आंतरराष्ट्रीय पातळीवर यापूर्वीही अनेकदा पाकिस्तानची नाचक्की झालेली असताना आता पुन्हा एकदा पाकिस्तानला अपमानाचा सामना करावा लागला. तुर्कमेनिस्तानमधील पाकिस्तानचे राजदूत के के वागन यांना त्यांच्याकडे सर्व वैध व्हिसा, कागदपत्रे असतानाही अमेरिकेत प्रवेश नाकारण्यात आला. त्यांना लॉस एंजेलिसमधून हद्दपार करण्यात आले. के के वागन हे सुट्टीसाठी लॉस एंजेलिसला जात असताना अमेरिकन इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी त्यांना विमानतळावरचं रोखले आणि परत पाठवून दिले. अर्थात या प्रकरणाची चर्चा जगभरात झाली आणि पाकिस्तानची नाचक्की झाली.
खरे तर, आतापर्यंत असे ऐकिवातचं नाही की, कोणत्या एका देशाने दुसऱ्या देशाच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्याला सर्व वैध कागदपत्रे असताना प्रवेश दिलेला नाही. वागन यांच्याकडे डिप्लोमॅट पासपोर्ट असताना हे घडल्यामुळे अधिक आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कोणत्याही देशाचा डिप्लोमॅट पासपोर्ट हा जगभरात अधिक ताकदवान मानला जातो. हा पासपोर्ट असतानाही अमेरिकेने वागन यांना देशात प्रवेश नाकारला. अशी घटना यापूर्वी घडलेली नसून याची चर्चा जगभरात होत आहे. पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय पातळीवर चांगलीच नाचक्की झाल्याचे बोलण्यात येत आहे. पाकिस्तानी माध्यमांकडून याची दखल घेतली गेली असून नक्की हे प्रकरण काय आहे यावर चर्चा केली जात आहे.
जगभरात ट्रम्प यांच्या टैरिफ वॉरची चर्चा सुरू असताना ट्रम्प पाकिस्तानला मोठा दणका देण्याच्या तयारीत आहेत. ट्रम्प अमेरिकेत पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील नागरिकांना प्रवेश करण्यापासून रोखणार असून सुरक्षेच्या कारणावरुन हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. यामुळे या देशातील लोक अमेरिकेत प्रवास करू शकणार नाहीत. अशा आशयाचे अनेक अहवाल दोन दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाले होते. त्यामुळे पाकिस्तानच्या राजदूतांना नाकारलेला अमेरिका प्रवेश म्हणजे या प्रवास निर्बंधांची झलक आहे का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. एखाद्या देशात नागरिकांना प्रवास करणं, प्रवेश न देणं या बाबी सामान्य असल्या तरी उच्च स्तरीय अधिकाऱ्यासोबत हे असं होणं हे नक्कीच सामान्य नाही. डिप्लोमॅट पासपोर्टला अधिक वजन असताना हे कसे घडले यामुळे पाकिस्तानमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. या एका घटनेमुळे आता पाकिस्तानमधील उद्योजक किंवा मंत्र्यांना बैठकीसाठी अमेरिकेला जायचे असल्यास ते ही विचारात पडतील की आपल्यासोबत असे काही झाल्यास आपल्या किंवा देशाच्या अब्रूचे काय?
डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या पहिल्या कार्यकाळात काही मुस्लीम देशांवर प्रवास निर्बंध लावले होते पण तेव्हा यात पाकिस्तानचा समावेश नव्हता. यावेळी मात्र ट्रम्प यांचा वेगळाच मनसुबा दिसत आहे. ट्रम्प एकीकडे पाकिस्तानला लष्करी मदत देऊ करतील आणि दुसरीकडे प्रवास निर्बंध लादतील, असेही होऊ शकते. पाकिस्तानी सरकारही अमेरिकेला सध्या विचारत आहे की खरेच निर्बंध लादणार आहात का? पासपोर्ट असणाऱ्यांना अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही का? मात्र अमेरिकेकडून अधिकृत काहीही सांगितले जात नसून पाकिस्तानला याबद्दल काहीही माहिती नाही.
हे ही वाचा :
वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर झाले तर संपूर्ण देशात शाहीन बाग करू!
बांगलादेशात सोन्याचे दुकान लुटून हिंदू सोनाराची हत्या!
डोंबिवलीत आरएसएसच्या शाखेवर दगडांचा मारा, रिझवान शेखसह ५ जण ताब्यात
ईशान्येकडील आणि उर्वरित भारतामधील अंतर कमी केले हेच सरकारचे मोठे यश
दुसरीकडे, न्यूयॉर्क टाईम्सने म्हटले आहे की, अमेरिका वेगवेगळ्या पातळीवर व्हिसा निर्बंध लागू करू शकेल. त्यात एक श्रेणी असेल ती म्हणजे ‘ऑरेंज कॅटेगरी’ आणि याचं श्रेणीत पाकिस्तान असेल. याअंतर्गत अमेरिकन व्हिसा पाकिस्तानी नागरिक घेऊ शकणार नाहीत. कदाचित केवळ श्रीमंत पाकिस्तानीचं पैशांच्या जोरावर व्हिसा मिळवू शकतील. पण, इतर नागरिक, विद्यार्थी, साधारण व्यापारी यांना अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही.
सध्या राजदूतांना नाकारलेल्या प्रवेशाची घटना जगभराने पाहिली असली तरी पाकिस्तान यावर काय करणार याकडे लक्ष असेल. पण, डोनाल्ड ट्रम्प यांना सध्या पाकिस्तान नाराज करेल का? असा प्रश्नही आहे. पाकिस्तानला एकीकडे मनात अशीही भीती आहे की, ट्रम्प इम्रान खान यांच्यावर काही बोलतील का? इम्रान खान यांची अटक चुकीची असल्याचे वक्तव्य ते उघडपणे नक्कीच करू शकतात? यावरून पाकिस्तान पुन्हा अडचणीत सापडू शकतो.