बांगलादेशमध्ये नवं सरकार स्थापन झाल्यापासून या सरकारचे आणि पाकिस्तानचे संबंध अधिक दृढ होण्याचे चित्र स्पष्ट होत असताना दुसरीकडे भारतासाठी मात्र ही डोकेदुखी ठरत आहे. दोन्ही देशांचे लष्कर वरिष्ठ भेटी घेत असल्यामुळे भारतासाठी ही बाब चिंता वाढवणारी ठरत आहे. काही दिवसांपूर्वी बांगलादेश लष्कराचे वरिष्ठ अधिकारी पाकिस्तानच्या रावळपिंडीला गेले होते. यानंतर पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयचे अनेक वरिष्ठ अधिकारी नुकतेच ढाका येथे आले होते. या भेटीदरम्यान पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या अधिकाऱ्यांनी बांगलादेशी लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि भविष्यातील योजनांबाबत चर्चा केली. यावर भारताचे बारीक लक्ष असल्याचे आता भारताने स्पष्ट केले आहे.
भारताने शुक्रवारी सांगितले की, ते अलीकडील घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत आणि जेव्हा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न येतो तेव्हा भारत योग्य पावले उचलेल. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी साप्ताहिक मीडिया ब्रीफिंगमध्ये सांगितले की, “आम्ही देशभरातील आणि प्रदेशातील सर्व क्रियाकलापांवर तसेच राष्ट्रीय सुरक्षेवर परिणाम करणाऱ्या सर्व क्रियाकलापांवर लक्ष ठेवतो आणि सरकार योग्य ती पावले उचलेल.” मेजर जनरल शाहिद अमीर अफसर यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानच्या इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्सच्या (ISI) उच्च- प्रोफाइल शिष्टमंडळाने शुक्रवारी बांगलादेशचा तीन दिवसांचा दौरा केला त्यानंतर भारताकडून ही टिप्पणी आली आहे.
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी सत्ता सोडल्यानंतर बांगलादेश आणि पाकिस्तानच्या लष्करांमधील ही वाढती जवळीक दिसून येत आहे. पाकिस्तान आणि बांगलादेशच्या लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची मंगळवारी इस्लामाबादमध्ये बैठक झाली. त्या भेटीत दोन्ही सैन्याने मजबूत संरक्षण संबंधांवर चर्चा केली आणि भविष्यात ही भागीदारी आणखी मजबूत करण्यावरही विचार केल्याचे बोलले जात आहे.
हे ही वाचा:
गुजरातमध्ये गोराक्षकावर हल्ला करणाऱ्या पाच जणांच्या मुसक्या आवळल्या
मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश, भोंगे उतरविण्याची जबाबदारी पोलिसांचीच!
पतंजली फूड्सला लाल मिरची पावडरची बॅच मागे घेण्याचे आदेश
वक्फ दुरुस्ती विधेयक बैठकीत घातला गोंधळ, विरोधी पक्षातील १० खासदार निलंबित
दुसरीकडे, भारत आणि बांगलादेश यांच्यातील संबंधांबद्दल बोलायचे झाले तर, गेल्या काही महिन्यांपासून या दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. या तणावाचे मुख्य कारण म्हणजे सध्याच्या बांगलादेश सरकारचा अल्पसंख्यांक आणि विशेषतः हिंदूंबद्दलचा दृष्टिकोन. गेल्या काही महिन्यांपासून बांगलादेशात राहणाऱ्या हिंदूंवर होणारा हिंसाचार थांबला पाहिजे यावर भारत सातत्याने भर देत आहे. मात्र असे असतानाही तेथील चित्र बदलत नसून सातत्याने हिंदूंना लक्ष्य केले जात आहे.