30 C
Mumbai
Monday, November 7, 2022
घरसंपादकीयनीलमताई गॅरेण्टी उद्धव ठाकरे यांची तरी आहे का?

नीलमताई गॅरेण्टी उद्धव ठाकरे यांची तरी आहे का?

उद्धव गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांच्या विधानाचा अर्थ

Google News Follow

Related

विधान परिषदेच्या उपसभापती आणि शिवसेना उद्धव गटाच्या उपनेत्या नीलम गोऱ्हे यांची काल पुण्यात पत्रकार परिषद झाली, या परिषदेत बोलताना अजित पवार यांची काहीच गॅरेंण्टी नाही, असे विधान त्यांनी केले. निधी वाटपाबाबत एका प्रश्नाला उत्तर देताना त्या बोलत होत्या. गिरीश बापट पालक मंत्री असताना राष्ट्रवादीच्या आमदारांना बोलवून बोलवून निधी देत होते, परंतु आता तसं राहिलं नाही. पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय, मविआमुळे आम्ही एकत्र आलो, अजित दादांची काही गॅरेंण्टी नाही. पुन्हा भाजपाला बारामतीत सुप्रिया सुळे यांना पराभूत करायचे आहे.

भाजपाचे कधी काळी राष्ट्रवादीशी मेतकूट होते, ते आता राहिलेले नाही. हे स्पष्ट करण्यासाठी गोऱ्हे यांनी ही विधाने केली. परतुं त्यात अजितदादांची काही गॅरेंण्टी राहिलेली नाही, हे विधान ठिगळ लावल्यासारखे जोडलेले आहे. त्याला मागचा पुढचा काहीच संदर्भ नाही. परंतु तरीही ते विधान महत्वाचे आहे.

अलिकडे नेते स्वत:च्या पक्षाबद्दल, नेत्यांबद्दल कमी आणि इतर नेत्यांबद्दल जास्त बोलतात. भाजपाचे राष्ट्रवादीशी मेतकूट होते की नव्हते हा जुना मुद्दा झाला. पण सध्या उद्धव गटाशी राष्ट्रवादीचे मेतकूट हे वर्तमान आहे. डळमळत्या उद्धव गटाला राष्ट्रवादीचा टेकू आहे, असे असताना नीलम गोऱ्हे यांनी राष्ट्रवादीच्या नेत्याबद्दल बोलताना थोडे सबुरीने घेतलेले बरे. नाही तर ज्यांचा टेकू आहे, तेच हे सगळं वदवून घेतायत असा लोकांचा समज व्हायचा.

दिल्लीत तालकटोरा स्टेडीयमवर पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनात अजित दादांच्या भाषणापेक्षा त्यांचे वॉशरुमला जाणे गाजले. शिर्डीत झालेल्या पक्षाच्या अधिवेशनात भाषण ठोकल्यानंतर त्यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली. ही कुजबुज ताजी असताना नीलम गोऱ्हे यांच्या विधानाशी त्यात भर पडली आहे. शिंदे फडणवीस सरकारला जिथे तिथे संताजी धनाजी यांच्याप्रमाणे मविआचे नेते दिसतायत, असे नीलम गोऱ्हे त्याच पत्रकार परिषदेत म्हणाल्या. परंतु त्या नेत्यांमध्ये अजित पवार येत नाहीत असे त्यांना सुचवायचे होते काय?

मुळात अजित दादा यांची गॅरेण्टी कुणाला हवी आहे, हा मुद्दा आहे. नेत्यांना गॅरेण्टी व़ॉरेण्टी नसते. नेते म्हणजे एअर कंडिशन, रेफ्रीजरेटर आणि टीव्ही नाहीत. जी जनता या नेत्यांना निवडून देते ती सुद्धा गॅरेण्टी विचारत नाही.
अजित पवार हे शरद पवारांचे पुतणे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महत्त्वाच्या नेत्यांपैकी एक आणि अनेक महत्वाची मंत्रीपदे भूषविलेले नेते आहेत. परंतु तरीही नीलम गोऱ्हे यांच्या विधानामुळे ना मीडियात फारशी खळबळ माजली नाही. की पवार कुटुंबियांपैकी कोणी नीलम गोऱ्हे यांचा या विधानावरून कोणी निषेध केला. पवार यांनी बोलणे अपेक्षित नव्हतेच, पण किमान सुप्रिया सुळे काही प्रतिक्रिया देतील अशी अपेक्षा होती. परतुं तसेही काही घडले नाही. मग मीडियाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्यांकडून प्रतिक्रिया घेऊन दिवस साजरा करावा लागला. राष्ट्रवादीला गेलेले अंतर्गत तडे अशा घटनांमुळे क्वचितप्रसंगी लोकांसमोर येतात.

काही दिवसांपूर्वी शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी एक खळबळजनक दावा केला होता की, भाजपाकडून राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचा प्रयत्न होतो आहे. परंतु रोहित पवार त्यावेळी फार तपशीलात बोलले नाहीत. त्यामुळे नीलम गोऱ्हे यांनी केलेल्या विधानाचा रोहित पवार यांच्या विधानाशी काही संबंध आहे का, असा सवाल तर नक्कीच निर्माण होतो.

हे ही वाचा:

आणि चक्क टेम्पोने घेतला कारचा बदला

भविष्यातील पिढ्या घडविण्यासाठी आरक्षणाबाबतचा निर्णय महत्त्वाचा

अब्दुल सत्तारांच्या त्या अपशब्दावरुन राजकीय राडा

इंटरनॅशनल हलाल शो इंडियाच्या विरोधात आवाज बुलंद

 

पहाटेच्या शपथविधीमुळे अजित पवारांबाबत निर्माण झालेली साशंकता अजूनही कायम आहे. त्यात पक्षाच्या पुनर्बांधणीत अजितदादांच्या समर्थकांना नारळ देण्यात आला. भविष्यात पक्षाची कमान सुप्रिया यांच्या हाती राहील याची तजवीज थोरले पवार करतायत. त्यातून निर्माण झालेली अजितदादांची अस्वस्थता दडलेली नाही. त्यात गोऱ्हे यांच्या विधानामुळे दादांबाबत संशयाचे धुके दाट झालेले आहे.

परंतु हा सगळा राष्ट्रवादीच्या अंतर्गत राजकारणाचा मामला आहे. त्याचा संबंध फार तर पवार कुटुंबियांशी आहे. पण मग नीलमताईंना अजित दादांची गॅरेण्टी का आणि कशासाठी हवी हा प्रश्न पडतोच. कारण या दादांची गॅरेण्टी असेल काय नसेल काय, त्याचा नीलम गोऱ्हे यांच्या कारकीर्दीवर किंवा पक्षावर काडीचाही फरक पडणार नाही. त्यांनी फार तर उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे यांच्या गॅरेण्टीची चिंता करायला हवी. याबाबत जुन्या जाणत्या शिवसैनिकांमध्ये आणि पदाधिकाऱ्यांमध्येही चिंता आहे. शिवसेना उद्धव गटाच्या नेत्यांच्या भवितव्यासाठी ही गॅरेण्टी महत्वाची आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,964चाहतेआवड दर्शवा
1,966अनुयायीअनुकरण करा
48,400सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा