दोन लहान मुलांच्या डोळ्यादेखत पत्नीने आणि तिच्या प्रियकराने पतीला ठार मारून मृतदेह एका निर्जन ठिकाणी फेकून दिला. त्यानंतर ती प्रियकरासह पोलीस ठाण्यात पती हरवल्याची तक्रार दाखल करायला गेली होती. मालवणी पोलिसांनी काही तासांतच हत्येचा गुन्हा उघडकीस आणून पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे.
मुंबईतील मालवणी येथे घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.पती प्रेमाच्या आड येत असल्यामुळे तिने आणि प्रियकराने मिळून हे हत्याकांड घडवून आणले असल्याची कबुली दोन्ही अटक आरोपीनी दिली आहे.
राजेश चौहान (३५) असे हत्या करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे. राजेश चौहान हा पत्नी पूजा आणि दहा तसेच आठ वर्षाच्या दोन मुलांसह मालाड पश्चिम मालवणी,मार्वे रोड येथील राठोडी येथे राहण्यास होता. मोलमजुरी करून कुटुंबगाडा चालविणारा चौहान हा मूळचा उत्तर प्रदेशातील फैजाबादचा होता. राजेश चौहानच्याच गावात राहणारा इम्रान मन्सूरी हा नोकरीच्या शोधात ३ महिन्यांपूर्वी मुंबईत आला होता. मुंबईत आल्यावर सर्वप्रथम तो राजेश चौहानला भेटला. राजेशने त्याला घरी तात्पुरता आश्रय दिला होता.
इम्रान मन्सूरी हा चौहान कुटूंबियासह राहू लागला आणि त्याचदरम्यान राजेशची पत्नी पूजा आणि इम्रान यांचे सूत जुळले. काही दिवसांपूर्वी याची कुणकुण राजेश चौहानला लागली आणि त्याने इम्रानला दुसरीकडे राहण्यासाठी जा असे सांगितले, परंतु लवकरच मी निघून जाईन असे सांगून तो पुन्हा त्याच ठिकाणी राहू लागला. यादरम्यान पूजा आणि इम्रान यांनी राजेशला संपवून आपल्या प्रेमातील अडसर दूर करण्याचा निर्णय घेतला.
शनिवारी रात्री इम्रान याने राजेश भरपूर मद्यपान करायला दिले. राजेश मद्याच्या नशेत असतांना पत्नी पूजा आणि तिचा प्रियकर इम्रान याने त्याला दोरीने बांधले आणि सोबत आणलेल्या चाकू राजेशच्या मानेवर फिरवला. हा सर्व प्रकार दोन्ही मुलांच्या समोर घडत होता. दोन्ही मुले वडिलांची तडफड बघत होते व व दोघेही घाबरले. त्यात पूजाने त्यांना धमकावले त्यात ते आणखी घाबरले. दोन्ही मुलांना झोपायला लावून पूजा आणि इम्रान या दोघांनी रक्ताने माखलेले कपडे काढून धुवायला टाकले, घरातील रक्ताचे डाग स्वच्छ करून रात्रीच्या वेळी पूजा आणि इम्रान या दोघांनी राजेशचा मृतदेह दुचाकीवर ठेवला आणि दोघे जण मृतदेह घेऊन एका निर्जन ठिकाणी टाकून घरी आले.
हे ही वाचा:
इंडी आघाडीला ठेंगा; २०२६ च्या निवडणुकीसाठी ममतांचा एकला चलोचा नारा
राजस्थानच्या अजमेरमधून ८ बांगलादेशींना अटक!
दगाबाज कोण हे आता उद्धव ठाकरेंनीच सांगावे!
लग्नाच्या संगीत कार्यक्रमात २३ वर्षीय तरुणी नाचता नाचता कोसळली आणि…
दुसऱ्या दिवशी पूजा आणि इम्रान हे दोघे राजेशचा फोटो घेऊन मालवणी पोलीस ठाणे गाठले आणि त्यांनी राजेश हा बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली मात्र काही तरी काळंबेरं असल्याचा संशय येताच पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तेव्हा पूजा आणि इम्रान हे दोघे राजेशला दुचाकीवर मधोमध बसवून दुचाकीवरून जातांना दिसून आले.
पोलिसांचा संशय खरा ठरला आणि पोलिसांनी या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेऊन दोघांकडे कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. मालवणी पोलिसांनी या दोघांविरुद्ध हत्येचा तसेच पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून दोघाना अटक करण्यात आली आहे. मालवणी पोलिसांनी राजेशचा मृतदेह घटनास्थळापासून ५०० मीटर अंतरावरील एका निर्जन ठिकाणाहून ताब्यात घेतला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.