समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबचा उदो उदो केल्यानंतर आता ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांच्या अडचणी वाढल्या आहेत. अधिवेशनाच्या कामकाजावेळी वादग्रस्त विधान केल्यानंतर आता सत्ताधारी आमदारांनी हा मुद्दा उचलून धरत त्यांच्या विरोधात आंदोलन सुरू केले आहे. अनिल परब यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी केली जात आहे. विधानभवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आमदारांनी घोषणाबाजी करत आंदोलन केले.
आमदार अनिल परब यांनी विधान परिषदेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेवर बोलत असताना स्वत:ची तुलना धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांशी केली. यामुळे आता राज्यभरातून संताप व्यक्त केला जात असून अनिल परबांच्या विधानाचा निषेध केला जात आहे. अनिल परब म्हणाले की, ‘छावा’प्रमाणे मीही अत्याचार भोगले, पण ‘पक्ष’ बदलला नाही, असे विधान केले.
अनिल परब म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमधील सहकाऱ्यांना घेऊन छावा चित्रपट पाहिला. पण राज्यपालांच्या अभिभाषणात छत्रपती संभाजी महाराज यांचा उल्लेख आढळला नाही. तुम्ही छावा बघता, तर मला पण बघा. धर्म बदलण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांचा छळ झाला. माझ्यावर पक्ष बदलण्यासाठी छळ झाला. मी सगळे भोगले, पण पक्ष बदलला नाही. बाकी सर्वांना जरा हूल दिली की, लगेच गेले पक्ष सोडून, असे वादग्रस्त विधान अनिल परब यांनी केले.
हे ही वाचा:
गोव्यात मारामारीवरून अबू आझमी यांच्या मुलावर गुन्हा
दहशतवादी तहव्वूर राणाला दणका! प्रत्यार्पणाला स्थगिती देण्याची याचिका फेटाळली
राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त शिव व्याख्याते घडवणाऱ्या कार्यशाळेचे आयोजन
औरंगजेबाची कबर खोदून अरबी समुद्रात फेकून द्या!
अनिल परब यांनी राज्यपालांच्या भाषणाचा आणि छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान केला आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या नखाची सर अनिल परब यांना नसून त्यांच्या पायाच्या धुळीची तुलना देखील अनिल परबांशी होऊ शकत नाही, असं म्हणत भाजपा आमदार प्रवीण दरेकर यांनी अनिल परब यांच्यावर निशाणा साधला आहे. अनिल परबांनी त्यांच्या वक्तव्याबद्दल जाहीर माफी मागावी अन्यथा त्यांचे निलंबन करावे, अशी मागणी दरेकर यांनी केली आहे.