पाकिस्तानमधून एक मोठी बातमी येत आहे. पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये मंगळवारी (११ मार्च) बलुच लिबरेशन आर्मीने (बीएलए) जाफर एक्सप्रेस ट्रेनचे अपहरण केले आहे. या ट्रेनमध्ये ५०० हून अधिक प्रवासी असून लिबरेशन आर्मीने यातील १८२ प्रवाशांना ओलीस ठेवल्याचे समोर आले आहे. यामध्ये काही पाकिस्तानी अधिकाऱ्यांचाही समावेश असल्याची माहिती आहे. तसेच दहशतवाद्यांनी ट्रेनमधील २० लष्करी जवानांना देखील ठार केले आहे.
या घटनेची जबाबदारी बलुच लिबरेशन आर्मीने (बीएलए) स्वीकारली आहे. तसेच त्यांच्याविरुद्ध कोणतीही लष्करी कारवाई केली तर सर्व ओलिसांना ठार मारले जाईल, असा इशाराही गटाकडून देण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी रेल्वे ट्रॅकवर स्फोट करून ट्रेन हायजॅक केली. अपहरणकर्त्यांमध्ये अनेक पाकिस्तानी लष्करी अधिकारी देखील आहेत. सध्या ट्रेन एका बोगद्यात उभी आहे.
प्रवासी ट्रेन क्वेट्टाहून पेशावरला जात होती. त्यानंतर प्रथम रुळांवर स्फोटाचा आवाज ऐकू आला आणि नंतर ट्रेनवर गोळीबार सुरू झाला. यानंतर, ट्रेनमध्ये उपस्थित सुरक्षा कर्मचारी आणि ट्रेनवर गोळीबार करणाऱ्या सशस्त्र लोकांमध्ये चकमक सुरू झाली. यावेळी बीएलएच्या गटाने पाकिस्तानच्या २० सैनिकांना ठार केले.
रेल्वे अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ट्रेनच्या ९ डब्यांमधील ४५० प्रवासी आणि कर्मचाऱ्यांशी कोणताही संपर्क झालेला नाही. प्राथमिक वृत्तानुसार या हल्ल्यात अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. बीएलएने दावा केला आहे की, ओलीस ठेवण्यात आलेल्यांमध्ये पाकिस्तानी लष्करी कर्मचारी आणि इतर सुरक्षा एजन्सींचे सदस्य आहेत.
हे ही वाचा :
पाकिस्तानची नाचक्की; सरकारी अधिकाऱ्यालाही अमेरिकेने नाकारला प्रवेश
वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर झाले तर संपूर्ण देशात शाहीन बाग करू!
हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्स संघात परतला!
डोंबिवलीत आरएसएसच्या शाखेवर दगडांचा मारा, रिझवान शेखसह ५ जण ताब्यात
“अपहरण केलेल्यांमध्ये पाकिस्तानी लष्कर, पोलिस, दहशतवादविरोधी दल (एटीएफ) आणि इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजेंसचे (आयएसआय) सक्रिय कर्तव्य बजावणारे कर्मचारी आहेत, हे सर्वजण रजेवर पंजाबला जात होते,” असे निवेदनात म्हटले आहे.
तथापि, अतिरेक्यांनी दावा केला की त्यांनी महिला, मुले आणि बलुच प्रवाशांना सोडले आहे, जेणेकरून उर्वरित सर्व ओलिस पाकिस्तानी सैन्याचे कर्मचारी आहेत याची खात्री होईल. दरम्यान, सरकारने आपत्कालीन उपाययोजना लागू केल्या आहेत आणि परिस्थितीला तोंड देण्यासाठी सर्व संस्थांना एकत्रित करण्यात आले आहे, असे सरकारी प्रवक्ते शाहिद रिंद यांनी सांगितले.