गुजरात दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) कच्छ सीमावर्ती भागातून एका संशयित गुप्तहेराला अटक केली आहे. सहदेव सिंग गोहिल असे आरोपीचे नाव असून तो गुजरातचा रहिवासी आहे. सहदेव हा पाकिस्तानच्या इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजेंसच्या (आयएसआय) संपर्कात होता आणि भारताशी संबंधित संवेदनशील माहिती पुरवत होता, अशी माहिती समोर आली आहे.
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या व्यक्तीने गुजरातमधील काही संवेदनशील ठिकाणांबद्दल माहिती दिली होती. एटीएसने संशयिताला अधिक चौकशीसाठी अहमदाबादला आणले आहे. गुजरात एटीएसचे एसपी के सिद्धार्थ म्हणाले की, कच्छ येथील आरोग्य कर्मचारी सहदेव गोहिल याला पाकिस्तानी एजंटसोबत संवेदनशील माहिती शेअर केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. एटीएसच्या म्हणण्यानुसार, गोहिल बीएसएफ आणि आयएएफशी संबंधित माहिती देत असल्याचे संकेत मिळाले होते. त्याला १ मे रोजी प्राथमिक चौकशीसाठी बोलावण्यात आले होते.
चौकशीदरम्यान, गोहिलने जून- जुलै २०२३ मध्ये व्हॉट्सअॅपवर अदिती भारद्वाज नावाच्या महिलेच्या संपर्कात आल्याचे उघड केले. नंतर त्याला कळले की ती एक पाकिस्तानी एजंट आहे. तिने त्याला बीएसएफ आणि आयएएफच्या ठिकाणांचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करण्यास सांगितले होते. विशेषतः नव्याने बांधलेल्या किंवा बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणांचे. महिलेच्या सांगण्यानुसार गोहिल याने व्हॉट्सअपद्वारे मीडिया फाइल्स पाठवल्या.
हे ही वाचा..
गुजरातमधील बनासकांठामध्ये पाकिस्तानी घुसखोराला घातल्या गोळ्या
१० लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या नक्षलवाद्याचा झारखंडमध्ये खात्मा
नाभवर नियमित तेल लावल्याने काय फायदा ?
२०२५ च्या सुरुवातीला, गोहिलने त्याच्या आधार तपशीलांचा वापर करून एक सिम कार्ड खरेदी केले आणि ओटीपी वापरून भारद्वाजसाठी व्हॉट्सअप सक्रिय केले. त्यानंतरचे सर्व संवाद आणि फाइल शेअरिंग त्याच नंबरवरून झाले. एका अज्ञात व्यक्तीने त्याला ४०,००० रुपये रोख देखील दिले, अशीही माहिती आहे. एसपी सिद्धार्थ यांनी पुढे सांगितले की, भारद्वाजशी जोडलेले व्हॉट्सअप अकाउंट पाकिस्तानमधून चालवले जात होते. गोहिलचा फोन फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीकडे पाठवण्यात आला आहे. गोहिल आणि पाकिस्तानी एजंट दोघांविरुद्ध बीएनएसच्या कलम ६१ आणि १४८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
