LIC हे काय छोटं मोठं प्रकरण नाही. LIC ची उलाढाल (AUM) ५१.२१ लाख कोटी रुपये किंवा ६१४.२१ अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी आहे. ही रक्कम पाकिस्तानच्या GDP पेक्षा जवळजवळ दुप्पट आहे. त्यामुळे एलआयसीचे नेतृत्व करणं ही काही सामान्य बाब नाहीये. भारतीय जीवन विमा महामंडळाचे (LIC) अध्यक्ष सिद्धार्थ मोहंती यांनी हे शिवधनुष्य गेली अनेक वर्ष लीलया पेलले आहे.
मोहंती हे केवळ कुशल प्रशासक नाहीत, ते एक दूरदृष्टी असलेले, संवेदनशील आणि प्रेरणादायक व्यक्तिमत्त्व आहेत. LIC ला एका नव्या उंचीवर नेण्याचं काम त्यांनी केले आहे. हा माणूस मोठी स्वप्न पाहतो आणि ती प्रत्यक्षात सुद्धा आणतो. मी प्रत्येक भेटीत त्यांचे निरीक्षण करत असतो. त्यांच्या वागण्या बोलण्यातून, वावरण्यातून शिकण्याचा प्रयत्न करत असतो. व्यावसायिक चौकटीत राहून लोकांशी उत्तम संबंध कसे बनवता येतात, हे त्यांच्याकडूनच शिकावं.
दमदार यशस्वी प्रवास…
सिद्धार्थ मोहंती यांचा LIC मध्ये प्रवास अत्यंत उल्लेखनीय आहे. विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळत त्यांनी आपल्या नेतृत्वगुणांचा ठसा निर्माण केला आहे. त्यांनी LIC च्या CEO आणि MD पदावर काम करत असताना कंपनीला नव्या उंचीवर नेलं. पारंपरिक विमा व्यवसायाबरोबरच त्यांनी डिजिटल क्षेत्रात LIC ला अधिक सक्षम केलं आणि तरुण ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रभावी प्रयत्न केला.
त्यांच्या नेतृत्वात LIC च्या IPO ची तयारी आणि त्याची अंमलबजावणी ही एक महत्त्वपूर्ण टप्पा होता. ही जबाबदारी त्यांनी अत्यंत कौशल्याने हाताळली. त्यांच्या नेतृत्वाखाली LIC ने भारतीय शेअर बाजारात ऐतिहासिक शिरकाव केला. त्यानंतरच, LIC ने Fortune Global 500 यादीत स्थान मिळवून जागतिक मंचावर भारतीय विमा उद्योगाचा झेंडा रोवला — आणि त्याचे श्रेय प्रामुख्याने सिद्धार्थजींच्या दूरदृष्टीला दिलं गेलं.
हे ही वाचा:
प्री-डायबेटीसचा धोका कसा दर्शवला जातो!
हैजाच्या वाढत्या धोका : सूडानमध्ये मानवी गरजा वाढल्या
उत्तर कोरियाचा रशियाला बिनशर्त समर्थन
बालीमध्ये लवकरच बंदी प्लास्टिक पाण्याच्या बाटल्यांवर
डिजिटल आघाडीवर मजबुती
सिद्धार्थ मोहंती यांनी LIC मध्ये डिजिटल क्रांती घडवून आणली. LIC मोबाइल अॅप, ऑनलाईन पॉलिसी सर्व्हिसेस, AI-आधारित सेवा सुधारणा, आणि क्लेम प्रोसेसिंगचं डिजिटलायझेशन यांसारख्या नाविन्यपूर्ण उपक्रमांनी LIC अधिक ग्राहक-केंद्रित आणि पारदर्शक बनलं. त्यांच्या मते, तंत्रज्ञान हे सामान्य नागरिकांपर्यंत विमा सेवा पोहोचवण्याचं महत्त्वाचं माध्यम आहे.
कोविड काळातील नेतृत्व आणि CSR योगदान
कोविड-१९ च्या कठीण काळात त्यांनी LIC चं संचालन अत्यंत संतुलितपणे केलं. ऑनलाईन सेवा, विशेष सवलती आणि कर्मचार्यांच्या सुरक्षेसाठी राबवलेले उपाय यांनी LIC चं सामाजिक उत्तरदायित्व अधोरेखित केलं. त्यांच्या प्रेरणेमुळे LIC ने CSR अंतर्गत आरोग्य शिबिरे, शैक्षणिक सहाय्यता, महिला सक्षमीकरण आणि नैसर्गिक आपत्तीत मदत अशा उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला.
अफाट व्यक्तिमत्त्वाचे धनी…
मोहंती यांचं व्यक्तिमत्त्व म्हणजे शिस्त, दृष्टी, आणि नम्रतेचं अद्वितीय मिश्रण आहे. इतक्या उच्च पदावर असतानाही त्यांच्यातील साधेपणा, प्रत्येकाचे ऐकून घेण्याची, समजून घेण्याची वृत्ती. लोकांमध्ये वावरताना असलेली सहजता, या काही खास गुणांमुळे सर्वांच्या मनात घर करतात. जेव्हा जेव्हा मी त्यांना भेटलो तेव्हा या बाबी मला अत्यंत ठळकपणे जाणवल्या. हा एक मोठ्या मनाचा माणूस आहे
वडीलधारे व्यक्तिमत्व…
अनेकदा कामानिमित्त मी त्यांना भेटलो. आता तर औपचारिकता संपून स्नेहाचे नाते निर्माण झाले आहे. माझ्या ते एक प्रेमळ आणि वडीलधारे व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांच्याबद्दल मनात कायमच जिव्हाळा आणि आदरभाव राहिलेला आहे. प्रत्येक भेटीत मला त्यांच्या विचारांची स्पष्टता भावली. त्यांच्या संवेदनशीलतेची प्रचिती आली. “कोणतही धोरणं राबवताना आधी माणसांचा विचार करायला हवा.” हा त्यांचा सल्ला मी माझ्या कामकाजात रुजवला आहे. त्याचे मला बरेच फायदे झालेले आहेत. त्यांच्या शब्दांतून, वागणुकीतून जे व्यक्त होतं की मी नेहमीच टिपण्याचा प्रयत्न करतो. मी त्यांच्याकडे नेहमीच मार्गदर्शक, हितचिंतक आणि मित्र म्हणून पाहत असतो.
LIC चे नेतृत्व करताना त्यांनी लाखो सर्वसामान्य लोकांचं भविष्य घडवण्याचं महान कार्य आहे. त्यांच्या कार्याची व्याप्ती केवळ आर्थिक क्षेत्रात मर्यादित नाही, तर सामाजिक आणि नैतिक मूल्यांच्या जपणुकीतही ते आघाडीवर आहेत. या महिन्याच्या सहा तारखेला ते निवृत्त होत आहेत. त्यांच्या जीवनातील दुसरी इनिंग सुरू होते आहे. ती पहिल्यापेक्षाही उत्तुंग आणि यशस्वी असेल हे स्पष्टच आहे. माझ्यासारख्या अनेकांसाठी ते प्रेरणास्थान आहेत. त्यांच्याशी असलेलं स्नेहबंध माझ्या जीवनातील अमूल्य ठेवा आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मी मन:पूर्वक शुभेच्छा देतो – त्या अजून नव्या उंचीवर पोहोचो आणि समाजासाठी सदैव प्रेरणा ठरावेत.
