उत्तर प्रदेशातील संभल शहरातील कोट गरवी परिसरातील शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणादरम्यान झालेल्या हिंसाचाराच्या संदर्भात पोलिसांनी रविवारी (१६ फेब्रुवारी) आणखी दोन आरोपींना अटक केली. पोलिसांनी जारी केलेल्या निवेदनानुसार, मोहम्मद हसन आणि समद अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून त्यांना नखासा पोलिस स्टेशन परिसरात अटक केल्यानंतर तुरुंगात पाठवण्यात आले आहे.
चौकशीदरम्यान, आरोपीने २४ नोव्हेंबर रोजी शाही जामा मशिदीत सर्वेक्षणादरम्यान जमलेल्या जमावाचा भाग असल्याचे कबूल केले. चौकशीदरम्यान त्यांनी सांगितले की, घटनेची माहिती मिळाल्यानंतर ते अंजुमन चौकात पोहोचले. या ठिकाणी जमलेल्या जमावाने या प्रकरणाला धार्मिक म्हटले आणि एकत्र येण्याचे आवाहन केले.
यानंतर, जमाव हिंदूपुरा खेडा नखासा चौकाकडे वळला आणि त्याठिकाणी पोलिसांवर गोळीबार केला, दगडफेक केली आणि पोलिसांचे वाहन पेटवून दिले, असे आरोपींनी चौकशीत सांगितले. दोनही आरोपींना तुरुंगात पाठवण्यात आले आहे.
हे ही वाचा :
बॉक्स ऑफिसवर ‘छावा’ची डरकाळी; तीन दिवसांत १०० कोटींचा टप्पा पार
दिल्लीनंतर बिहारमध्ये भूकंपाचा धक्का; ४ रिश्टर स्केलची तीव्रता
११२ अनधिकृत भारतीयांची तिसरी तुकडी अमृतसरमध्ये दाखल
दिल्लीला ४.३ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का; पंतप्रधान मोदींकडून सतर्कतेचे आवाहन
दरम्यान, गेल्या वर्षी १९ नोव्हेंबर २०२४ रोजी, संभल येथील स्थानिक न्यायालयाने हिंदू पक्षाच्या याचिकेवर विचार केल्यानंतर, अधिवक्ता आयुक्तांकडून मशिदीचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते. १५२६ मध्ये मुघल सम्राट बाबरने मंदिर पाडल्यानंतर त्या ठिकाणी जामा मशीद बांधली गेल्याचा दावा हिंदू पक्षाकडून करण्यात आला होता. न्यायालयाच्या आदेशानंतर सर्वेक्षणादरम्यान पथकावर स्थानिक जमावाकडून हल्ला करण्यात आला. यावेळी झालेल्या हिंसाचारात चार लोकांचा मृत्यू झाला तर अनेक पोलीस जखमी झाले होते.