नुकत्याच झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत ‘इंडी’ आघाडीचे घटक पक्ष असलेले काँग्रेस आणि आप स्वतंत्र निवडणूक मैदानात उतरले होते. दरम्यान, दोन्ही पक्षांना निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागाला. काँग्रेस पक्षाला खातेही उघडता आले नाही. यानंतर या दोन्ही पक्षांच्या स्वतंत्र निवडणूक लढवण्यावरून ‘इंडी’ आघाडीच्या नेत्यांकडून टीका होत असताना ज्येष्ठ वकील आणि राज्यसभा खासदार कपिल सिब्बल यांनीही या दोन्ही पक्षांवर टीका केली.
कपिल सिब्बल म्हणाले की, इंडी आघाडीला एकत्र बसून त्यांच्या गोष्टी सोडवण्यासाठी बारकाईने काम करावे लागेल. काँग्रेसबद्दल बोलताना ते म्हणाले की, हा पक्ष नेहमीच एकत्र काम करण्याचा आणि संमतीने पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. पण, कधीकधी आघाडीमध्ये समस्या येतात. २०२० च्या बिहार विधानसभा निवडणुकीचे उदाहरण देऊन त्यांनी म्हटले की, जिथे काँग्रेसच्या निराशाजनक कामगिरीमुळे ‘महागठबंधन’ बहुमतापर्यंत पोहोचू शकली नाही.
“काँग्रेस पक्ष नेहमीच एकत्र काम करण्याचा आणि संमतीने पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. कधीकधी समस्या येतात. बिहारमध्ये गेल्या निवडणुकीत काँग्रेसला जागा देण्यात आल्या होत्या पण त्यांना विजय मिळवता आला नाही आणि आरजेडीने म्हटले होते की, ते काँग्रेसमुळे सत्तेत येऊ शकले नाहीत. इंडी आघाडीमधील सर्व पक्षांना निवडणुका कशा लढायच्या हे ठरवावे लागेल,” असे मत कपिल सिब्बल यांनी पत्रकार परिषदेत मांडले.
अलिकडे दिल्ली, महाराष्ट्र, हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपाने मोठा विजय मिळवला. यावर बोलताना कपिल सिब्बल म्हणाले की, भाजपचा फायदा असा आहे की ते एकाच कमांडखाली निवडणुका लढवतात. त्यामुळे त्यांना फायदा होतो. उत्तर प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये काँग्रेस युतीने लढली आणि त्यांना फायदा झाला. या सर्व गोष्टी इंडी आघाडीला बसून सोडवाव्या लागतील, असे सिब्बल यांनी म्हटले आहे.
हे ही वाचा :
राजस्थानच्या अजमेरमधून ८ बांगलादेशींना अटक!
मुंबई हल्ल्यासारख्या पाकिस्तानने दिलेल्या जखमा विसरता येणार नाहीत
इंडी आघाडीला ठेंगा; २०२६ च्या निवडणुकीसाठी ममतांचा एकला चलोचा नारा
ट्रम्प यांचा हमासला अल्टिमेटम; शनिवारी दुपारी १२ वाजेपर्यंत सर्व ओलिसांना सोडा अन्यथा…
“शरद पवारांनी अनेक वेळा पुनरुच्चार केला की, राष्ट्रीय युती फक्त राष्ट्रीय निवडणुका असल्यावरच लागू होते आणि प्रादेशिक निवडणुकांमध्ये लागू होत नाही. प्रादेशिक पक्ष राज्याबाहेरही पाऊल ठेवू इच्छितात आणि राष्ट्रीय पक्षाला त्यांचे महत्त्व कमी होऊ नये असे वाटते. म्हणूनचं चर्चा करून इंडी आघाडीमधील घटक पक्षांनी पुढे जावे,” असे सिब्बल म्हणाले. कपिल सिब्बल म्हणाले की, इंडी आघाडी अबाधित राहील यात शंका नाही. आमच्या प्रादेशिक पक्षांचे नेतृत्व सांभाळणारे लोक खूप समजूतदार लोक आहेत आणि त्यांना माहिती आहे की आपण कोणत्या आव्हानांना तोंड देत आहोत.