देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बार्बाडोस देशाच्या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. नरेंद्र मोदी यांना कोविड- १९ महामारी काळातील त्यांच्या रणनीतिक नेतृत्व आणि मौल्यवान मदत याबद्दल ‘ऑनररी ऑर्डर ऑफ फ्रीडम ऑफ बार्बाडोस’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) गुरुवारी एका निवेदनात म्हटले आहे की, बार्बाडोसमधील ब्रिजटाऊन येथे झालेल्या समारंभात पंतप्रधान मोदींच्या वतीने परराष्ट्र आणि वस्त्रोद्योग राज्यमंत्री पबित्रा मार्गेरिटा यांनी हा पुरस्कार स्वीकारला. हा पुरस्कार म्हणजे दोन्ही देशांमधील ‘शाश्वत मैत्रीचे’ प्रतीक आहे, असेही परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
बार्बाडोसच्या पंतप्रधान मिया अमोर मोटली यांनी २० नोव्हेंबर २०२४ रोजी गयानाच्या जॉर्जटाऊन येथे झालेल्या दुसऱ्या भारत-कॅरिकॉम नेत्यांच्या शिखर परिषदेच्या वेळी पंतप्रधान मोदींशी झालेल्या भेटीदरम्यान या पुरस्काराची घोषणा केली होती. कोविड- १९ महामारी दरम्यान त्यांच्या धोरणात्मक नेतृत्वाची आणि मौल्यवान मदतीची दखल घेऊन पंतप्रधान मोदींना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे, असे निवेदनात म्हटले आहे. तसेच महामारीमुळे निर्माण झालेल्या अभूतपूर्व परिस्थितीत आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि पाठिंब्याला बळकटी देण्यात नरेंद्र मोदींनी बजावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेची पंतप्रधान मोटली यांनी कबुली दिली आहे.
पंतप्रधानांच्या वतीने पुरस्कार स्वीकारताना, मार्गेरिटा यांनी या मान्यतेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिनिधित्व करणे आणि त्यांच्या वतीने हा प्रतिष्ठित पुरस्कार स्वीकारणे हा एक मोठा सन्मान आहे. ही मान्यता भारत आणि बार्बाडोसमधील वाढत्या संबंधांना तसेच सहकार्य आणि विकासासाठी, विशेषतः संकटाच्या काळात, आमची सामायिक वचनबद्धता अधोरेखित करते, असे मार्गेरिटा यांनी म्हटले आहे.
हे ही वाचा:
छत्रपती संभाजी महाराजांप्रमाणे छळ झाला; अनिल परबांच्या वक्तव्याचा सत्ताधाऱ्यांकडून निषेध
गोव्यात मारामारीवरून अबू आझमी यांच्या मुलावर गुन्हा
दहशतवादी तहव्वूर राणाला दणका! प्रत्यार्पणाला स्थगिती देण्याची याचिका फेटाळली
राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त शिव व्याख्याते घडवणाऱ्या कार्यशाळेचे आयोजन
नरेंद्र मोदी हे गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात नायजेरिया, ब्राझील आणि गयाना या देशांच्या दौऱ्यावर गेले होते. नरेंद्र मोदी ब्राझीलमध्ये होणाऱ्या जी-२० शिखर परिषदेत सहभागी झाले त्यानंतर ते गयानामध्ये गेले. दरम्यान, नरेंद्र मोदी यांना गयाना आणि बार्बाडोस या दोन देशांनी त्यांच्या देशाच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्याची घोषणा केली होती. गयाना देशाने त्यांना ‘द ऑर्डर ऑफ एक्सलन्स’ हा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केला. तर, बार्बाडोसने त्यांच्या प्रतिष्ठेच्या अशा ‘ऑनररी ऑर्डर ऑफ फ्रीडम ऑफ बार्बाडोस’ हा पुरस्कार देऊन नरेंद्र मोदींचा सन्मान करणार असल्याची घोषणा केली होती. पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या कामाचा डंका गेल्या अनेक वर्षांपासून जगभरात गुंजत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्याची दखल घेऊन वेळोवेळी अनेक मोठ्या देशांनी त्यांचा सर्वोच्च सन्मान केला आहे.