राजस्थानमधील अजमेर येथील सुफी संत ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांच्या दर्ग्यामध्ये शिवमंदिर असल्याचा दावा करणाऱ्या विष्णू गुप्ता यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याचे वृत्त समोर आले आहे. ते अजमेरहून दिल्लीला प्रवास करत असताना काही अज्ञातांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात विष्णू गुप्ता हे थोडक्यात बचावले असून त्यांनी तातडीने या घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना दिली आहे. यानंतर स्थानिक पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.
अजमेर दर्गा वाद प्रकरणीचे तक्रारदार, हिंदू सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विष्णू गुप्ता यांच्यावर दोन दुचाकीस्वार हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या. विष्णू गुप्ता हे त्यांच्या गाडीमधून अजमेरहून दिल्लीला निघाले होते तेव्हा ही घटना घडली. गगवाना लाडपुरा कल्व्हर्ट येथे हा हल्ला झाला. या घटनेची माहिती खुद्द विष्णू गुप्ता यांनी दिली आहे. त्यांनी एक फोटोही शेअर केला असून त्यामध्ये त्यांच्या गाडीवरील बंदुकीच्या गोळ्यांच्या खुणा स्पष्ट दिसत आहेत.
विष्णू गुप्ता यांनी यापूर्वीच न्यायालयाला लेखी अर्ज देऊन आपल्या जीवाला धोका असल्याचे म्हटले होते. यापूर्वीही त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या होत्या. त्यानंतर शनिवारी दिल्लीला जात असताना दोन अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीवर गोळीबार केला. यानंतर दुचाकीस्वार पळून गेले. या घटनेनंतर त्यांनी अजमेर पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलिस अधीक्षक दीपक कुमार आणि सीओ रामचंद्र चौधरी घटनास्थळी रवाना झाले.
हे ही वाचा :
मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश, भोंगे उतरविण्याची जबाबदारी पोलिसांचीच!
येत्या पाच वर्षांत घरगुती विजेचे दर २३ टक्क्यांनी कमी होणार!
गुजरातमध्ये गोराक्षकावर हल्ला करणाऱ्या पाच जणांच्या मुसक्या आवळल्या
संजय राऊत विदुषक, उद्धव ठाकरेंना रसातळाला नेण्याचे काम केलं!
विष्णू गुप्ता हे हिंदू सेनेचे अध्यक्ष आहेत. ज्या ठिकाणी दर्गा बांधण्यात आला त्या ठिकाणी शिवमंदिर असून मंदिर शोधण्यासाठी सर्वेक्षण करण्यात यावे, असा दावा करणारी याचिका त्यांनी स्वतः न्यायालयात दाखल केली आहे. मनमोहन चंदेल यांच्या न्यायालयात शुक्रवारी सकाळी या प्रकरणावर सुनावणी झाली. न्यायालयात आपली बाजू मांडताना गुप्ता यांनी १९६१ च्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा संदर्भ दिला, ज्यामध्ये दर्गा हे प्रार्थनास्थळ नसल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे. याशिवाय स्वतःला ख्वाजा साहेबांचे वंशज म्हणवणाऱ्यांबाबत कोणताही पुरावा उपलब्ध नाही. सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय आहे. आता न्यायालयात १ मार्च रोजी या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. न्यायालयाने गुप्ता यांचा दावा गेल्या वर्षी २७ नोव्हेंबर रोजी सुनावणीसाठी स्वीकारला होता आणि अजमेर दर्गा समिती, अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय) दिल्ली यांना नोटीस बजावून त्यांचे उत्तर मागितले होते.