क्षुल्लक वादातून महिलांनी एका दाम्पत्याच्या डोक्यात फरशी प्रहार करून हत्येचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी जुहू येथे घडली. या हल्ल्यात ते दाम्पत्य गंभीर जखमी झाले असून त्यांना कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा जीवघेणा हल्ला परिसरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला असून या कॅमरातील फुटेज वरून जुहू पोलिसांनी सिमरन पांडे आणि नितु पांडे या दोन महिला विरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
अमृत निकम (४८) आणि पत्नी आशा असे हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या दाम्पत्यांचे नावे आहेत. अमृत निकम हे कुटूंबियासह जुहू येथील एन.एस. रोड नंबर १३ गॉडगिफ्ट इमारतीत राहण्यास आहे. त्याच परिसरात सिमरन पांडे आणि नितु पांडे या दोघी राहण्यास आहे. या दोघी परिसरात अनेकांना उगाच त्रास देऊन त्यांच्यासोबत बळजबरीने भांडण उकरून काढतात, काही दिवसांपूर्वी या दोघी इमारतीच्या आवारात पाण्याच्या टाकीजवळ भटक्या कुत्र्यांना जेवण देत असल्यामुळे अमृत निकम यांनी त्यांना रोखले होते, तेव्हा पासून या दोघी कुठल्या न कुठल्या कारणावरून निकम दाम्पत्यासोबत वाद घालून भांडण उकरून काढत असे.
हे ही वाचा:
आयसीसी स्पर्धांमध्ये कोणत्या खेळाडूंचा वाजतोय डंका!
हंपीमध्ये इस्रायली पर्यटकासह तरुणीवर सामुहिक बलात्कार; पुरुष साथीदारांवर केला हल्ला
शुक्रवारी दुपारी अमृत निकम हे आपली मोटार सायकल इमारतीच्या शेजारी असलेल्या गल्लीत उभी करीत असताना सिमरन पांडे आणि नितु पांडे या दोघी त्या ठिकाणी आल्या आणि त्यांनी जुना वाद उकरून काढता अमृत यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करून त्यांच्या अंगावर धावून गेल्या, ‘आज तुला आणि तुझ्या पत्नीला जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी देऊन अमृत यांना मारहाण करू लागल्या, दरम्यान अमृत निकम याची पत्नी त्या ठिकाणी बचावासाठी आलेल्या असताना या दोघीनी रस्त्यावर पडलेली फरशी उचलून अमृत आणि त्याची पत्नी आशा यांच्या डोक्यात मारून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर या दोघीना स्वतः आरडाओरडा करून तेथून पळ काढला.
हल्ल्यात जखमी झालेल्या या दाम्पत्यांना स्थानिकांनी तात्काळ नजीकच्या कूपर रुग्णालय येथे दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. या प्रकरणी जुहू पोलिसांनी हत्येचा प्रयत्न केल्या प्रकरणी सिमरन आणि नितु पांडे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.