कृत्रिम बुद्धिमत्ता आणि माहिती तंत्रज्ञानाचे मदतीने मानवी जीवनात अनेक सकारात्मक बदल होत आहे. राज्य शासनही आरोग्य क्षेत्रासह कृषी, ग्रामविकासात नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून नागरिकांच्या ‘इज ऑफ लिव्हिंग’ मध्ये सुधारणा आणत आहे. आरोग्य क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या मदतीने क्रांतिकारक बदल घडवून निश्चितच मानवी जीवन सुसह्य करणे शक्य होणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, मुंबई ही जगाची फिनटेक आणि डाटा सेंटर राजधानी होत आहे. जगातील प्रत्येक भागातील नागरिकांना तंत्रज्ञानाच्या युगात पुढे जाण्याची संधी मुंबईमध्ये उपलब्ध होणार आहे. भारत तंत्रज्ञान व आर्थिक विकासामध्ये नेत्रदीपक प्रगती करीत आहे. सध्या भारत जगातली सर्वात मोठी पाचवी अर्थव्यवस्था असून लवकरच तिसऱ्या क्रमांकावर झेप घेणार आहे. यामध्ये महाराष्ट्रानेही एक ट्रिलियन अमेरिकन डॉलर अर्थव्यवस्था होण्याचा विडा उचलला आहे.
जिओ कन्व्हेंक्शन सेंटर येथे ‘पॅन आयआयटी वर्ल्ड ऑफ टेक्नॉलॉजी’च्यावतीने आयोजित जागतिक परिषद २०२५ मध्ये मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. कार्यक्रमाला व्यासपीठावर दुबई आर्थिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी हादी बद्री, केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे सचिव प्रा. अभय करंदीकर, शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर, पॅन आयआयटीचे अध्यक्ष देवाशिष भट्टाचार्य, पॅन आयआयटीचे शरद सरफ, अशोक झुनझुनवाला आदी उपस्थित होते.
पायाभूत सुविधांची मोठी कामे देशात सुरू असल्याचे सांगत मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, मुंबईमधील सागरी किनारा रस्ता, अटल सेतूने दळणवळण गतिमान केले आहे. मुंबईत आणखी बऱ्याच पायाभूत सुविधांची कामे सुरू आहेत. राज्य शासन इनोव्हेटिव्ह सोसायटीसाठी प्रयत्न करीत आहे. राज्यातील दुर्गम गावांमध्ये आरोग्य सेवा पुरविण्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येत आहे. शासन महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून प्रती वर्ष पाच लाख रुपयांचे उपचार मोफत देत आहे.
हवामान बदल व पर्यावरणाच्या समस्यांमुळे कृषी क्षेत्रासमोर मोठी आव्हाने उभी ठाकली आहेत. या आव्हानांवर तंत्रज्ञानाच्या मदतीने मात करणे शक्य आहे. राज्य शासन शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सौरऊर्जेवर आधारित वीज पुरवठा उपलब्ध करून देत आहे. राज्यात २०२६ पर्यंत १६ गिगॅवॅट वीज उपलब्ध होणार आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणे शक्य होणार आहे. महाराष्ट्र राज्य हे देशात कृषीसाठी सौर ऊर्जा कंपनी स्थापन करणारे पहिले राज्य आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.
हे ही वाचा..
केईएम रुग्णालयाचे शताब्दी वर्ष समाज उपयोगी ठरावे
राजनाथ सिंह यांनी त्रिवेणीच्या संगमात केले स्न्नान
जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफी खेळणार; मोहम्मद शामीलाही संघात स्थान
आरजी कर बलात्कार प्रकरणात संजय रॉय दोषी!
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेला द्रोण दीदी उपक्रमही तंत्रज्ञानाच्या मदतीने पुढे नेला जात आहे. राज्यात पाण्याच्या संवर्धनासाठी जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून राज्यातील २४ हजार गावांमध्ये जलसंपन्नता आली आहे. आयआय टी मुंबई ही आता केवळ एक शैक्षणिक संस्था राहिली नसून ती ‘इंडियन इनोवेशन ऑफ टेक्नॉलॉजी’ बनली आहे. राज्य शासन संशोधनासाठी अनेक क्षेत्रात आयआयटी सोबत काम करीत आहे. द्रोण प्रकल्पासाठी काम सुरू आहे. यामध्ये कंट्रोल अँड कमांड सेंटर, द्रोण पोर्ट बनविले जात आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीने जीवनात अमुलाग्र बदल घडत असून त्यामुळे निश्चितच भविष्य उज्ज्वल होणार आहे. यावेळी आयआयटीचे संशोधक, प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.