डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेची सूत्र हाती घेताच त्यांनी अमेरिकेतील बेकायदेशीर स्थलांतरितांना हद्दपार करण्याची मोहीम आक्रमकपणे हाती घेतली आहे. अमेरिकेने लष्करी विमानांचा वापर करून बेकायदेशीर स्थलांतरितांसाठी उड्डाणे सुरू केली आहेत. बेकायदेशीर स्थलांतरितांना मोठ्या प्रमाणावर हद्दपार करणे हे ट्रम्प यांच्या प्रचारातील प्रमुख निवडणूक आश्वासनांपैकी एक होते. याबाबतच्या सरकारी आदेशावर ट्रम्प यांनी स्वाक्षरीही केली आहे. याचं कारवाई दरम्यान, ५ फेब्रुवारी रोजी अमृतसरमध्ये १०४ हद्दपार केलेल्या स्थलांतरितांना घेऊन अमेरिकन लष्करी विमान आले होते. यानंतर ११६ बेकायदेशीर स्थलांतरित भारतीयांच्या तुकडीला घेवून शनिवारी (१५ फेब्रुवारी) दुसरे विमान अमृतसरमध्ये दाखल झाले. तर, ११२ भारतीयांच्या तिसऱ्या तुकडीला घेऊन जाणारे अमेरिकेचे विमान रविवार, १६ फेब्रुवारी रोजी रात्री अमृतसरमध्ये दाखल झाले.
अमेरिकन हवाई दलाचे सी- १७ ग्लोबमास्टर विमान रात्री १० वाजता पंजाबमधील अमृतसर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. यातील ११२ निर्वासितांपैकी ४४ हरियाणाचे, ३३ गुजरातचे, ३१ पंजाबचे, दोन उत्तर प्रदेशचे आणि प्रत्येकी एक उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशचे लोक आहेत. इमिग्रेशन, पडताळणी आणि पार्श्वभूमी तपासणीसह सर्व औपचारिकता पूर्ण केल्यानंतरचं या निर्वासितांना घरी परतण्याची परवानगी दिली जाईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. अमेरिकेने आतापर्यंत तिन्ही उड्डाणांमधून एकूण ३३२ बेकायदेशीर भारतीय स्थलांतरितांना हद्दपार करत मायदेशी पाठवले आहे.
दरम्यान, शनिवारी रात्री उशिरा ११६ बेकायदेशीर स्थलांतरित भारतीयांच्या तुकडीला आणलेल्यांमधील पुरुषांनी दावा केला की, त्यांना संपूर्ण उड्डाणादरम्यान बेड्यांमध्ये ठेवण्यात आले होते. विमानात तीन महिला आणि तीन मुले होती ज्यांना साखळ्यांनी बांधलेले नव्हते. अमृतसरमध्ये विमान उतरण्यापूर्वी साखळ्या काढून टाकण्यात आल्या.
हे ही वाचा :
दिल्लीला ४.३ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का; पंतप्रधान मोदींकडून सतर्कतेचे आवाहन
आयपीएलच्या १८ व्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर !
‘छावा’ चित्रपटातील संभाजी महाराजांच्या हत्येच्या प्रसंगाने रसिक गलबलले!
कोण कुणाला भेटले यावरून कसे काय राजकारण होऊ शकते?
दरम्यान, पंजाबच्या पटियाला जिल्ह्यातील राजपुरा येथील दोन निर्वासितांना एका हत्या प्रकरणात अमृतसरमध्ये उतरल्यानंतर लगेचच अटक करण्यात आली. संदीप सिंग उर्फ सनी आणि प्रदीप सिंग यांच्यावर २०२३ मध्ये दाखल झालेल्या हत्या प्रकरणात आरोप होते.