खाद्यपदार्थावर धार्मिक शिक्का हवा कशाला? जिथे सदा सर्वदा धर्मनिरपेक्षतेचा उदो उदो होतो, तिथे तर हे सर्वथा चुकीचे आहे. तुम्ही मुस्लीम असा किंवा नसा आपल्याकडे हलाल पद्धतीने कापलेल्या बकऱ्याचे मटणच मिळते. बकरा कापताना इस्लामिक प्रार्थना केली जाते. हलालचा शिक्का असलेले हे मटण ज्यांना खायचे नाही, त्यांच्यावरही लादले जाते. अनेकांना हे माहीत नसते की हे हलाल प्रकरण काय आहे ते. ज्यांना माहिती आहे, त्यांना पर्याय नसतो. महायुती सरकारचे मंत्री नितेश राणे यांनी त्या दिशेने पावले टाकत, मल्हार सर्टीफाईड झटका मटणाचा पर्याय दिलेला आहे. त्यावर काही जणांनी बोंब ठोकायला सुरूवात केलेली आहे.
देशात लोकशाही आहे. कोणी काय खावे, काय प्यावे याचे प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. परंतु ते हिंदूंना मात्र नसावे हे दुर्दैवी आहे. देशातील हिंदूंना कारण नसताना हलाल सर्टीफाईड अन्न पदार्थ खावे लागतात. मुस्लिमांसाठी जे हलाल आहे, ते
हिंदूंसाठी हलाल असेलच याची काही आवश्यकता नाही. परंतु तरीही हे हलाल सर्टीफाईड उत्पन्न हिंदूंच्या माथी मारले जातात. ऐकून आश्चर्य वाटेल, नेस्ले, आय़टीसी, डाबर यांच्यासारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्या हलाल उत्पादने बहाल करतातच, त्यासोबत पतंजली, अमूल, हल्दीराम, बिकाजी, देसाई फूड्स या कंपन्यांचा ही यात समावेश आहे. ही उत्पादने हिंदू
नकळत विकत घेतात.
कुराण आणि हदीसमध्ये अन्नासंबंधी जे नियम आहेत, त्या नियमांनुसार या अन्न पदार्थांची, वस्तूंची किंवा उत्पादनाची निर्मिती झालेली आहे, अशी खातरजमा करून जमियत उलेमा ए हिंद, हलाल इंडीया प्रा.लि., जमियत उलेमा महाराष्ट्र या संघटना हलाल सर्टीफीकेट प्रदान करतात. कोट्यवधी रुपयांची कमाई करतात. मटणही असेच आपल्या गळ्यात मारले जाते. अनेक हिंदूंना हे माहीत नाही. ही फसवणूक थांबावी, हिंदूंना हलाल मुक्त मटण मिळावे, झटका पद्धतीचे मटण मिळावे म्हणून सुरू केलेल्या मल्हार सर्टीफाईड मटणासाठी एक वेबसाईट सुरू करण्यात आली आहे. त्यावर हिंदू मटण विक्रेते नोंदणी करणार आहेत. त्या दुकानात मटण कापणारे, विकणारे सगळे हिंदू असतील. www.malharcerification.com या वेबसाईटवर ही नोंदणी केली जाणार आहे.
तूर्तास या वेबसाईटवर पुण्यातील मटण विक्रेत्यांनी नोंदणी केलेली आहे. महाराष्ट्रातील विक्रेते लवकरच यावर नोंदणी करतील. वेबसाईटचे उद्घाटन करताना ‘थुंकी मुक्त मटण खाण्यासाठी मल्हार सर्टीफाईड मटणच घ्या’, असे आवाहन मंत्री नितेश राणे यांनी केलेले आहे. राणे यांनी या वेबसाईटचे उद्घाटन केल्यानंतर त्यांच्यावर टीका झाली नसती तरच नवल होते. ‘मटण कोणाकडून घ्यायचे हे मंत्री सांगत असतील तर ते मंत्री धन्य आहेत’, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. हे अपेक्षितही होते.
भारताच्या राज्य घटनेने प्रत्येक नागरीकाला खानपानाचे स्वातंत्र्य दिलेले आहे. हिंदूंना जर हलालचा इस्लामी शिक्का नसलेले मटण खाण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी राणे पुढाकार घेत असतील तर त्यात आव्हाडांना झोंबण्यासारखे
काय आहे? मल्हार सर्टीफाईड मटणाचा पर्याय त्यांच्यासाठी आहे, जे पर्यायाच्या शोधात आहे. आव्हाड काहीही झाले तरी हलाल मटणच खाणार हे जगाला ठाऊक आहे. हिंदूंनी हलाल पद्धतीचे मटण खावे असा ज्यांचा आग्रह आहे, त्यांनी
मुस्लिमांनाही विचारावे की ते मल्हार सर्टीफाईड झटका पद्धतीचे मटण खातील काय? जर मुस्लीमांची तयारी नसेल तर हिंदूंवर हलाल मटण लादण्याचे कारण काय?
हे ही वाचा:
अमेरिकेला व्यापार शुल्क कमी करण्याबाबत कोणतेही वचन दिलेले नाही
बांगलादेशात सोन्याचे दुकान लुटून हिंदू सोनाराची हत्या!
मशिदींवर रात्रंदिवस वाजणारे भोंगे बंद करा
भारताच्या विजयाचा आनंद साजरा करताना मुस्लिम जमावाचा हिंदूंवर हल्ला
आज आपण मटणाची दुकाने पाहिली तर हा व्यवसाय शंभर टक्के मुस्लिमांच्या ताब्यात आहे. त्यामुळे मांसाहारी हिंदूंना आज तरी कोणताही पर्याय उपलब्ध नाही. जे पर्यायाच्या शोधात होते, त्यांना झटका पद्धतीचे मटण उपलब्ध होणार
ही आनंदाची बाब आहे. हे मटण फक्त दुकानात नाही, तर बड्या सुपर मार्केटमध्येही उपलब्ध व्हावे यासाठी प्रयत्न करावे लागतील. सरकारचे या प्रयत्नांना सहकार्यही लागेल. हिंदू खाटीक या धंद्यातून बऱ्याच काळापूर्वी हद्दपार झाला आहे, त्याचे कारण नव्या सुशिक्षित पिढीने हा धंदा सोडला आहे. जे मच्छिमार कोळी समाजाबाबत झाले तेच खाटीकांबाबतही झाले. आज कोळी समाजाची पुढची पिढी मच्छिमारीचा किंवा मासे विकण्याचा व्यवसाय करू इच्छित नाही. त्यांना याची
शरम वाटते. ग्रॅज्युएशन केल्यानंतर दहा पंधरा हजारात खर्डेघाशी करतील, परंतु पिढीजात व्यवसाय करणार नाहीत. ही सगळ्यात मोठी अडचण आहे. त्यामुळे मासे विक्रेत्यांमध्ये बांगलादेशींनी शिरकाव केला आहे. आज हिंदू खाटीकांची जी
काही दोन चार दुकाने दिसतात, त्यात काम करणारे खाटीक हे मुस्लीमच असतात. ते हलाल पद्धतीनेच मटण कापतात.
नव्या पिढीच्या अनास्थेमुळे जे अनेक व्यवसाय हिंदू समाजाने गमावले त्याची यादी काढता येईल. पूर्वी भंगारच्या व्यवसायात मारवाडी होती, केशकर्तनाच्या व्यवसायात मराठी, हिंदी भाषिक हिंदू होते. अनेकांनी दुकाने बंद केली आहेत किंवा इतरांना चालवायला दिलेली आहे. आपल्या हातातून एकेक व्यवसाय निसटत चालला आहे, याची जाणीव हिंदूंना उशीरा का होईना झाली ही चांगली बाब आहे. झटका मटणाच्या दुकानापासून याची सुरूवात होऊ दे. हे व्यवसाय आज मुस्लीमाच्या हाती गेले, हा काही त्यांचा दोष नाही. पिढीजात व्यवसायाला कमी लेखण्याचे काम हिंदूंनी केले आहे. त्याचे परीमार्जनही त्यांनाच
करावे लागले. या व्यवसायाला प्रतिष्ठा मिळवून द्यावी लागेल.
नीतेश राणे यांनी या उपक्रमाला सहकार्य केले आहे, त्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन, परंतु ही वाट खडतर आहे, त्यासाठी खाटीक समाजातील नव्या पिढीची मानसिकता बदलावी लागेल. आपल्या पिढीजात धंद्याबाबत त्यांच्या मनात श्रद्धा आणि निष्ठा निर्माण करावी लागेल. हे काम निश्चितच सोपे नाही.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)