पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी सोमवारी (२६ मे) दोन्ही देशांमधील काश्मीर, दहशतवाद, पाणीवाटप आणि व्यापार यासह सर्व प्रलंबित मुद्द्यांवर तोडगा काढण्यासाठी भारतासोबत शांतता चर्चेत सहभागी होण्याची तयारी दर्शवली. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर आणि भारताच्या प्रत्युत्तरात्मक ऑपरेशन सिंदूरनंतर सीमेपलीकडून होणारा गोळीबार थांबविण्यास भारत आणि पाकिस्तान सहमत झाल्यानंतर काही आठवड्यांनंतर शरीफ यांचे हे विधान आले आहे. त्यांनी त्यांच्या चार देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात तेहरानमध्ये हे विधान केले आहे.
तेहरानमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि इराणचे अध्यक्ष डॉ. मसूद पेझेश्कियान यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत शाहबाज शरीफ म्हणाले, भारताशी पाणी, व्यापार आणि दहशतवादाविरुद्धच्या लढाईवर चर्चा करण्यास तयार आहोत.
दरम्यान, या महिन्याच्या सुरुवातीला भारताने केलेल्या अचूक लष्करी हल्ल्यांनंतर इस्लामाबादकडून नवी दिल्लीशी चर्चा करण्यास पुन्हा एकदा तयारी दर्शविल्याचे वृत्त समोर आले आहे. तथापि, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले आहे की पाकिस्तानशी कोणतीही चर्चा ही पाकव्याप्त काश्मीर परत मिळवणे आणि दहशतवादाच्या मुद्द्यापुरती मर्यादित असेल.
हे ही वाचा :
१२ वर्षांपासून दिल्लीत राहणाऱ्या चार घुसखोर बांगलादेशींना अटक!
बांगलादेशचा पूर्व पाकिस्तान होणार नाही ना ?
अमित शाह म्हणाले: “बाळासाहेब ठाकरे असते तर ऑपरेशन सिंदूरचे कौतुक केले असते”
“दहशतवाद आणि चर्चा एकाच वेळी होऊ शकत नाहीत. दहशतवाद आणि व्यापार होऊ शकत नाही. रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही. मी आंतरराष्ट्रीय समुदायाला सांगू इच्छितो की जर भारत आणि पाकिस्तानमध्ये चर्चा होणार होईल तर ती फक्त दहशतवाद आणि पीओकेवरच असेल,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले. तसेच यामध्ये कोणत्याही तिसऱ्या पक्षाचा सहभाग नसेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
