भाजप पक्षाच्या विधिमंडळ बैठकीनंतर १९ फेब्रुवारी रोजी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांची निवड करण्याची शक्यता आहे, अशी सूत्रांकडून माहिती मिळाली. मुख्यमंत्र्यांचा शपथविधी समारंभ २० फेब्रुवारी रोजी दिल्लीत होणार असून तो दिल्लीतील रामलीला मैदानात आयोजित केला जाणार असल्याची माहिती आहे.
मुख्यमंत्री निवडीबाबत भाजपच्या भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक सोमवारी (१७ फेब्रुवारी) पार पडणार होती. मात्र, ती बैठक पुढे ढकलण्यात आली असून आता १९ फेब्रुवारी रोजी होणार आहे. या बैठकीमध्ये दिल्लीचा नवा मुख्यमंत्री ठरवला जाणार आहे. त्यानंतर २० फेब्रुवारी रोजी शपथसोहळा दिल्लीच्या रामलीला मैदानावर पार पडणार आहे. या सोहळ्याला एनडीएतील प्रमुख नेते सहभागी राहणार असल्याची माहिती आहे.
मुख्यमंत्री पदासाठी परवेश वर्मा यांच्यासह भाजपचे वरिष्ठ नेते आणि दिल्ली विधानसभेतील माजी विरोधी पक्षनेते विजेंदर गुप्ता, ब्राह्मण नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष सतीश उपाध्याय, केंद्रीय नेत्यांशी जवळचे संबंध म्हणून ओळखले जाणारे दिल्ली भाजपचे सरचिटणीस आशिष सूद, आणि वैश्य समुदायाचे संघाचे मजबूत प्रतिनिधी जितेंद्र महाजन यांच्याही नावाची चर्चा आहे. या यादीमध्ये रेखा गुप्ता आणि शिखा रॉय यांच्याही नावाचा समावेश आहे.
हे ही वाचा :
संभल हिंसाचार प्रकरणी हसन आणि समदला अटक, दगडफेकीची दिली कबुली!
दिल्लीनंतर बिहारमध्ये भूकंपाचा धक्का; ४ रिश्टर स्केलची तीव्रता
चार वर्षांत चार वेळा लग्न करून बांगलादेशी महिलेने उकळले पैसे
११२ अनधिकृत भारतीयांची तिसरी तुकडी अमृतसरमध्ये दाखल
दरम्यान, दिल्लीत ५ फेब्रुवारी रोजी झालेल्या निवडणुकीत भाजपने ७० पैकी ४८ विधानसभा जागा जिंकल्या तर आम आदमी पक्षाने (आप) २२ जागा जिंकल्या. दिल्लीत २७ वर्षांनी भाजपचे सरकार स्थापन होणार आहे. या निवडणुकीत अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया सारख्या मोठ्या नेत्यांना पराभवाचा सामनाही करावा लागला.