काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार शशी थरूर यांनी म्हटले आहे की, पाकिस्तानशी कोणत्याही अडथळ्याशिवाय चर्चा करणे आता शक्य नाही. पाकिस्तानसंबंधी त्यांनी असे विधान करून मोदी सरकारमधील परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या वक्तव्याला समर्थन दिले आहे. २६/११ च्या मुंबई हल्ल्यासारख्या जखमा विसरता येणार नाहीत, असं म्हणत शशी थरूर यांनी म्हटले आहे की, काहीही घडलेच नाही असे वागणे खूप कठीण आहे. फॉरेन करस्पॉन्डंट्स क्लब (एफसीसी) येथे आयोजित पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात थरूर बोलत होते.
शशी थरूर म्हणाले की, जेव्हा सरकारने पाकिस्तानशी चर्चा करण्याचा निर्णय घेतला होता, तेव्हा मुंबईत दहशतवादी हल्ला झाला. अशा परिस्थितीत, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी बरोबर म्हटले होते की, आता पाकिस्तानशी साधेपणाने चर्चा होऊ शकत नाही. शशी थरूर म्हणाले की, पाकिस्तानातील लोकांशी लोकांशी संवाद वाढवला पाहिजे. पाकिस्तानी लोकांना अधिकाधिक व्हिसा देण्यात यावा. थरूर म्हणाले की, पाकिस्तानातून जो कोणी भारतात येतो, तो आपल्या देशाच्या प्रेमात पडतो. संवाद थांबवणे हे धोरण नाही. पण, त्याचवेळी पठाणकोट आणि मुंबईत पाकिस्तानने केलेले हल्ले कधीही विसरता येणार नाहीत.
एका संसदीय समितीच्या जुन्या अहवालाचा हवाला देत ते म्हणाले की, जर तुम्हाला पाकिस्तानमध्ये भारताची प्रतिमा सुधारायची असेल तर अधिक लोकांना व्हिसा द्यावा लागेल. आम्ही स्वतः म्हटले होते की पाकिस्तानवर धोरणात्मक पातळीवर विश्वास ठेवता येत नाही परंतु जनतेशी संबंध मजबूत करणे आवश्यक आहे. जर भारताने असे केले तर पाकिस्तानमध्येही भारताला पाठिंबा वाढेल आणि तेथील लोक शांततेची मागणी करण्यासाठी पुढे येतील. असा एकही पाकिस्तानी नाही जो भारतात आला असेल आणि आपल्या देशाच्या प्रेमात पडला नसेल. पर्यटक, गायक, संगीतकार आणि खेळाडू देखील म्हणतात की त्यांना भारतात यायचे आहे.
हे ही वाचा :
ट्रम्प यांचा हमासला अल्टिमेटम; शनिवारी दुपारी १२ वाजेपर्यंत सर्व ओलिसांना सोडा अन्यथा…
‘राहुल गांधी माफी मागा अन्यथा हिंदू धर्मातून बहिष्कृत करू’
वादानंतर ममता कुलकर्णी यांचा किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर पदाचा राजीनामा
सध्याचे सरकार असेही म्हणते की दहशतवाद आणि चर्चा एकत्र होऊ शकत नाहीत. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनीही म्हटले होते की पाकिस्तानशी विनाअडथळा चर्चेची वेळ आता संपली आहे. भारत नेहमीच प्रत्युत्तर देण्यास तयार आहे. थरूर यांनी मान्य केले की, पाकिस्तानच्या कृतींमुळे भारताला कठोर भूमिका घेण्यास भाग पाडले गेले. ते म्हणाले की, जर कोणतेही सरकार या मुद्द्याला गांभीर्याने घेत असेल तर पाकिस्तान त्यांना चर्चा संपवण्यास भाग पाडते. ते म्हणाले की, चर्चेचा शेवट कायमचा जाहीर करणे शक्य नाही. पण जुने मुद्दे विसरून मित्रांसारखे बोलणे शक्य नाही.