भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी लंडनमधील एका कार्यक्रमात पाकिस्तानी पत्रकाराला काश्मीरच्या प्रश्नावर उत्तर देताना म्हटले की, पाकिस्तानने जर पाकव्याप्त काश्मीरवरील (पीओके) ताबा सोडला तर काश्मीरचा प्रश्न सुटेल. यावर जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी गुरुवारी एस जयशंकर यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. पाकव्याप्त काश्मीर परत मिळवण्यासाठी सरकारला कोणी रोखले आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
सरकार पीओके ताबडतोब का परत मिळवत नाही आणि चीनने व्यापलेल्या प्रदेशांबद्दल चर्चा का होत नाही? असा प्रश्नही ओमार अब्दुल्ला यांनी उपस्थित केला आहे. अब्दुल्ला म्हणाले की, “आपले परराष्ट्रमंत्री म्हणाले आहेत की, पाकव्याप्त काश्मीर भारतात आणणार आहोत. आम्ही त्यांना कुठे अडवलंय? तुम्हाला पाकव्याप्त काश्मीर भारतात परत आणायचा आहे, मग आणा. जर तुम्हाला शक्य असेल तर त्यावर पुन्हा दावा करा. केंद्र सरकार पीओके परत मिळवू शकत असेल तर त्यांनी ते करावे. तुम्ही जम्मू- काश्मीरचा नकाशा पाहिलात तर त्यात आपला एक मोठा भूभाग पाकिस्तानात असल्याचं दिसतं. मात्र, काश्मीरचा आणखी एक मोठा भाग चीनच्या ताब्यात आहे. त्यावर कोणीच काही बोलत नाही. तुम्ही पीओके भारतात आणणार आहात तर चीनच्या ताब्यात आपला भूभाग आहे तो देखील भारतात परत आणा.”
लंडनमधील कार्यक्रमात पाकिस्तानी पत्रकाराने विचारलं की, पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतचे संबंध वापरून काश्मीर समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू शकतात का? यावर एस जयशंकर यांनी एका वाक्यात उत्तर दिले आणि पाकिस्तानी पत्रकाराची बोलती बंद केली. ते म्हणाले की, भारताकडून काश्मीरमधील सर्व गोष्टी ठीक करण्याचा प्रयत्न सुरू आहे. काश्मीरचा विशेष राज्य दर्जा संपवून कलम ३७० हटवणं हे पहिले पाऊल होते. काश्मीरला आर्थिक सक्षम करत सामाजिक न्याय बहाल करणे हे दुसरे पाऊल होते. जास्त मतदानासह निवडणूक घेणे तिसरे पाऊल होते. आता काश्मीरचा तो भाग ज्यावर पाकिस्तानचा बेकायदेशीर ताबा आहे ते परत घेणे बाकी आहे. जेव्हा ते होईल तेव्हा समस्या सुटेल असं त्यांनी सुनावले.
हे ही वाचा:
महाराष्ट्रात गेल्या १० वर्षांतील गुंतवणूक अवघ्या नऊ महिन्यात
कोविड काळात केलेल्या मदतीबद्दल पंतप्रधान मोदींना बार्बाडोसचा पुरस्कार
छत्रपती संभाजी महाराजांप्रमाणे छळ झाला; अनिल परबांच्या वक्तव्याचा सत्ताधाऱ्यांकडून निषेध
गोव्यात मारामारीवरून अबू आझमी यांच्या मुलावर गुन्हा
भारताच्या चीनसोबतच्या संबंधांच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्री जयशंकर म्हणाले की, दोघांचाही इतिहास खूप जुना आहे. ज्यामध्ये कालांतराने चढ- उतार आले आहेत. आज दोन्ही देश संबंध सुधारण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत. आम्हाला एक स्थिर संबंध हवा आहे, जिथे आमच्या हितांचा आदर केला जाईल.