भारताचा स्टार फुटबॉल खेळाडू सुनील छेत्रीने अचानक निवृत्ती मागे घेतली आहे. भारतीय फुटबॉल महासंघाने सुनील छेत्रीच्या पुनरागमनाची पुष्टी केली आहे. गेल्या वर्षी ६ जून रोजी कुवेतविरुद्धच्या सामन्यानंतर सुनील छेत्रीने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला पूर्णविराम दिला होता. सुनील छेत्री हा भारताकडून सर्वाधिक गोल करणारा खेळाडू आहे. निवृत्तीनंतर परतल्यानंतर, तो आता मार्चमध्ये पुन्हा मैदानावर खेळताना दिसणार आहे.
सध्या ‘एएफसी आशियाई कप २०२७’ च्या पात्रता फेरीचे सामने खेळवले जात आहेत. भारतीय संघ २५ मार्च रोजी बांगलादेशविरुद्ध खेळेल. त्यात सुनील छेत्रीही दिसणार असल्याचे मानले जात आहे. सुनील छेत्रीने आतापर्यंत ९४ गोल केले आहेत. तो क्रिस्टियानो रोनाल्डो, लिओनेल मेस्सी आणि अली दाई यांच्यानंतर पुरुष फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल करणारा चौथा खेळाडू आहे.
अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने ट्वीटकरत सुनील छेत्री परत येणार असल्याचे सांगितले. एआयएफएफने सोशल मिडीयावर सुनील छेत्रीचा फोटो शेअर केला आणि लिहिले, ‘सुनील छेत्री परत आला आहे’ कर्णधार, नेता आणि दिग्गज खेळाडू फिफा इंटरनॅशनल विंडोसाठी भारतीय राष्ट्रीय संघात परतेल, असे भारतीय फुटबॉल महासंघाने म्हटले आहे.
हे ही वाचा :
कोविड काळात केलेल्या मदतीबद्दल पंतप्रधान मोदींना बार्बाडोसचा पुरस्कार
छत्रपती संभाजी महाराजांप्रमाणे छळ झाला; अनिल परबांच्या वक्तव्याचा सत्ताधाऱ्यांकडून निषेध
गोव्यात मारामारीवरून अबू आझमी यांच्या मुलावर गुन्हा
राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त शिव व्याख्याते घडवणाऱ्या कार्यशाळेचे आयोजन
दरम्यान, सुनील छेत्री याने देशासाठी १५० सामन्यात ९४ गोल केले आहेत. सध्या आंतरराष्ट्रीय गोल करणाऱ्यांच्या यादीत तो चौथ्या क्रमांकावर आहे. सुनील छेत्रीने १२ जून २००५ रोजी पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यातून पदार्पण केले. या सामन्यातच त्याने पहिला आंतरराष्ट्रीय गोलही केला. छेत्रीने त्याच्या फुटबॉल कारकिर्दीत सहा वेळा एआयएफएफ प्लेयर ऑफ द इयर पुरस्कार जिंकला आहे. याशिवाय २०११ मध्ये अर्जुन पुरस्कार आणि २०१९ मध्ये पद्मश्री पुरस्काराने त्याला सन्मानित करण्यात आले आहे.