32 C
Mumbai
Sunday, February 9, 2025
घरसंपादकीयदादा बोलेना!

दादा बोलेना!

Google News Follow

Related

राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला राज्यातल्या सुज्ञ मतदारांनी भरभरून मतदान केल्यानंतर, यश दिल्यानंतर राज्याचे जे मंत्रिमंडळ स्थापन झालं त्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांना संधी मिळाली नाही. त्यामुळे छगन भुजबळ यांनी माध्यमांसमोर थेट आपली जी काही प्रतिक्रिया आहे, नाराजी आहे ती व्यक्त केलेली होती. त्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून पक्ष संघटनेची थोडं फटकूनच वागत होते. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिवेशन शिर्डीमध्ये सुरू झालेले आहे. अधिवेशन दोन दिवस होणार आहे. या अधिवेशनाला छगन भुजबळ येतील का नाही अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत असताना छगन भुजबळ यांनी शिर्डीतील अधिवेशनाला हजेरी लावली. मात्र उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्याशी त्यांचा अबोला मात्र कायम राहिलेला आहे. त्यांच्याशी अजित पवार बोललेले नाहीत. श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या साईबाबांच्या शिर्डीत जाऊन सुद्धा छगन भुजबळ यांनी आपली जी मळमळ आहे ती मळमळ व्यक्त केलेली आहे.

गेल्या दीड महिन्यापासून छगन भुजबळ ही आपल्या मनातली मळमळ व्यक्त करतच आहेत. कारण भुजबळांना मंत्रिमंडळात घेतलं नाही ही फार मोठी सल त्यांच्या मनाला लागून राहिलेली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पूर्वीचे जर वातावरण आपण आठवत असेल तर राज्यात मराठा समाज आणि ओबीसी समाज यामध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून प्रचंड संघर्ष झालेला होता. मराठा समाजाचे नेते मनोज जरंगे पाटील आणि ओबीसीचे नेते छगन भुजबळ यांच्यात कलगीतुरा रंगलेला होता. त्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत विशेषतः मराठवाड्यामध्ये कशा पद्धतीने मतदान झालं? मराठा समाज कसा एकवटला हे स्पष्ट झालेलं होतं. आणि विधानसभा निवडणुका तोंडावर असल्यामुळे मराठा आणि ओबीसी हा जो आरक्षणावरून झालेला संघर्ष आहे या संघर्षाचे नेतृत्व ओबीसी समाजाकडून छगन भुजबळ यांनी केलं होतं. मनोज जरांगे पाटील यांच्या प्रत्येक आरोपाला छगन भुजबळ यांनी सभा घेऊनच उत्तर दिलेलं होतं. विधानसभा निवडणूक पार पडली आणि भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांची या तिन्ही पक्षाला राज्यातल्या जनतेने स्पष्ट बहुमत दिलं. महायुतीचा या विजयामध्ये ओबीसी समाजाचा मोठा वाटा असल्याचा दावा छगन भुजबळ यांनी केलेला होता. असे असून सुद्धा मंत्रिमंडळ स्थापनेमध्ये छगन भुजबळ यांना अजित पवार यांनी स्थान दिलेलं नाही. त्यामुळे भुजबळ हे पहिल्या दिवसापासून अजित पवार यांच्या विरोधात बोलतायेत आणि आज पक्षाच्या अधिवेशनात सुद्धा सहभागी होत आहेत. याचा राजकीय अर्थ काय काढायचा हाच मोठा प्रश्न होऊन बसलेला आहे.

भुजबळ यांनी सांगितले की पक्षाचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी विनंती केल्यामुळे मी काही वेळासाठी म्हणून या अधिवेशनाला आलेलो आहे. याचा अर्थ असा नाही की माझ्या मनातलं जे काही होतं ते सगळं स्वच्छ झालं. म्हणजे छगन भुजबळ यांच्या मनात अजित पवार यांच्या बद्दल जी भावना निर्माण झाली आहे ती अजून गेलेली नाही. अजित पवारांनीच आपला घात केला आणि मंत्रीमंडळात घेतले नाही असा त्यांचा अप्रत्यक्ष आरोप आहे. कारण मंत्रिमंडळ तयार झाल्यानंतर ना ते नागपूरच्या अधिवेशनात थांबले ना पक्षाच्या कुठल्या बैठकीला गेले. अगदी परवा मुंबईत अजित पवार यांच्या घरी झालेल्या बैठकीसाठी सुद्धा ते गेले नाहीत मात्र त्यांनी आज शिर्डीत हजेरी लावली आहे. याचा अर्थ कुठेतरी जुळवून घेण्याची भूमिका ही पक्षाची आहे का, असा प्रश्न पडतो. कारण पक्षाचे दोन मोठे नेते जेव्हा भुजबळ यांना फोन करतात ते अजित पवार यांच्या परवागी शिवाय करतील असं नाही. भुजबळना बोलवण्याच्या निरोपमागे अजित पवार यांची समत्ती असणार यात शंका नाही. तरीही भुजबळ यांनी शिर्डीत येऊन आपली नाराजी व्यक्त केलीच आहे.

छगन भुजबळ हे खरोखरच राष्ट्रवादीसाठी धरलं तर चावतंय आणि सोडल तर पळतंय असे झाले आहेत का? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यात आपण बघितलं तर गेले काही दिवस भुजबळ हे फारसे बोललेले नाहीत मध्यंतरी ते परदेशी होते मात्र इथे आल्यापासून ते गप्प गप्प आहेत. त्यांच्या या गप्प गप्प राहण्यामागचा काय अर्थ, कारण मध्ये एकदा ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही भेटले होते. देवेंद्र फडणवीस यांची भूमिका ही भुजबळ मंत्री मंडळात असावेत अशी होती असं भुजबळ यांनीच माध्यमाना सांगितलं होतं. एकप्रकारे भुजबळ आपली ताकत दाखवून पक्षावर दबाव वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत, हे आता लपून राहिलेले नाही. अधिवेशन कोणत्या एका व्यक्तीचे नाही ते पक्षाचे आहे असं विधान करून त्यांनी अजित पवार यांना कोपरखळी मारली आहे.

हे ही वाचा..

तंत्रज्ञानाच्या मदतीने आरोग्य क्षेत्रात आमूलाग्र बदल करत मानवी जीवन सुसह्य करणे शक्य

केईएम रुग्णालयाचे शताब्दी वर्ष समाज उपयोगी ठरावे

राजनाथ सिंह यांनी त्रिवेणीच्या संगमात केले स्न्नान

जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफी खेळणार; मोहम्मद शामीलाही संघात स्थान

भुजबळ यांच्याबद्दल राष्ट्रवादी पक्ष काय निर्णय घेणार आणि जर पक्षाने उचित सन्मान नाही केला तर भुजबळ काय निर्णय घेतात हे येणाऱ्या काळात पाहणे महत्वाचं असेल. या निर्णयातून राजकारण उलथापालथ होईल त्यामुळं सध्या ताक सुद्धा फुंकून पिलं जातंय. इतके दिवस छगन भुजबळ हे माध्यमांच्या माध्यमातून आपला दबाव वाढवत होते. पक्षाच्या नेत्यांना नेत्यांना म्हणण्यापेक्षा अजित पवार यांना जो संदेश द्यायचा आहे तो देत होते मात्र आज शिर्डीत स्वतः पक्षाच्या अधिवेशनाला उपस्थित राहून त्यांनी दबाव टाकण्याचा प्रकार केलेला आहे. याची चर्चा राजकीय वर्तुळात आज दिवसभर रंगली होती.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
228,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा