हरियाणातील रोहतकमध्ये एका काँग्रेस कार्यकर्त्याचा मृतदेह सुटकेसमध्ये आढळल्यानंतर खळबळ उडाली आहे. हिमानी नरवाल असे मृत्यू झालेल्या महिला कार्यकर्त्याचे नाव आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमॉर्टमसाठी रोहतक पीजीआय येथे पाठवला. महिलेची गळा दाबून हत्या करण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे. काँग्रेस नेते राहुल गांधींच्या ‘भारत जोडो यात्रे’मध्ये मृत महिला सहभागी झाली होती, सोशल मिडीयावर राहुल गांधींसोबत यात्रेमधील फोटोही समोर आले आहेत.
आज तकच्या वृत्तानुसार, रोहतक जिल्ह्यातील सांपला शहरातील बस स्टँडजवळ एक संशयास्पद निळी सुटकेस सापडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. जेव्हा पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून सुटकेस उघडली तेव्हा त्यांना त्यात २० ते २२ वर्षांच्या मुलीचा मृतदेह आढळला. जिच्या गळ्यात स्कार्फ गुंडाळलेला होता आणि तिच्या हातावर मेहंदी होती. यानंतर पोलिसांनी प्रयोगशाळेच्या (FSL) टीमला चौकशीसाठी बोलावले. सांपला पोलिस स्टेशनचे प्रभारी विजेंद्र सिंह म्हणतात की, सुरुवातीच्या तपासात हे प्रकरण हत्येचे असल्याचे दिसून येत आहे.
रोहतकचे आमदार बीबी बत्रा यांनी हिमानी नरवाल यांच्या हत्येचा संशय व्यक्त केला आणि या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्याची मागणी केली. ते म्हणाले की, हिमानी नरवाल ही काँग्रेसची सक्रिय कार्यकर्ता होती, जी पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रमात सहभागी होत असे. त्याच वेळी, हरियाणाचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते भूपेंद्र सिंह हुड्डा यांनी या हत्या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली.
हे ही वाचा :
संसद भवन ते सेंट्रल विस्टा…७५ वर्षांचा प्रवास
मुंबई ड्रग्ज माफीयांचे नवे टार्गेट…
उत्तराखंडमध्ये झालेल्या हिमस्खलनामध्ये चार कामगारांचा मृत्यू
तसेच राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. हिमानीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा, काँग्रेस खासदार दीपेंद्र सिंह हुड्डा आणि रोहतकचे आमदार बीबी बत्रा यांच्यासोबतचे अनेक फोटो शेअर केले होते. सांपला पोलिस स्टेशनचे प्रभारी विजेंद्र सिंह पुढे म्हणाले, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु करण्यात आला आहे. शवविच्छेदनानंतर पुढील कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.