआयने उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे, विशेषत: सिडनीतील डॉ. कौरौश हाघीगी आणि त्यांच्या टीमचे, तसेच भारतातील डॉ. दिनशॉ पारदीवाला यांचे आभार मानले आहेत.
“श्रेयस आता फॉलोअपसाठी सिडनीतच राहणार आहे. तो पूर्णपणे बरा झाल्यानंतरच भारतात परतणार आहे,” असं बीसीसीआयने स्पष्ट केलं.
हेही वाचा :
हाशिम बाबा गँगच्या मिस्बाहच्या हत्येप्रकरणी दोघांना अटक
डार्क चॉकलेट, बेरीज स्मरणशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त
छत्तीसगडच्या नवीन विधानसभेचे पंतप्रधानांनी केले उद्घाटन
दहशतवादावर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल काय म्हणाले?
श्रेयस अय्यरने स्वतःही सोशल मीडियावर चाहत्यांचे आभार मानत म्हटलं आहे –
“मी अजूनही बरे होण्याच्या प्रक्रियेत आहे. प्रत्येक दिवसासोबत माझी तब्येत सुधारते आहे. तुमच्या शुभेच्छा आणि पाठिंब्याबद्दल मी मनःपूर्वक आभारी आहे. हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे.”
दरम्यान, भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलियात ५ सामन्यांच्या टी२० मालिकेत व्यस्त असून टीम इंडिया सध्या ०-१ ने पिछाडीवर आहे.







