अभ्यासाच्या ताणापायी मुलांनी आत्महत्या करण्याच्या घटना आजकाल वारंवार घडत आहेत. कर्नाटकातही अशीच एक घटना घडली आणि त्यात १९ वर्षीय मुलीला आपला जीव गमवावा लागला. कर्नाटकातील कोडागू जिल्ह्यातील अभियांत्रिकी कॉलेजच्या पहिल्या वर्षातील विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
तेजस्विनी असे विद्यार्थिनीचे नाव असून ती १९ वर्षांची होती. ती पोनमपेट येथील हळ्ळीगट्टू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग कोर्स करत होती.
तिच्या होस्टेल रूममध्ये तिचा मृतदेह आढळून आला. रूममध्ये एक चिठ्ठी मिळाली असून त्यात तिने अभ्यासाचा ताण असल्याने आत्महत्या करत असल्याचे नमूद केले आहे. तिने सहा विषयांमध्ये नापास झाल्याचे लिहिले असून तिला पुढे अभ्यास करायचा नाही, असेही तिने नमूद केले होते.
हे ही वाचा:
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पाटणा विमानतळाच्या नव्या टर्मिनल इमारतीचं उद्घाटन
अमेरिकेतील ‘सांबा’ शिळेवरून उतरला..
२६/११ नंतर ‘लष्कर’ मुख्यालयावर हल्ला न करून काँग्रेसने केला विश्वासघात
पाकिस्तानी एजंटला माहिती पुरविल्याच्या आरोपाखाली ठाण्यातून तिघांना अटक!
तेजस्विनी ही रायचूर येथील रहिवासी महंत्तप्पा यांची एकुलती एक मुलगी होती. तीन दिवसांपूर्वीच तिने आपल्या १९ व्या वाढदिवसानिमित्त मित्रमैत्रिणींना मिठाई वाटली होती. बुधवारी तिने पुन्हा एकदा ज्यांना मिठाई मिळाली नव्हती त्यांना ती वाटली. संध्याकाळी ४ वाजता ती वर्गातून परत आपल्या रूममध्ये गेली. ४.३० च्या सुमारास, तिच्या वर्गमित्राने लक्षात आणून दिले की रूम आतून बंद आहे आणि ती फोन कॉल्सना प्रतिसाद देत नव्हती. नंतर ही माहिती होस्टेल सुपरवायझरला देण्यात आली.
दरवाजा तोडून उघडल्यावर ती बेशुद्ध अवस्थेत आढळली. तिच्या जवळून आत्महत्येची चिठ्ठी मिळाली. पोनमपेट पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन प्राथमिक तपासणी केली असून पुढील तपास सुरु आहे.
