टेस्ला आणि स्पेसेक्सचे सर्वेसर्वा असलेल्या इलॉन मस्क यांचा २८ जूनला ५४ वा वाढदिवस. या वाढदिवसाचे औचित्य साधून एका भारतीय चाहत्याने त्यांना एक अनोखे बर्थडे गिफ्ट दिले आहे. मस्क यांचा भारतीय चाहता आणि युवा लेखक असलेल्या विवान कारुळकरने मस्क यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने “इलॉन मस्क: द मॅन हू बेंड्स रिऍलिटी” हे विशेष पुस्तक लिहिले असून त्याचे सॉफ्ट लॉन्चिंग आज शनिवारी केले जाणार आहे. मस्क यांच्या वाढदिवशी हे पुस्तक अमेरिकेला रवाना करण्यात आले आहे. विवानने वयाच्या १५व्या वर्षापासून सनातन धर्म, विज्ञान, तंत्रज्ञान यांची सांगड घालणारी दोन पुस्तके लिहिली. त्याचे हे तिसरे पुस्तक आहे.
विवानने वयाच्या आठव्या वर्षापासून मस्क यांच्याकडे आदर्श म्हणून पाहिले आहे. गेल्या दहा वर्षांत त्याने मस्क यांचे जीवन, त्यांचे ध्येय आणि नवतेला साजेशी विचारसरणी यांचा सखोल अभ्यास केला. हे पुस्तक जगभरातील तरुण वाचक आणि स्वप्न पाहणाऱ्यांना प्रेरणा देणारे आहे, ज्यात मस्क यांच्या आयुष्यातील काही अज्ञात गोष्टी व प्रेरणादायक प्रसंग उलगडले आहेत. हे पुस्तक मस्क यांना केवळ एक श्रीमंत नवप्रवर्तक म्हणून नव्हे तर धाडसी स्वप्नांची पूर्ती करण्यासाठी झटणारे व्यक्तिमत्त्व म्हणून चितारते.
हे ही वाचा:
‘तो’ परतलाय साहेबांच्या संघात!
मनू भाकर घडवणारा महान मार्गदर्शक!
माझ्या वाटचालीचा स्रोत मस्क
संवेदनशील आणि प्राचीन विषयांवर लिहिल्यानंतर, विवान आता आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्याने मस्क यांच्यावर हे पुस्तक लिहिण्यामागील कारण विषद केले आहे. तो म्हणतो की, ‘मी विज्ञान, सनातन धर्म, तंत्रज्ञान यांची सांगड घालणारी पुस्तके लिहिल्यानंतर मस्क यांच्या कर्तृत्वावर आधारित हे माझे तिसरे पुस्तक आहे. मी ११ व्या वर्षापासून मी मस्क यांचा चाहता आहे. जग हे नित्यनियमाच्या गोष्टीत व्यस्त असताना मस्क हे मानवतेचा विचार करतात. ते एक द्रष्टे नेतृत्व आहे. अनेक उद्दिष्टे त्यांनी सुफळसंपूर्ण करून दाखवली आहेत. त्यांच्यामुळेच मी विज्ञानाकडे ओढला गेलो. त्यातूनच मी माझे पहिले इन-प्रिन्सिपल पेटंट मिळवले. मग पुढे मला आध्यात्माची ओढ लागली. म्हणूनच मी म्हणेन की माझ्या आतापर्यंतच्या वाटचालीचा खरा स्रोत हे इलन मस्क आहेत. विवान म्हणतो की, मी या पुस्तकात मानवतेसाठी मस्क यांनी केलेले ४२ गोष्टींचा खास उल्लेख केला आहे. हे पुस्तक मस्क यांच्याविषयीची सर्व माहिती देणारे आहे. एकप्रकारे त्यांचे चरित्र आहे. म्हणूनच मस्क यांच्या वाढदिवशी म्हणजे २८ जूनला मी हे पुस्तक प्रकाशित करत आहे.’
विवानने वयाच्या १५व्या वर्षी “निअर अर्थ ऑब्जेक्ट (NEO)” शोध प्रणालीवर आधारित प्रकल्पासाठी इन-प्रिन्सिपल पेटंट मिळवले . अशा प्रकारचे यश मिळवणारा तो देशातील सर्वात तरुण संशोधकांपैकी एक ठरला.
१६ व्या वर्षी त्याने “सनातन धर्म: सर्व विज्ञानाचा खरा स्रोत” हे पहिले पुस्तक लिहिले. २२ जानेवारी २०२४ रोजी राम मंदिर, अयोध्या येथे चंपत राय (ट्रस्टचे महासचिव) यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन झाले. या पुस्तकाला विशेष सन्मान देण्यात आला आणि ते राम लल्लांच्या चरणांजवळ गर्भगृहात ठेवले गेले.
१७ व्या वर्षी त्याने दुसरे पुस्तक “सनातन धर्म: सर्व तंत्रज्ञानाचा खरा स्रोत” लिहिले. हे पुस्तक १५ नोव्हेंबर २०२४ रोजी RSS प्रमुख श्री. मोहन भागवत आणि ISRO चे अध्यक्ष एस. सोमनाथ यांच्या हस्ते प्रकाशित झाले.
विवानने ‘विज्ञान’ म्हणजे सनातन परंपरेच्या केवळ एका कणाचा स्पर्श असल्याचे स्पष्ट केले आहे. तो आजच्या पिढीला स्वप्ने पाहण्याची, प्रश्न विचारण्याची आणि नवसृजन करण्याची प्रेरणा देतो. विवानचे हे मस्क यांच्यावरचे पुस्तक त्याच्या साहित्यिक प्रवासाचा पुढचा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
