राज्यातील प्रकल्प आणि गुंतवणूक दुसऱ्या राज्यात जात असल्याच्या विरोधकांच्या आरोपाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट आकडेवारीमधून उत्तर दिले आहे. केंद्र सरकारच्या डीपीआयआयटीने परकीय गुंतवणुकीचा डिसेंबर २०२४ अखेरचा अहवाल जाहीर केला आहे. या आकडेवारीनुसार, गेल्या १० वर्षातील सर्वाधिक वार्षिक परकीय गुंतवणूक ही अवघ्या नऊ महिन्यात महाराष्ट्राने प्राप्त केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवर पोस्ट करत याबद्दल माहिती देत राज्यातील जनतेचे अभिनंदन केले आहे.
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय आनंदाची बातमी दिली आहे. गेल्या १० वर्षांतील गुंतवणूक अवघ्या नऊ महिन्यात मिळाल्याचे ट्विट फडणवीस यांनी केले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात झालेल्या परकीय गुंतवणुकीची आकडेवारी सादर केली आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षातील पहिल्या नऊ महिन्यात आतापर्यंत एकूण १,३९,४३४ कोटी रुपये इतकी परकीय गुंतवणूक आली आहे. ही गेल्या १० वर्षांत महाराष्ट्रात कोणत्याही एका वर्षात आलेल्या परकीय गुंतवणुकीपेक्षा सर्वाधिक आहे, असे म्हटले आहे. शिवाय महायुती सरकारने आपलाच २०१६- १७ या आर्थिक वर्षाचा विक्रम मोडला आहे. आणखी या आर्थिक वर्षातील एक तिमाही बाकी आहे.
ही आकडेवारी जाहीर करताना देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण महाराष्ट्राचे अभिनंदन केले आहे. तसेच त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि मंत्रिमंडळाच्या नेतृत्त्वात महाराष्ट्राची ही घौडदौड अशीच कायम राहील, असा विश्वास व्यक्त केला आहे.
गेल्या 10 वर्षांतील विक्रमी परकीय गुंतवणूक
महाराष्ट्रात आली केवळ 9 महिन्यात !केंद्र सरकारच्या डीपीआयआयटीने परकीय गुंतवणुकीचा डिसेंबर 2024 अखेरचा अहवाल जाहीर केला असून, गेल्या 10 वर्षांतील सर्वाधिक वार्षिक परकीय गुंतवणूक ही अवघ्या 9 महिन्यात महाराष्ट्राने प्राप्त केली आहे.… pic.twitter.com/wPkpWvY4yU
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 7, 2025
हे ही वाचा:
कोविड काळात केलेल्या मदतीबद्दल पंतप्रधान मोदींना बार्बाडोसचा पुरस्कार
छत्रपती संभाजी महाराजांप्रमाणे छळ झाला; अनिल परबांच्या वक्तव्याचा सत्ताधाऱ्यांकडून निषेध
गोव्यात मारामारीवरून अबू आझमी यांच्या मुलावर गुन्हा
दहशतवादी तहव्वूर राणाला दणका! प्रत्यार्पणाला स्थगिती देण्याची याचिका फेटाळली
दरम्यान, परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र कायम अव्वल असल्याचे यापूर्वीही अनेकदा आकडेवारीमधून समोर आले आहे. काही दिवसांपूर्वीच एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र २०३० पर्यंत ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था करण्याचा मानस बोलून दाखवला होता. तर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोस दौऱ्यामधून महाराष्ट्रासाठी १६ लाख कोटींची गुंतवणूक आणून नवा विक्रम रचला होता.