मिचेल सॅंटनरने न्यूझीलंडच्या वनडे संघाचे कर्णधारपद स्वीकारले. त्यांचे पहिलेच मोठे आव्हान होते ते २०२५ चॅम्पियन्स ट्रॉफीचे. आता, सॅंटनर रविवारी दुबईमध्ये भारताविरुद्ध होणाऱ्या अंतिम सामन्यात ब्लॅककॅप्सचे नेतृत्व करण्यास सज्ज आहे. न्यूझीलंडने नेहमीच आयसीसी स्पर्धांमध्ये प्रभावी कामगिरी करत प्रतिस्पर्धी संघाला आव्हान दिले आहे. २०२५ चॅम्पियन्स ट्रॉफीतही त्यांनी अशीच कामगिरी करत अंतिम फेरी गाठलेली आहे. अंतिम सामन्यापूर्वी न्यूझीलंड संघाची काय आहे ताकद, कमजोरी याविषयीचे हे विश्लेषण :
ताकद :
न्यूझीलंड संघाची ताकद त्यांच्या फलंदाजी आणि गोलंदाजीत मानली जाते. फलंदाजीत, रचिन रवींद्र उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. ज्याचे प्रत्यय त्याच्या दोन शानदार शतकांतून मिळतात. केन विल्यमसनने मागील दोन सामन्यांमध्ये उत्तम कामगिरी केली आहे, तर विल यंग, डेरिल मिशेल, टॉम लॅथम आणि ग्लेन फिलिप्स यांनी न्यूझीलंडच्या फलंदाजीला अधिक बळ दिले आहे.
गोलंदाजीत, सॅंटनर, फिलिप्स, रवींद्र आणि मायकेल ब्रेसवेल यांच्या उपस्थितीमुळे न्यूझीलंडकडे भक्कम फिरकी विभाग आहे. तसेच, त्यांचे क्षेत्ररक्षण देखील अव्वल दर्जाचे आहे. या स्पर्धेतील सर्वाधिक कॅच पूर्ण करणाऱ्या संघांमध्ये त्यांचा समावेश असल्याने स्पष्ट होते. त्यांचे क्षेत्ररक्षक एखाद्या स्पायडरमॅनसारखे हवेत झेप घेत कॅचेस टीपत आहेत.
कमजोरी :
न्यूझीलंडने दुबईमध्ये भारताविरुद्ध झालेल्या ग्रुप ए सामना खेळला होता. मात्र प्रथम गोलंदाजी केल्यानंतरही त्यांना ४४ धावांनी पराभव पत्करावा लागला होता. त्या सामन्यात मॅट हेन्रीच्या भेदक ५-४२ गोलंदाजीमुळे त्यांनी भारताला २४९ धावांवर रोखले होते, मात्र ते लक्ष्य ते गाठू शकले नाहीत.
जर हेन्री खांद्याच्या दुखापतीमुळे अंतिम सामन्यासाठी उपलब्ध नसेल, तर त्यांची वेगवान गोलंदाजी कमकुवत होईल. शिवाय, विल्यमसनच्या ८१ धावांच्या खेळीशिवाय, कोणताही फलंदाज दीर्घकाळ खेळपट्टीवर टिकू शकला नव्हता. वरुण चक्रवर्तीच्या प्रभावी फिरकी गोलंदाजीमुळे न्यूझीलंडच्या फलंदाज अडचणीत आले होते. वरुणने ५ विकेट्स घेत अवघ्या ४२ धावा खर्ची केल्या. जर अंतिम सामन्यातही चक्रवर्तीने अशाच प्रकारे गोलंदाजी केली, तर न्यूझीलंडच्या फलंदाजीवर मोठा परिणाम होईल.
संधी :
विल्यमसनने सांगितले की न्यूझीलंड यावेळी दुबईच्या खेळपट्टीसाठी अधिक तयार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या उपांत्य सामन्यात 50 धावांनी मिळवलेला मोठा विजय त्यांच्यासाठी आत्मविश्वास वाढवणारा ठरला आहे. जर ते अंतिम सामना जिंकले, तर 2000 मध्ये भारताविरुद्धच्या उद्घाटन चॅम्पियन्स ट्रॉफी विजयाची पुनरावृत्ती करतील.
हेही वाचा :
महाराष्ट्रात गेल्या १० वर्षांतील गुंतवणूक अवघ्या नऊ महिन्यात
परराष्ट्र मंत्र्यांच्या वक्तव्यानंतर ओमर अब्दुल्ला म्हणतात, पीओके घेण्यापासून कोण रोखत आहे?
आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कारासाठी शुभमन गिलला नामांकन
काशी, अयोध्येनंतर आता मथुरेच्या विकासाची वेळ आली आहे!
धोका :
भारत या स्पर्धेत अजेय राहिला आहे. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागांत त्यांनी वर्चस्व गाजवले आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने अद्याप दुबईमध्ये एकही सामना गमावलेला नाही. तसेच, रविवारी दुबईमध्ये भारतीय संघासाठी असलेल्या मोठ्या चाहत्यांची उपस्थिती न्यूझीलंडसाठी आणखी एक मोठा धोका ठरू शकतो. जर भारतीय संघाने आपला प्रभावी फॉर्म कायम ठेवला, तर सॅंटनर आणि त्याच्या सहकाऱ्यांसाठी त्यांना चॅम्पियनशिप जिंकण्यापासून रोखणे खूप कठीण होईल.