शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाच्या अपहरणाची बातमी समोर येताच राज्यभरात खळबळ उडाली होती. एका माजी मंत्र्याच्या मुलाचे अपहरण कसे होवू शकते?, यावरून राज्यातल्या कायद्यासुव्यवस्थेवरून प्रश्न निर्माण झाले होते. मात्र, तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज सावंत याचे अपहरण झाले नसून तो बँकॉकला गेल्याची माहिती समोर आली. तानाजी सावंत यांनी स्वतः ही माहिती दिली.
यानंतर काल (१० फेब्रुवारी) रात्री ८.३०च्या सुमारास ऋषिराज सावंत सुखरूप पुणे विमानतळावर पोहोचले. ऋषिराज सावंत पुन्हा परतले असले तरी कोणालाही न सांगता बाहेर गेल्याने अनेक प्रश्न उपस्थित केले गेले. कुटुंबात वाद असल्याने ऋषिराजने हे पाऊल उचलल्याचेही बोलले गेले. याच दरम्यान, ऋषिराज सावंत यांचे मोठे बंधू गिरीराज सावंत यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. वडील बँकॉकची परवानगी नाकारतील म्हणून भीतीपोटी ऋषिराज न सांगता निघून गेला असल्याचे गिरीराज सावंत यांनी म्हटले आहे.
हे ही वाचा :
युट्यूबने रणवीर अलाहबादियाचा ‘आक्षेपार्ह’ व्हिडिओ काढून टाकला
जपानची कार्य संस्कृती सर्वोत्तम
इंडी आघाडीला एकत्र बसून बारकाईने काम करावे लागेल
महाकुंभात ४५ कोटी भाविकांनी केले पवित्र स्नान
सावंत कुटुंबात कोणताही वाद नाही असे गिरीराज सावंत म्हणाले. ते पुढे म्हणाले, दुपारच्या ३ च्या दरम्यान ऋषिराज सावंत यांचा मेसेज आला कि दोन दिवसांकरिता बाहेर जात आहे आणि त्यानंतर त्याने मोबाईल बंद केला. कुठे?, का? आणि कोणाबरोबर गेला याची काहीही माहिती नसल्यामुळे आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, संपर्क न झाल्यामुळे भयभीत होऊन आम्ही सिंहगड पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केली.
ते पुढे म्हणाले, यापूर्वी ऋषिराज दुबईला गेला होता. दुबईहून ८ दिवसानंतर परतल्यानंतर बिझनेस संदर्भात बँकॉकला जायचे होते. मात्र, दुबईहून नुकतेच परतल्यामुळे घरातील बँकॉकला जाण्यासाठी सोडणार नाहीत, अशी भीती ऋषिराजला होती. या भीतीपोटी कोणाला काही न सांगता तो निघून गेला. अशा परिस्थितीत आम्ही मिसिंग आणि अपहरणाची एफआयआर दाखल केली. कुटुंबात कोणताही वाद नाही, तो स्वइच्छेने गेला होता. त्यामुळे विरोधकांनीही यावर राजकारण करू नये. कारण कोणावरही अशी वेळ येवू शकते. या गोष्टीवर आता पडदा टाकायला हवा, असे गिरीराज सावंत म्हणाले.