वाल्मिक कराड गेला आणि खोक्या भोसले चर्चेत आला. तेवढाच निर्ढावलेला, तेवढाच क्रूर. बीडचे राजकारण पाहिल्यानंतर आता असा संशय येऊ लागलाय की इथे झालेला राजकीय राडा ‘आका‘ बनण्यासाठी तर नव्हता? सनी देओलच्या सुपरहीट अर्जून सिनेमाची स्क्रीप्ट जशीच्या तशी बीडमध्ये साकारलेली नाही ना? बीडच्या गुन्हेगारी राजकारणाचा बाजार उठवायचा असेल तर इथे सगळ्या छोट्या-मोठ्या आकांचा हिशोब करण्याची गरज आहे. नाही तर इथे सर्वसामांन्यांचे राजकीय बळी सुरू राहतील.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी गेल्या काही दिवसात एक नवे प्रकरण काढले आहे. सतीश उर्फ खोक्या भोसले या नव्या टग्याचे. हा कारमध्ये पैशाची बंडलं घेऊन फिरतो, पैसे उधळतोय, कुणाला तरी मारहाण करतोय, असे काही व्हीडीओही व्हायरल झालेले आहेत. हा भाजपाचे आमदार सुरेश धस यांचा खास कार्यकर्ता असल्याचा दावा दमानिया यांनी केलेला आहे. हे धस अलिकडे संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर चर्चेत आहेत. या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे ते अनेकांसाठी हिरो ठरले. वाल्मिक कराडच्या गुंडगिरीच्या विरोधात त्यांनी ज्या प्रकारे आवाज उठवला ते पाहून या माणसाला गुंडगिरी, दहशतीच्या विरोधात मनस्वी चीड आहे, असे चित्र सर्वसामान्य लोकांमध्ये निर्माण झाले. परंतु हे खोक्या भोसले प्रकरण उघड झाल्यानंतर पुन्हा एकदा लोकांच्या वाट्याला मोठा भ्रमनिरास येणार की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येपासूनचा घटनाक्रम पाहील्यानंतर बीडचे एकूण राजकीय आणि सामाजिक चित्र आपल्या समोर येते. पराकोटीचा जातीयवाद, राजकारणाचे गुन्हेगारीकरण आणि गुन्हेगारीचे राजकारण हे दोन्ही प्रवाह इथे आहेत. या प्रवाहांना बळकटी देणारा दोन नंबरचा पैसा इथे आहे. हा पैसा निर्माण करणारी ऊर्जा प्रकल्पातून निर्माण होणारी राख इथे आहे, वाळूची तस्करी आहे, खंडणी आहे. यातून निर्माण होणारा पैसा प्रचंड आहे, इतका प्रचंड की रश्मिका मंदाना सारख्या बॉलिवूडच्या तारका इथे येऊन उजेड पाडू शकतात. बीडमधील हे साम्राज्य खूप मोठे आहे, शक्तिशाली आहे. हे साम्राज्य ताब्यात घेण्यासाठी बीडमध्ये खूप मोठा अंतर्गत राजकीय संघर्ष सुरू होता. वाल्मिक कराडच्या माध्यमातून धनंजय मुंडे यांनी बीडचे हे साम्राज्य ताब्यात ठेवले होते. इथली पकड कमजोर होऊ नये म्हणून कराड घाऊक प्रमाणात क्रौर्याचा वापर करत होता. संतोष देशमुख यांची जी हाल हाल करून हत्या झाली, त्याची स्क्रीप्ट आधीच देण्यात आली असण्याची शक्यता नाकारता येणार नाही. देशमुख यांची अशा प्रकारे हत्या करण्यामागे पुढे कराडच्या विरोधात जाण्याची कोणी हिंमत करणार नाही, असा मारेकऱ्यांचा प्रयत्न होता. जोपर्यंत कराड आणि त्याचे टोळके आहे, तोपर्यंत बीडचे आर्थिक, राजकीय साम्राज्य धनंजय मुंडे यांच्या हाती राहणार ही बाब उघड होती. म्हणून हे प्रकरण धसांनी लावून धरले. धसांचे हे प्रयत्न यशस्वी झाले. याबद्दल धसांचे प्रचंड कौतूक झाले, आम्हीही न्यूज डंकाच्या माध्यमातून त्यांच्यावर कौतूकाची फुलं उधळली. धस यांना खरोखरच बीडच्या सडलेल्या राजकारणाची आणि गुन्हेगारी अर्थकारणाची साफसफाई करायची होती का? की धनंजय मुंडे यांचा काटा काढून त्यांना बीडचा नवा आका बनायचे होते. त्यांना मुंडे यांची जागा घ्यायची होती आणि खोक्या भोसलेला वाल्मिक कराडची.
हा खोक्या भोसले याच्या जातीवरून आम्हाला कोणताही खल करायचा नाही. तो मराठा नाही असे खुलासे आले. तो पारधी आहे, किंवा अन्य कोणत्या समाजाचा याच्याशी आमचे काही घेणे देणे नाही. तो गुन्हेगार असेल, तो वाल्मिक कराड बनण्याच्या मार्गावर असेल तर त्याला ठेचायला हवा. दहशतवादाला धर्म नसतो असे पुरोगामीत्व सतत झाडणारे बीडमध्ये गुन्हेगार आणि त्यांचे समर्थन करणाऱ्या राजकीय नेत्यांची जात का शोधतात या अनेकांना न सुटलेला प्रश्न आहे. खोक्या हा धस यांचा कार्यकर्ता आहे, असे वारंवार सांगितले जात आहे. धस यांनी याप्रकरणी अद्यापि खुलासा केलेला नाही. त्याच्याकडे नोटांची ही बंडले कुठून आली. की तोही कराड सारखी वसूली करतो? त्यालाही कराड याच्याप्रमाणे राजकीय आशीर्वाद आहे. त्याचीही कराड प्रमाणे दहशत निर्माण करून बीडचे राजकारण आणि अर्थतंत्र ताब्यात घेण्याचे कुणाचे प्रयत्न सुरू आहेत, या प्रश्नाची उलक लवकरात लवकर व्हायला हवी.
हे ही वाचा..
पुण्यात बीएमडब्लू रस्त्यात उभी करून मद्यधुंद तरुणांचे अश्लील चाळे; व्हिडीओ व्हायरल
पंतप्रधान मोदींचे महिला सशक्तीकरणात अद्भुत कार्य
इस्रायल सीमेवर गोळीबारात ठार झालेला भारतीय तरुण नोकरी आमिषाचा ठरला बळी; कुटुंबाचा दावा
समाजात जे काही घडते ते सिनेमात दिसते असे म्हणतात. अर्जून हा १९८५ साली रिलीज झालेला सनी देओलचा यशस्वी सिनेमा. एका नेत्याचे गुन्हेगारी साम्राज्य उखडून टाकण्यासाठी एक कथित सज्जन नेता एका दणकट, सुशिक्षित आणि संवेदनशील तरुणाची मदत घेतो. हा तरुण मनगटाच्या बळावर हे साम्राज्य उलथून टाकतो. परंतु त्याचा वापर करून घेणाऱ्याला त्या सज्जन नेत्याला गुन्हेगारी साम्राज्य संपवायचे नसते. त्याला साम्राज्याच्या सम्राटाला संपवून नवा सम्राट बनायचे असते. हेच कथानक पुढे संजय दत्तच्या कुरुक्षेत्रमध्ये पाहायला मिळाले. तेच आता बीडमध्ये घडतेय का, असा संशय येऊ लागलेला आहे.
बीडच्या राजकारणातून मुंडेंचा राजकीय अस्त व्हायलाच हवा, परंत तिथे दुसरा मुंडे येऊ देता कामा नये. बीडकरांना दुसरा आका नको आहे. बीडमध्ये सम्राटाचाही अस्त व्हायला हवा आणि गुन्हेगारी साम्राज्याचाही. या साम्राज्यावर मुख्यमंत्र्यांनी वरवंटा चालवण्याची गरज आहे. या साम्राज्याचा नायनाट करण्याची गरज आहे. त्यामुळे खोक्याची वळवळ संपवायला हवी. त्याचा जो कोणी आका असेल त्याचाही बंदोबस्त करायला हवा. सुरेश धस याप्रकरणातही आवाज उठवतील अशी अपेक्षा आहे.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)