भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर पाकिस्तानच्या सहयोगींची भूमिका आता समोर येत आहे. भारतावर हल्ला करण्यासाठी तुर्कीने पाकला ड्रोन दिल्याचे समोर आले होते. मात्र, भारतासमोर तुर्कीच्या ड्रोनची हवा चाललीच नाही. भारताने ती सर्व नष्ट करून टाकली. याच दरम्यान, तुर्कीबाबत आणखी एक मोठी माहिती समोर आली आहे. भारताच्या लष्करी कारवाई दरम्यान दोन तुर्की लष्करी जवान मारले गेल्याचे सूत्रांनी इंडिया टुडे टीव्हीला सांगितले आहे. यावरून हे स्पष्ट होते कि तुर्कीने केवळ तुर्की शस्त्रेच नव्हे तर भारताविरुद्धच्या युद्धात ऑपरेटर देखील पाठवले होते.
इंडिया टुडेच्या बातमीनुसार, ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू झाल्यानंतर तुर्कीच्या सल्लागारांनी पाकिस्तानी लष्कराच्या अधिकाऱ्यांना भारतावर ड्रोन हल्ल्यांचे समन्वय साधण्यास मदत केली. ७ आणि ८ मे च्या रात्री पाकिस्तानने भारताच्या उत्तर आणि पश्चिम सीमेवर सुमारे ३०० ते ४०० तुर्कीनिर्मित ड्रोनचा हल्ला केला होता. यामध्ये ‘बायरक्तार टीबी२’ आणि ‘यिहा’ ड्रोनचा वापर केल्याचे वृत्त आहे. सूत्रांनी सांगितले की, तुर्की सल्लागारांनी पाकिस्तानी सैन्याला भारतावर ड्रोन हल्ले करण्यात मदत केली होती. भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईत दोन तुर्की ड्रोन ऑपरेटर मारले गेले.
दरम्यान, “ड्रोनच्या अवशेषांची फॉरेन्सिक तपासणी केली जात आहे. सुरुवातीच्या अहवालांवरून असे दिसून येते की ते तुर्की अॅसिसगार्ड सोंगर ड्रोन आहेत,” असे लष्कराच्या प्रवक्त्या कर्नल सोफिया कुरेशी यांनी ऑपरेशन सिंदूरवरील पत्रकार परिषदेत सांगितले. त्यांनी असेही सांगितले की, भारतीय सशस्त्र दलांनी चोख प्रत्युत्तर देत हे ड्रोन निष्क्रिय केले.
