गोरेगाव येथील नेस्को परिसरातील कार्यक्रमा दरम्यान झालेल्या घटनेला काही महिने उलटत नाही तोच वरळीतील एका म्युझिक कॉन्सर्टमध्ये २८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. याच कार्यक्रमादरम्यान एका ३१ वर्षीय महिलेचीही प्रकृती बिघडल्याने तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावे लागले.
याच कार्यक्रमात उपस्थित असलेल्या ३१ वर्षीय महिलेचीही प्रकृती बिघडली. तिला तत्काळ जसलोक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. आवश्यक वैद्यकीय उपचारानंतर तिची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. प्राथमिक चौकशीत संबंधित महिलेने कार्यक्रमादरम्यान मद्य आणि एनर्जी ड्रिंक्सचे सेवन केल्याची माहिती दिली असून, कोणत्याही अमली पदार्थाच्या सेवनाचे संकेत आढळून आलेले नाहीत.
हे ही वाचा:
वरळीतील लाइव्ह कॉन्सर्टमध्ये तरुणाचा गूढ मृत्यू
दिल्ली अग्निकांडात कुक केशव नेगीचा मोठा खुलासा
चेंबूरमध्ये चिमुरडीचे अपहरण करण्याचा प्रयत्न फसला
तरुणाच्या मृत्यूमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. कार्यक्रमस्थळी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तसेच इतर इलेक्ट्रॉनिक पुराव्यांची तपासणी करण्यात येत आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
ताडदेव पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरुणाने वरळी येथील एनएससीआय डोममध्ये आयोजित करण्यात आलेल्या म्युझिक कॉन्सर्टला हजेरी लावली होती. कार्यक्रमादरम्यान त्याला अचानक वैद्यकीय त्रास जाणवू लागल्याने घटनास्थळावरून रुग्णवाहिकेतून त्याला ब्रीच कँडी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले.







