भारतामध्ये जातीनिहाय जनगणना कधी होणार, याबाबत आता अधिकृत तारीख समोर आली आहे. देशात जातीय जनगणना दोन टप्प्यांमध्ये केली जाईल. पहिला टप्पा १ ऑक्टोबर २०२६ पासून सुरू होणार असून दुसरा टप्पा १ मार्च २०२७ पासून सुरू होईल. पहिल्या टप्प्यात चार राज्यांमध्ये जातीनिहाय जनगणना केली जाणार आहे. यात उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, लडाख आणि जम्मू-काश्मीर या डोंगराळ भागांचा समावेश आहे. भारतात याआधी शेवटची जनगणना २०११ मध्ये झाली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत जातीनिहाय जनगणनेस मंजुरी देण्यात आली होती. केंद्र सरकारच्या या निर्णयाची माहिती देताना केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, काँग्रेस सरकारांनी याआधी जातीनिहाय जनगणनेला विरोध केला होता. १९४७ नंतर अजूनही जातीनिहाय जनगणना झालेली नाही. काँग्रेस सरकारांनी केवळ जातीय सर्वेक्षण केले, अनेक राज्यांनी राजकीय हेतूने जातीनिहाय सर्वेक्षण केले आहे. जनगणना हा विषय संविधानातील अनुच्छेद २४६ अंतर्गत केंद्राच्या यादीत ६९व्या क्रमांकावर असून, तो केंद्राचा विषय आहे. काही राज्यांनी मात्र आपापल्या स्तरावर सर्वेक्षण करून जातीनिहाय माहिती गोळा केली होती. काही राज्यांमध्ये हे काम व्यवस्थित पार पडले तर काहींनी हे राजकीय हेतूने व अपारदर्शक पद्धतीने केले.
हेही वाचा..
लेफ्टनंट कर्नल त्यांच्या कुटुंबासह तीन अन्य सैन्य कर्मचारी भूस्खलनानंतर बेपत्ता
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांचा इटली दौरा सुरु
आरसीबीच्या विजयाच्या उत्सवादरम्यान बेंगळुरू स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरी, १० जणांचा मृत्यू!
बंगबंधू शेख मुजीबुर रहमान आता ‘स्वातंत्र्यसैनिक’ नाहीत !
PIB च्या निवेदनानुसार, जातीनिहाय जनगणनेसह देशातील २०२७ ची जनगणना दोन टप्प्यांमध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जनगणना २०२७ साठी संदर्भ तारीख मार्च २०२७ चा पहिला दिवस (००:०० वाजता) असेल. केंद्रशासित प्रदेश लडाख आणि जम्मू-काश्मीर, तसेच हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड राज्यांतील बर्फाच्छादित असमकालिक भागांसाठी संदर्भ तारीख ऑक्टोबर २०२६ असेल. जनगणना कायदा, १९४८ मधील कलम ३ नुसार या संदर्भ तारीख आणि उद्देशाबाबत अधिसूचना १६ जून २०२५ रोजी अधिकृत राजपत्रात प्रसिद्ध केली जाण्याची शक्यता आहे.
निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की, भारतातील जनगणना ही जनगणना अधिनियम, १९४८ व जनगणना नियम, १९९० अंतर्गत केली जाते. २०११ मधील शेवटची जनगणना दोन टप्प्यांमध्ये झाली होती:
टप्पा I – घरांची यादी (एचएलओ): १ एप्रिल ते ३० सप्टेंबर २०१०
टप्पा II – जनगणना (पीई): ९ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी २०११
तसेच जम्मू-काश्मीर, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशातील बर्फाच्छादित भागांमध्ये ती ११ ते ३० सप्टेंबर २०१० दरम्यान झाली होती, ज्याची संदर्भ तारीख होती १ ऑक्टोबर २०१०.
जनगणना २०२१ देखील अशाच प्रकारे दोन टप्प्यांत करणे प्रस्तावित होते – पहिला टप्पा एप्रिल ते सप्टेंबर २०२० दरम्यान, आणि दुसरा टप्पा फेब्रुवारी २०२१ मध्ये. त्यासाठी सर्व तयारी पूर्ण झाली होती आणि १ एप्रिल २०२० पासून काही राज्यांमध्ये क्षेत्रीय काम सुरू होणार होते. मात्र, कोविड-१९ महामारीच्या उद्रेकामुळे ही प्रक्रिया पुढे ढकलावी लागली.
